‘कुंभनिया’: स्पेशल भजी !
आषाढ संपत आलेला आहे. आता सर्वाना याच महिन्यात तेलकट, तळलेले पदार्थ फर्माईश करून जिभेचे चोचले पुरवण्याची खरी संधी असते. ती अजिबात दवडू नये असे वाटते. म्हणून आज आपण मस्त जिभेचे लाड पुरवूया.
काही ठिकाणची खास वैशिष्ट्य असतात. गुजराथ राज्यातील कुंभान.. कुंभन हे गाव तिथे बनवल्या जाणाऱ्या खास हिरव्यागार खुसखुशीत भज्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपण नेहमीच तऱ्हेतऱ्हेची भजी बनवून खातोच. बटाटा, पालक, किंवा मिरची भजी, गोटा भजी, कांद्याची खेकडा भजी म्हटलं तरी साऱ्यांच्या तोंडाला पाणी सुटतेच ! त्यातून या पावसाळी हवेत तर भज्यांचे फक्त नावं काढण्याचा अवकाश, फर्मान सुटलेच म्हणून समजा ना !
आजची स्पेशल भजी तर खास काठेवाडी पद्धतीची, गुजरातची स्पेशल आणि तिथले खास स्ट्रीट फूड असलेली अशी कांदा भजीच्या तोडीसतोड बनतात. पहायची ना मग ?
साहित्य : २ वाट्या स्वच्छ धुवून, पुसुन, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी बारीक चिरलेली कांदा पात किंवा लसूण पात मिळाली तर उत्तम, कमी तिखटाची हिरवी मिरची 2..3 चमचे मध्यम पण दाताखाली लागेल अशी कट करून घेतलेली, 1 चमचा जाड,अर्धवट कुटलेले धणे, 1 चमचा जिरे,1 चमचा ओवा, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 1 चमचा आल्याचे एकदम बारीक तुकडे, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ, साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस, आवडी प्रमाणे तिखटपणासाठी हिरव्या मिरचीचा ठेचा, साधारणपणे पाऊण वाटी बेसन, पाव चमचा खाण्याचा सोडा, 1 चमचा तांदुळाची पिठी किंवा कॉर्नफ्लोअर, तेल.
कृती : सर्वांत आधी एका मोठ्ठया बाऊल मध्ये कोथिंबीर, आले, लसूण, मिरची, हिंग, हळद, धने, जिरे, कांद्याची किंवा लसूणाची पात, मिठ, लिंबाचा रस, साखर ,सर्व घालून हातांनी सर्व 2..3 मिनिटे व्यवस्थीत चोळून मिक्स करून घ्यावे. आता लिंबाचा रस, मिठ, साखर आणि आले, लसूण ,भाज्यांच्या ओलेपणामुळे छान रसरशीत झाले असेल. आता यात बेसन आणि कॉर्न फ्लोअर किंवा पिठी घालून पुन्हा छान सर्व एकजीव करावे आणि साधारण 5 मिनिटांनी गॅसवर कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे. तेल गरम होत आले की या पिठात खाण्याचा सोडा घालावा व पुन्हा छान मिक्स करावे. तेल तापले की त्यात किंचीत फ्रायमाझी पावडर घालावी म्हणजे तेल हलके होते आणि भजी तळण्यासाठी कमी तेल तर लागतेच पण भजी अजिबात तेलकट होत नाहीत.
आता गरम तेलात खेकडा भज्यांप्रमाणे बोटानी भजी सोडावीत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळावित. क्रीस्पी होण्यासाठी हिरवा रंग जाऊ देण्याची गरज नसते. कारण कॉर्नफ्लोअर किंवा तांदुळाच्या पिठीमुळे तो वरून येतोच. भजी तळून झाली की तारेच्या चाळणीत काढून घ्यावीत. सर्व्हिंग डिश मध्ये ही हिरवीगार भजी लाल केचप किंवा एखादी चटणी, लिंबाचे काप कांद्याचे काप, तळलेली हिरवी मिरची, सोबत सर्व्ह करावी.
वैशिष्टय : ही भजी हिरवीगार, क्रीस्पी बनल्यामुळे पाहूनच आकर्षक दिसल्यामुळे खाण्याचा मोह आवरत नाही. त्यातून खमंग, टेस्टी असल्यामुळे तर किती खाऊ, असे होते.’पोट भरते पण भरत नाही’ अशी अवस्था होते. ही भजी वरून एकदम कुरकुरीत आणि आतून किंचीत सॉफ्ट लागतात. थंड झाल्यावर सुद्धा मस्तच लागतात.
त्यामुळे खाताना खूपच मजा येते. खाताना दाताखाली धने, मिरचीचे तुकडे आले की मस्त वाटते. मेथी, पालक अशा हिरव्या भाज्या यात घातल्या तरी आगळाच स्वाद येतो. पालकामुळे जास्त हिरवीगार आणि कुरकुरीतसुद्धा बनतात.
नक्की करणारच तुम्ही,खात्रीच आहे माझी कारण वाचूनच तोंडाला आता पाणी सुटले आहे ना ?

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800