“झणझणीत झिरकं”
नुकतेच सणवार झाले. सर्वजण गोडधोड खाऊन कंटाळले असाल. गृहिणी स्वयंपाक, फराळाचे पदार्थ करून थकल्या असती. अशावेळी एखादा झटपट होणारा आणि भाज्या, वरण यांना एकच आणि खमंग पदार्थ सुचवला तर माझी खात्री आहे की तो तुम्ही नक्की बनवणारच ! म्हणूनच आज खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक झणझणीत, चमचमीत टेस्टी डिश.. पहाच मग ..
साहित्य :
1 वाटी शेंगदाणे,1 चमचा तीळ,1चमचा सुके खोबरे, 8..10 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, कढिपत्ता, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 4..5 हिरव्या मिरच्या, चिमूटभर ओवा, 2 चमचे तेल, चवीनुसार मीठ, फोडणीचे साहित्य.

कृती :
सर्वांत आधी आपण वाटण बनवू. त्यासाठी मिक्सर मध्ये शेंगदाणे, ओवा, तीळ, खोबरे, मिरची, निम्मी कोथिंबीर, लसूण, मिरच्या घालून छान वाटून घ्यावे. मग गॅसवर पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. दुसरीकडे कढई ठेवून त्यात तेल घालून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करून त्यात मिक्सर मध्ये बनवलेले वाटण घालून छान परतावे. म्हणजे शेंगदाणे, खोबरे, तीळ यांचा कच्चेपणा जाऊन त्यांना तेल सुटेल व खमंग स्वाद येईल. मग घट्टसर, पातळ जसे आवडेल त्याप्रमाणे गरम पाणी घालावे व चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून छान उकळी द्यावी व मग गॅस एकदम मंद करून ठेवावा. मधून मधून बुडातून ढवळावे म्हणजे बुडाला लागणार नाही आणि तेलाचा छान तवंग वर दिसेल. पोपटी हिरवा रंग खूप छान दिसतो. पाहूनच खाण्याचा मोह अनावर होतो. हे गरम गरम सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून भात, पोळी, भाकरी यांच्यायासोबत सर्व्ह करावे. जोडीला कांदा, लोणचे असले की बस्स !
वैशिष्ट्य :
ही एक महाराष्ट्रीयन खास डिश आहे. कमीतकमी आणि सर्व घरात असलेल्या साहित्यात ही डिश बनते. भाता बरोबर किंवा भाकरी, पोळी कशाही सोबत खाता येते. झटपट बनते. कमी वेळात, कमी साहित्यात खमंग होणारी पिठल्याला सुरेख पर्याय असणारी अशी ही डिश आहे. बेसनामुळे कधी वात असल्यामुळे पोटाची तक्रार होते किंवा गॅसेस होतात, काहींना आवडत नाही .. मग हे नक्की आवडेल. गावावरून दमून आलेले असाल, गडबड असेल तर गरम गरम झिरकं.. भात हा बेस्ट पर्याय आहे.

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
