Thursday, January 1, 2026
Homeकलास्नेहाची रेसिपी : भाग 41

स्नेहाची रेसिपी : भाग 41

“कुकीज यम्मी डिझार्ट”
सरत्या वर्षाला ‘बाय बाय’ म्हणत आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एक मस्त गोड, सर्वांना आवडेल, आकर्षक वाटेल असा खास पदार्थ बनवू या.

उन्हाळ्यात आपण तऱ्हेतऱ्हेचे डिझार्ट बनवतो. सर्वच डिझार्ट स्वीट, दिसायला आकर्षक आणि चवीलाही भन्नाट असतात. म्हणूनच तर सगळे त्यांच्या प्रेमात पडतात. तसे तर आता बाराही महिने सर्वांना डिझार्ट आवडत असल्यामुळे बनवले जाताताच. खास करून हॉटेल्स मध्ये तर जेवणानंतर बरेच जण घेतातच. मग उन्हाळ्यात तर हमखास मागवतातच म्हणूनच त्यांचे खूप प्रकार बनवले जातात.

आजही एक सोपे आणि टेस्टी असे डिझार्ट बनवू. जे पाहूनच मोहात पडणार. खाल्ल्यानंतर तर नक्कीच खुश होणार. करायचे ना मग ….

साहित्य :
अर्धा किलो छोट्या कुकीज .. कोणतीही नानकटाई, बिस्किटे, 2 चमचे कॉर्न फ्लोअर, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कॅन्डेन्स्ड मिल्क, पाव वाटी साखर, 1 कप दूध,1क्यूब अनसॉल्टेड बटर, पाव चमचा व्हेनीला इसेन्स, 4..5 थेंब रेड फूड कलर, डेसिकेटेड कोकोनट, अर्धा कप व्हीप्ड क्रिम, 2 चमचे पिठीसाखर.

कृती :
प्रथम एका जाड बुडाच्या भांड्यात कॉर्नफ्लोअर, मिल्क पावडर, दूध घालून छान एकत्र ढवळुन घ्यावे. मग त्यात साखर घालून गॅसवर उकळायला ठेवावे. हे सतत ढवळत रहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. थोडेसे घट्टसर झाले की त्यात कॅन्डेन्स्ड मिल्क घालून आतले की त्यात अनसॉल्टेड बटर घालून व्हनिला इसेन्स घालून ढवळावे आणि छान घट्ट झाले की गॅस बंद करून हे खाली काढून ठेवून थंड करण्यास ठेवावे. आता एका बाऊलमध्ये व्हीपड क्रिम घालून त्यात 2 चमचे पिठीसाखर घालावी. नंतर त्यात पाव चमचा व्हेनीला इसेन्स घालून गुलाबी रंग येईल असा रेड फूड कलर घालावा. हे सर्व आता मस्त हलके होऊन फुगेपर्यंत बिटरने भरपूर फेटून घ्यावे.

त्यानंतर एका चौकोनी खोलगट बाउलमध्ये आधी ओळीने कुकीज ठेवावेत. त्यावर सुरुवातीला केलेल्या मिश्रणाचा एक थर द्यावा. नंतर पुन्हा ओळीने कुकिजचा दुसरा थर द्यावा. मग त्यावर सुद्धा मिश्रणाचा पुन्हा थर द्यावा. शेवटी कुकिजचा तिसरा थर लावून त्यावर शिल्लक असेल तर आधीचे पूर्ण मिश्रण घालून त्यावर व्हीपड क्रीमचा पिंक कलरचा मस्त थर द्यावा.
सजावटीसाठी वरून थोडेसे डेसिकेटेड कोकोनट, टुटीफ्रुटी, स्प्रिंकलर्स घालून सेट करण्यासाठी कमीतकमी 4..5 तास ठेवावे. रात्रभर ठेवले तर उत्तमच. मग मस्त सेट झाले की बाहेर काढून सुरीने कट करून डिशमध्ये सर्व्ह करावे.

वैशिष्टय :
हे डिझार्ट एकावर एक थर असल्यामुळे खूपच सुरेख दिसते. वरचा गुलाबी रंग, त्यावरील सजावटी मुळे जास्तच खुलतो. कुकिजचा बेकिंगचा मस्त स्वाद, व्हेनिला इसेन्सचा मंद स्वाद, क्रिमी टेस्ट हे सारेच हवेहवेसे आणि वाटणारे, मोहात पाडणारे असेच असते. रंगीबेरंगी स्प्रिंकलर्स, टुटीफ्रुटी यामुळे लहान मुले यांचे फॅनच होतात. गोड, स्वादिष्ट, क्रिमी आणि यम्मी डेझर्ट नक्की करून पहाच ! आणि नव्या वर्षाची गोड सुरुवात करूया.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”