Thursday, July 3, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : २१

स्नेहाची रेसिपी : २१

“लिंबू गोटा बटाटावडा”

आषाढ आला की साऱ्यानाच तळलेले खमंग पदार्थ खावेसे वाटतातच. आपले पूर्वज खरच खूप विद्वान आणि दूरदृष्टीचे होते. रूढी, परंपरा ठरवताना त्यांनी आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, वातावरण यांचा सखोल अभ्यास करूनच त्या प्रमाणे काय खावे हे सांगितले आहे.
आषाढ तळावा.. श्रावण भाजावा.. भाद्रपद उकडावा..” पण हे असंच का ??

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. “तळणं, भाजणं आणि उकडणं..” या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान. शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं??

आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. यादोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात “तळलेलं” खाणं हा अफलातून उपाय आहे ! विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूक करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी “औषध” बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते ! म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. म्हणूनच आज आपण बनवतोय एक खास स्टाईलचा बटाटे वडा!

प्रत्येक ठिकाणची बटाटेवडे बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. सारण खूप वेगवेगळे असते. तरीही बटाटेवडा हा पदार्थच असा आहे की, हा न आवडणारा माणूस जगात कुठेही सापडणारच नाही. याची खासियत म्हणजे हा कसाही बनवला तरी आवडतोच. आपल्या भारतातील तर स्ट्रीट फूड मधील सर्वात जास्त लोकांच्या पसंतीचा. अगदी गरीबांनाही सहज परवडणारा म्हणूनच सर्वाधिक खप असलेला असा खास पदार्थ आहे. कित्येक गरीब लोक अनेकदा वडापाव खाऊन जगतात. तर श्रीमंत लोक सुद्धा तितक्याच आवडीने मिटक्या मारत वडापाव खातात. मुख्य म्हणजे घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या लोकांना तरी झटपट खाऊन पोट भरत असल्यामुळे हा वडापाव म्हणजे वरदानच वाटते जणू ! म्हणूनच जम्बो वडा, खिडकी वडा, गोळी वडा अशा कित्येक नावानी हा प्रसिद्ध आहेच. अगदी मोठ्या हॉटेल्स मधून सुद्धा बटाटे वडा-सांबर मिळते आणि रस्त्यावरच्या टपरीवर, गाड्यावर सुद्धा हा मिळतो.

गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा असा कोणताही भेदभाव ही डिश खाताना दिसत नाही. अनेक ठिकाणचे वडापाव प्रसिद्ध आहेत, त्यातील सुरतचा लिंबू गोटा बटाटेवडा हा खूप प्रसिद्ध आहे आणि खरंच खूप वेगळा आहे. पाहायचा कसा बनवतात ते ?..

साहित्य : उकडलेले मध्यम आकाराचे 4..5 बटाटे, 2 बाऊल बारीक चिरलेली कांदा पात, 7..8 लसुण पाकळ्या, अर्धा इंच आले, 5..6 हिरव्या मिरच्या, 2 चमचे धने, 1चमचा जिरे, 2 चमचे तीळ, अर्धी वाटी खवलेला नारळ, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर.

बॅटरसाठी.. 3 वाट्या बेसन, किंचित हळद, चवीनुसार मीठ, 1 इनो पाऊच किंवा 1 चमचा खाण्याचा सोडा, तेल.

कृती : सर्वांत आधी उकडलेला बटाटा व्यवस्थीत कुस्करून घ्यावा. मग त्यात कांद्याची पात, धने, जिरे, तीळ, नारळ घालून आले, लसूण, मिरची वाटून त्यात घालावी. नंतर कोथिंबीर, लिंबाचा रस घालून चवीनुसार मीठ व साखर घालावी व हे सर्व छान एकत्र करून त्याचे छोटे, छोटे गोळे बनवावेत.

बॅटर बनवताना एका मोठ्या बाऊल मध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, हळद घालून छान मिक्स करावे. आवडतं असेल तर थोडासा ओवा घालावा म्हणजे डाळीचे पीठ वातुळ असते त्याचा त्रास कमी होतो. शिवाय खमंग टेस्ट येते.
त्यानंतर पिठात इनो किंवा सोडा घालून थोडे थोडे पाणी घालत व्यवस्थीत फेटावे. थोडेसे ते घट्टसरच ठेवावे. हाताला हलके होऊन मस्त फुगेपर्यंत छान फेटावे.

बॅटर भिजवतानाच गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घालून ते गरम झाले की किंचीत फ्रायपेपर पावडर घालावी म्हणजे तळण्यासाठी तेल कमी लागतेच शिवाय वडेपण तेलकट होत नाहीत. आता गोळे एकेक करत बॅटर मध्ये टाकून घोळवावेत आणि नंतर मोठ्या चमच्याने हा वडा भरपुर बॅटर साहित तेलात सोडावेत आणि मस्त तांबूस सोनेरी रंगावर तळावेत.
आता हे गरम गरम वडे मध्यभागी कट करून त्यावर लिंबाचा रस, आवडतं असेल तर थोडा चाट मसाला भूरभुरून सर्व्ह करावा.

वैशिष्ट्य : हे लिंबू गोटा वडे आतून कोथिंबीर, कांदापात, कढीपत्ता असल्यामुळे सुरेख हिरवेगार दिसतात, तर वरून तांबुस सोनेरी रंगाचे असल्यामुळे खूपच आकर्षक दिसतात. आंबटगोड, नमकीन स्पायसी खमंग असे टेस्ट मे बेस्ट लागतात. मधून मधून धने, तीळ, दाताखाली आले की खूप मजा येते. नारळामुळे एक वेगळीच चव लागते, तर लिंबू, चाटमसाला यामुळे चटपटीत होऊन लज्जत काही औरच लागते. आपल्याकडील बटाटेवड्यांपेक्षा हे खूपच हटके लागतात. मुळातच टेस्टी असल्याने सोबत काही नसले तरी चालते. वरून फ्रेश लिंबू पिळून रस घालून खाल्ला तर जास्त मजा येते. ज्यांना थोडेसे आंबट आवडत असेल त्यांनी जरूर ट्राय करा.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments