Saturday, June 14, 2025
Homeकला'स्नेहाची रेसिपी' - १८

‘स्नेहाची रेसिपी’ – १८

“झटपट मलाई रोल”

कोणी खास पाहुणे घरी येणार हे समजताच प्रत्येक गृहिणीसमोर पहिला प्रश्न असतो, काय स्पेशल करावे ? जास्त कष्ट न घ्यावे लागता आणि झटपट होणारा जर एकदम छान पदार्थ समजला तर … मग चलाच, करणाराही खुश होईल आणि खाणारा तर त्यापेक्षा जास्त खुश होईल अशी ही खास डिश करून तर पहा !

साहित्य :
4..5 ब्रेडचे स्लाइस, अर्धी वाटी घट्ट मलाई, अर्धा चमचा कंडेन्स्ड मिल्क, अर्धा चमचा मिल्क पावडर, 4..5 काजू, 4..5 बदाम, 4..5 पिस्ते यांचे बारीक तुकडे, 4..5 थेंब व्हॅनिला इसेन्स, सजावतिसाठी असतील तर गुलाब पाकळ्या, 2 …3 चमचे कंडेन्स्ड मिल्क.

कृती :
प्रथम ब्रेडच्या सलाईसच्या कडा काढून टाकाव्यात. त्या थोड्या वाळवून मिक्सर मधून काढून ब्रेडक्रमस बनवून ठेवले तर कधीही उपयोगी पडतात. नाही काढले तर या डिश मध्ये खूप चिवट लागतात. म्हणून काढणे आवश्यक आहे ..
त्यानंतर फुलक्रीम दुधावरची साय घट्ट असते ती अर्धी वाटी घेऊन छान फेटून घ्यावी. मग त्यात मिल्क पावडर घालावी म्हणजे घट्टपणा येईल. आता त्यात अर्धा चमचा कंडेन्स्ड मिल्क घालून व्यवस्थित फेटावे. म्हणजे छान एकजीव होऊन मलाई छान गोडसर व क्रिमी होईल. मग त्यात सजावतिसाठी थोडे ड्रायफ्रुट्सचे तुकडे बाजूला ठेवून बाकीचे घालावेत व इसेन्स घालून व आवडत असेल तर कोणताही फुडकलर घालून छान मिक्स करावे म्हणजे हे आपले स्टफींग तयार झाले.
त्यानंतर लाटण्याने ब्रेड थोडासा लाटून घ्यावा व त्यावर 1 चमचा स्टफींग घालून पसरावे व त्याचा रोल बनवून घेऊन ट्रे मध्ये ठेवावा. अशा प्रकारे सर्व रोल बनवून घ्यावेत. मग ते सर्व व्यवस्थित ट्रे मध्ये ठेवून त्यावर थोड्या उंचीवरून कंडेन्स्ड मिल्कची पातळ धार सोडून पूर्ण सजवावे म्हणजे आतून थोडे कमी गोड असले तरी वरून गोड लागले की छान टेस्ट लागेल. त्यावरून ड्रायफ्रुट्स आणि असतील तर गुलाब पाकळ्या किंवा डाळिंब दाणे, टूटीफ्रुटी घालून मनासारखे छान सजवावे. थोडे फ्रिज मध्ये ठेवून थंडगार सर्व केले तर आणखी बहार येते.

वैशिष्ट्य :
यात आपल्या आवडीचे कोणतेही फ्लेवर, रंग आपण घालू शकतो. हे रोल्स एकदम सॉफ्ट, क्रिमी, टेस्टी लागतात. मुख्य म्हणजे मेन स्वीट डिश इतक्या झटपट, न शिजवता, सुरेख बनते आधी करून ठेवली तरी चालते,त्यामुळे बाकी गोष्टी करायला भरपूर वेळ मिळतो. ऐन वेळी धावपळ, घाई होत नाही. यातील मिल्क पावडर आणि कंडेन्स्ड मिल्क मुळे टेस्ट तर सुरेख लागतेच पण गुलाब पाकळ्यांचा मंद स्वाद याची लज्जत,आकर्षकता खूपच वाढवतात. त्याशिवाय हे नावीन्यपूर्ण, रंगीत आकर्षक, लक्षवेधक अणि तितकेच टेस्टी असल्यामुळे पाहुणेही नक्कीच खुश होतील.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments