Saturday, April 5, 2025
Homeकलास्नेहाची रेसिपी : ९

स्नेहाची रेसिपी : ९

“उन्हाळा स्पेशल २”

: खरबूज मस्तानी :

कमीतकमी साहित्यात जास्तीत जास्त लाभ आणि दाद मिळवून देणारी पाककृती ! असे हे सुंदर शीतपेय.आता उन्हाळा सुरु झाला, सर्वत्र, बाजारात सुंदर टरबूज,खरबूज भरपूर दिसत आहेत. उन्हाळ्यात ही रसदार फळे येणे म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे.ही खाताना तर मस्त् मजा येतेच,पण कधी गडबडीत याचे बारीक तुकडे फोडी कापून ,त्याची साले काढून गर खाण्यापेक्षा दोन भाग करून आतील बिया झटपट काढून सुरीने गोल फिरवून सर्व गर काढून घेऊन ज्यूस बनवून प्यायला तर वेळही कमी लागतो आणि पोट पण मस्त भरते आणि थंडगार शांत वाटते. मग अजून अगदी थोडासा वेळ देऊन मस्तानीच बनवली तर ?

साहित्य : 1 छान पिकलेले खरबूज , २ चमचे साखर , 1 ग्लास थंड फुल क्रीम दूध , अर्धा चमचा व्हॅनिला फ्लेव्हरची कस्टर्ड पावडर , 2 व्हॅनिला आइसक्रीम स्कूप , सजावटीसाठी ड्रायफ्रुटसचे पातळ काप,चेरी.

कृती : प्रथम गॅसवर दुध उकळत ठेवावे. अर्धा कप दुधात कस्टर्ड पावडर घालून ती उकळणार्या दुधात घालावी व दूध सतत ढवळावे म्हणजे गुठळ्या होत नाहीत.थोडे दाट झाले की मग ते खाली काढून गार करुन ठेवावे. खरबूज सुरीने मध्यभागातून कापून दोन भाग करून घ्यावे.मग त्यातील आतील बियांचा भाग मोट्ठ्या चमच्याने काढून सरबत करण्यासाठी ठेवावा. मग त्याच्या फोडी करून घ्याव्यात.थोड्याशा लहान लहान 7..8 फोडी बाजूला ठेवून बाकीच्या ज्यूसरमध्ये घालव्यात.मग त्यात साखर व कस्टर्ड पावडर घालुन उकळुन थंड केलेले दूध घालून छान फिरवून मिल्क शेक तयार करून घ्यावा.
काचेच्या ग्लासमध्ये बर्फ घालून आवडत असेल तर भिजवलेले सब्जाचे बी घालावे. त्यानंतर हा मिल्क शेक घालून त्यात व्हॅनिला किंवा आवडत्या फ्लेव्हरच्या आइसक्रीमचे स्कूप घालावेत .त्यावर खरबुजाच्या छोट्या छोट्या फोडी ,ड्रायफ्रुटस घालून वर चेरी ठेवून थंडगार लगेंच सर्व्ह करावे.

वैशिष्ट्य : खरबूज हे शितफळ म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थीत राखून त्वचा छान ठेवण्यासाठी तर हे उपयुक्त आहेच ,पण यातून व्हिटॅमिन ए,बी,सी, फायबर ,कॅल्शिअम आणि खूप खनिजद्रव्ये मिळतात. म्हणून हे सर्वांनी आवर्जून खावे. मस्तानीमुळे दुधातील प्रोटीन्स,स्निग्धपदार्थ तर मिळतातच ,पण ती दिसायलाही इतकी छान व आकर्षक आहे व चव तर अशी लाजवाब आहे की खरबूज न आवडणारेही नक्कीच वन्स मोअर देतील.

२. : नाचणीचे आंबील :

नाचणी हे सर्वांत थंड ,पौष्टिक, सत्वयुक्त धान्य आहे. लहान मुलापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांसाठीच ते उपयुक्त आहे. बलवर्धक, बुद्धीवर्धक, उत्तम आरोग्यदायक अशी याची ख्याती आहे. म्हणूनच या पासून पापड, भाकरी, धिरडी, अंबिल असे विविध पदार्थ बनवले जातात.उन्हाळ्यात थंडगार अंबील, तर थंडीत सुपासारखे गरमागरम अंबील साजुक तुप घालुन खाल्ले जाते.अतिशय कमी कष्टात भरपूर फायदेशीर अशी ही डिश आहे.ही एक पारंपारीक डिश असून आवडीने बनवली जाते. पाहूया ना मग..

साहित्य : 1 चमचा एकदम बारीक दळलेले नाचणीचे पीठ, 1वाटी गोड ,ताजे दही ,पाव चमचा हिंगपावडर , 2 लसूण पाकळ्या ,अर्धी किंवा 1 छोटी हिरवी मिरची, किंचित आले , थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार सैंधव , पाव पाव चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड.

कृती : प्रथम एका बाऊल मध्ये नाचणीचे पीठ घेऊन त्यात थोडे थोडे पाणी घालत गाठी होऊ न देता सैल होईपर्यंत पाणी घालावे. हे पातळच असते, त्यामुळे पाणी थोडेसे जास्त वाटले तरी चालते. मग गॅसवर एका भांड्यात अर्धा लिटर पाणी उकळण्यास ठेवावे. त्याला उकळी आली की नाचणीचे पीठ घातलेले पातळ पाणी त्यात हळूहळू घालत सतत ढवळावे. म्हणजे गुठल्या होणार नाहीत. आले ,लसूण मिरची थोडीशी ठेचून त्यात घालावी. नंतर जिरेपूड ,हिंग पावडर घालून आवडत असेल तर चवीसाठी थोडीशी साखर घालावी. 4..5 मिनिटात हे मस्त शिजून दाटसर होते व छान चमक सुद्धा येते. शेवटी चवीनुसार सैंधव घालून कोथिंबीर घालावी व गॅस बंद करून भांडे खाली काढून ठेवावे व थंड होण्यास ठेवावे. तसे मीठ घातले तरी चालते, पण सैंधव घातल्याने ते अधिक चवदार लागते. आवडत असेल तर चिमूटभर चाटमसाला यात घातल्यानेसुद्धा टेस्ट मस्त येते .
शिजवलेले पिठ थंड होईपर्यंत रवीने दही थोडेसे फेटून घ्यावे म्हणजे छान मिळून येईल आणि त्यात सैल होण्यासाठी अंबिल जितके पातळसर आवडत असेल तसे थंड पाणी घालावे. आता त्या दह्यात शिजवलेले नाचणीचे पीठ थंड झाल्यावर घालावे. आता अंबील तयार आहे.
शेवटी ग्लासमध्ये किंवा बाऊलमध्ये हे तयार झालेले आंबील घालून वरून सजावटी साठी थोडीशी कोथिंबीर घालून थंडगार सर्व्ह करावे.

वैशिष्ट्य : उन्हाळ्यात सर्वांनीच हे आंबील बनवून जरूर प्यावे. कारण नाचणीत भरपूर प्रमाणात लोह, कार्बोहायडरेट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स, फायबर्स, फॉस्फरस असतात. गर्भवती महिलांना बाळाचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी, मधुमेही लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी, मुलांना वाढीसाठी , पोटांच्या तक्रारी दूर करण्यासाठी , रक्तांचे प्रमाण वाढवण्यासाठी, कॉलेस्टोल कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, मन स्थिर ठेवून बुद्धी वाढीसाठी, आजारी लोकांना हलके आणि पचायला सुलभ असल्यामुळे खीर ,पेज ,भाकरी खाण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय थंड असल्यामुळे उष्णतेचे विकार दूर होतात. असे असंख्य फायदे असलेले आणि थंडगार व स्वादिष्ट आंबील बनवा आणि आपली आणि कुटुंबाची तब्येत तंदुरुस्त ठेवा.

३. : कैरीचे पन्हे :

कैरीचे पन्हे एकदाच बनवुन ठेवा आणि उन्हाळा संपेपर्यंत भरपूर प्या.होळीची धामधूम संपली की उन्हाळा सुरु होतो
आणि बाजारात कैऱ्या दिसायला सुरु होतात.मग कैऱ्यांचे विविध पदार्थ बनवण्याची सुगरणींची लगबग सुरु होते. चटण्या,कायरस, सरबते असे लगेंच खाण्याचे पदार्थ असो किंवा लोणचे , मुरांबे, तक्कु ,छुंदा, जेली ,जाम, आमचूर पावडर असे वर्षभर साठवणीचे पदार्थ असोत, कैरी दिसली की तोंडाला पाणी सुटतेच. बाहेरील रखरखीत उन्हातून घरात आल्याआल्या थंडगार, टेस्टी, आंबटगोड पन्ह्याचा ग्लास समोर आला की स्वर्गीचे अमृतसुद्धा यापुढे फिके वाटते. असे पन्हे प्यायल्यावर सर्व थकवा कुठच्याकुठे पळून जातोआणि उन्हाळ्याशी सामना करायला अंगी उत्साह संचारतो. आता उन्हाळा सुरु झाला आहे आणि हिरव्यागार सुरेख कैऱ्याही बाजारात आल्या आहेत.मग वाट कशाची बघायची ?
चला तर.. लगेंच पन्हे बनवून ठेवू.बरेचदा सरबत आणि पन्हे यात गल्लत होते.
पन्हे हे कैऱ्या उकडून केले जाते, तर सरबत कच्च्या कैरीचे बनवले जाते.

साहित्य : घट्ट , मोठ्या थोड्या आंबट 5..6 कैऱ्या , दीड ते दुप्पट गुळ , किंवा गुळ आणि साखर अर्धे अर्धे आवडीनुसार , काहीजणांना गुळ आजिबात आवडत नाही त्यांनी दुप्पट साखर घातली तरी चालेल , अर्धा चमचा मिठ , वेलची पावडर , केशर असेल तर उत्तमच नसेल तरीही चालेल , रंग जास्त सुंदर दिसण्यासाठी आवडत असेल तर किंचीत खाण्याचा केशरी, पिवळा रंग . आवडत असेल त्यांनी वरून चाट मसाला , भाजलेली किंचीत जिरेपुड घालावा .

कृती : प्रथम कैऱ्या स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून ,पुसून त्याची साले काढून घ्यावीत . नंतर त्या चिरून सर्व गर काढुन घेउन मधली कोय बाजूला काढावी . वाया न घालवता ती सांबर, आमटीत घातली तर खूप चवदार होते . नाहीतर कोय तशीच ठेवून कैऱ्या उकडायला ठेवून नंतर काढली तरी चालेल . फोडी कुकरच्या डब्यात थोडेसे पाणी घालून गॅसवर ठेवून 2 शिट्ट्या झाल्या की बंद करून वाफ गेली की बाहेर काढून घ्याव्यात . मग त्यातील कोयी काढल्या नसतील तर काढाव्यात आणि मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित फिरवून घ्यावा .त्यामुळे कैरीतील गाठी किंवा रेषा असतील तर त्या फिरवल्यामुळे जाउन गर एकजीव होइल .नंतर त्यात कैरीच्या आंबटपणा जसा असेल त्यानुसार दिडपट ते दुप्पट गुळ घालावा . मिठ घालावे . केशर किंवा रंग घालावा थोडी वेलची पावडर घालावी आणि मग पुन्हा एकदा सर्व मिक्सर मधून मस्त फिरवावे म्हणजे गुळ बारीक होऊन लगेंच त्यात विरघळेल आणि एकत्र सर्व फिरवाल्यामुळे मस्त रंग सुद्धा येतो . हे असेच घट्ट झाकणाच्या बाटलीत घालून फ्रिज मध्ये ठेवले तर पंधरा दिवशी व्यवस्थित राहते . पण 2..3 महिने टिकवायचे असेल तर ते एका कढईत काढून एक उकळी येऊ द्यावी म्हणजे त्यातील असलेला पाण्याचा पूर्ण अंश जाईल आणी गुळातसुद्धा काही ओलावा असेल तर तो गेल्यामुळे आता हे थंड झाल्यावर बाटलीत भरून फ्रीझ मध्ये ठेवले की 2..3 महिने सुद्धा छान राहते .मग जेंव्हा वाटेल तेंव्हा झटपट बनवून त्याचा आस्वाद आनंदाने घेऊ शकतो…

पन्हे बनवण्याची पद्धत : पन्हे बनवणे यामुळे अगदीच सोपे आहे. प्रथम एका काचेच्या ग्लासमध्ये 4..5 चमचे बनवून ठेवलेले इन्स्टंट सिरप घालून त्यात चालत असेल तर बर्फ , चिमूटभर वेलची पावडर ,थंड पाणी घालून ढवळावे. आवडतअसेल तर किंचीत जिरेपूड, चाट मसाला घालून वर सजावटीसाठी केशर काडी घालून थंडगार द्यावे. आयत्या वेळी वेलची पूड घातल्यामुळे मस्त स्वाद येतो .

वैशिष्टय : उन्हाळ्यात शरीरातील पाणी खूप कमी होते त्यामुळे शरीराला जास्तीतजास्त पाण्याची आवश्यकता भासते .त्यासाठी कैरीचे पन्हे हा बेस्ट पर्याय आहे . ते शरीरातील पाण्याची पातळी कायम तर राखतेच पण त्याचबरोबर शरीरात थंडावा निर्माण करण्याचे कामही करते.उत्साह वाढवून अनेक व्हिटॅमिन्स मिळतात.उन्हाळा बाधत नाही.शक्यतो गुळा चे बनवले तर जास्त फायदे मिळतात.आता गुळ सुद्धा खूप छान मिळतो. त्यातून आयर्न, कॅल्शियम,फॉस्फरस , मॅग्नेशियम, मॅगनिज, सेलिनियम् ,कोलिन, बेटेन, बी 6, बी 12, सी, तसेच प्रथीनेसुद्धा मिळतात. त्यामुळे बीपी, ऍसिडिटी, मुत्रपिंडाचे आजार, संधीवात,ऍनिमिया दूर करण्यास मदत होते. त्वचेचे. सौन्दर्य छान राखणे, पचनशक्ती वाढवणे, हाडे मजबूत करणे, लठ्ठपणा कमी करणे, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे असे असंख्य फायदे होतात. एखाद्या जादुई औषधासारखे हे लाभदायक असल्यामुळे उन्हाळ्यात सर्वांनीच पन्हे पिणे फायद्याचेच आहे.nशिवाय टेस्टी असल्यामुळे नक्कीच सर्वजण भरपूर आवडीने पिणार यात शंकाच नाही.

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments