“खेकडाभजी”
थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात गरम गरम भजी खाणे म्हणजे अगदी स्वर्गसुखच ! या दिवसात बाहेर रस्त्यांवर कांदाभज्यांचा खमंग दरवळ नुसता पसरलेला असतो सर्वत्र. तो एकदा का नाकात घुसला की कधी एकदा भजी खातो असे होते आणि खायला सुरु केले की पोट फुटेपर्यंत खाल्ली तरी मन भरत नाही. हिच भजी पुन्हा पुन्हा खावीशी वाटतात. पण बाहेर सगळीकडेच ही भजी चवीला जरी टेस्टी असली तरी तेल किंवा इतर सामग्री उत्तम दर्जाची वापरली जातातच असे नाही कारण त्यांना बिझनेस करायचा असतो. त्यामुळे जास्तीतजास्त कसा नफा कमवता येईल हे तर पाहणारच ना ! मग घरीच जर अगदी तशीच भजी बनवता आली तर ? हो, येतात ना अगदी सेम भजी बनवायला घरातच. ते सुद्धा सर्व साहित्य उत्तम दर्जाचे वापरून आणि बाहेरच्यापेक्षा कित्तीतरी स्वस्तात आणि भरपूर, मनसोक्त खाता येतील अशी ! पाहायची मग करून ?
साहित्य :
4 मोठ्ठे कांदे,1वाटी बेसन, पाव वाटी तांदूळाचे पीठ, 1 चमचा तिखट, कांद्याला लावण्यासाठी अर्धा चमचा मिठ, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा सोडा, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल.
कृती :
प्रथम कांद्याची साले काढून उभा मध्यभागातून कांदा कापावा. मग तो खालपासून वरपर्यंत आडवा एकदम पातळ पातळ कट करावा. म्हणजे त्याचे लांब आणि पातळ भरपूर काप होतील. असे सर्व कांदे कापून घ्यावेत आणि त्याला अर्धा चमचा मिठ चोळून लावून साधारण 15..20 मिनिटे ठेवावे.
तोपर्यंत भज्यांसाठी पीठ बनवूया. त्यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ घालून त्यात तिखट, हळद, चवीनुसार मीठ, ओवा, कोथिंबीर, सोडा घालावा. मग ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
आता कांद्याला मस्त पाणी सुटलेले असेल आणि मिठामुळे कांद्याला कडकपणाही येतो. नंतर थोडे थोडे करत कांद्यात सर्व पीठ मिक्स करावे. अगदी हलकासा पाण्याचा हबका मारून ते खूप ओले नं करता किंचीत ओलसरपणा येईल असे करावे.
गॅसवर एक कढई ठेवून त्यात भरपूर तेल घालून ते भजी तळण्यासाठी गरम करण्यासाठी ठेवावे. ते छान गरम झाले की त्यात थोडी पेपर फ्राय पावडर टाकावी म्हणजे तेल जास्त नं लागता भजीही तेलकट होत नाहीत. ती नसेल तर एक छोटासा नारळाच्या करवंटीचा तुकडा किंवा लाकडाचा तुकडा आणि एक चिंचेचे बुटूक टाकावे म्हणजे तळण्यासाठी तेल कमी लागते आणि खाताना भजी कोरडी आणि एकदम कमी तेलकट लागतात.
मस्त गरम झालेल्या अशा तेलात भजी पसरून सोडावीत. त्यामुळे ती सुटीसुटी, लांब लांब कांदा असल्यामुळे लांबट, कुरकुरीत बनतात. ही मस्त लालसर रंगावर तळून तारेच्या मोठ्या खोलगट झाऱ्याने पूर्ण तेल निथळून तारेच्या पसरट चाळणीत काढावीत आणि गरम गरम भजी सर्व्ह करावीत.
वैशिष्ट्य :
भज्याचे पीठ जास्त ओलसर नसल्यामुळे ही भजी सुटीसुटी बनतात. तांदूळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत बनतात. सोडा एकदम कमी घालावा म्हणजे खेकडाभजी तेलकट न् बनता क्रीस्पी बनतात. कांद्याला आधी मिठ लावलेले असते हे लक्षात घेऊन मगच पिठात मिठ घालावे. लांब लांब पातळ कट केलेल्या कांद्यामुळेच ही भजी खेकड्यासारखी दिसतात. म्हणूनच याला खेकडाभजी असे म्हटले जाते. आहेत ना बनवायला एकदम सोपी आणि झटपट बनणारी? मग आता कधीही आली लहर की बनवा झटपट !

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
