“कंघी क्रिस्पी कुरकुरे”
आषाढ महिना पाहता पाहता संपत सुद्धा आला. अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत आपल्या जिभेचे लाड पुरवण्याचे, खमंग, मस्त तळलेले पदार्थ खाण्याचे ! मग एकदा श्रावण सुरु झाला की उपवास, सणवार सुरू होतात. म्हणून म्हटले, आज काहीतरी मस्त हटके अशी डिश बनवूया. चला मग लगेच लागू या तयारीला
साहित्य : 1 वाटी कणीक, अर्धी वाटी तांदूळाचे पीठ, पाव वाटी रवा, तिखट, मीठ, चाट मसाला, पिझ्झा मसाला, मिक्स हर्बस धणे, जिरे, ओवा, बडीशेप हळद सर्व प्रत्येकी 1 चमचा, तेल.
कृती : प्रथम एका बाऊल मध्ये कणिक,तांदूळाचे पीठ रवा, तिखट, मीठ, हिंग, ओवा, हळद सर्व घालावे. छोट्या खलबत्त्यात धणे, जिरे व बडीशेप किंचित जाडसर कुटून घ्यावी. 3 चमचे तेल कडकडीत गरम करून त्यावर घालावे. लागेल तसे पाणी घालत घालत घट्ट भिजवून घ्यावे. साधारण अर्धतास घट्ट झाकून ठेवावे. नंतर तेलाचा हात लावून छान मळून घ्यावे. तेलाचा हात लावत लावत छोटे छोटे गोळे करून ते दाबून किंचित चपटे करून ठेवावेत.
मग एक मोठ्ठया दातांचा नवीन कोरा कंगवा घ्यावा. त्यावर तो चपटा केलेला गोळा अगदी हलक्या हातानी दाबत दाबत एका बाजूने सावकाश गुंडाळत शेवट पर्यंत गुंडाळून रोल बनवावा. असे सर्व रोल्स बनवून ठेवावेत. नंतर गॅस वर कढई मध्ये तेल गरम करून त्यात 1 रोल घालून तेल चांगले तापून त्यात रोल विरघळत नाही याची खात्री झाली की सर्व रोल घालावेत व लालसर रंगावर खुसखुशीत होईपर्यंत छान तळून ठेवावेत. नंतर एका पसरट डिश मध्ये मिक्स हर्बज व चाट मसाला मिक्स करून त्यात हे गरम कुरकुरे व्हायस्थित घोळवावेत. हे गरम छानच लागतात पण थंड झाल्यावार सुद्धा जास्त क्रिस्पी व खुसखुशीत लागतात.
वैशिष्ट्य : हे कुरकुरे भरपूर दिवस छान राहतात. त्यामुळे आधी वेळ असेल तेंव्हा करून ठेवले तरी चालतात. टाईम पास म्हणून खाण्यासाठी, प्रवासात, डब्यात कुठेही खाल्ले तरी चटपटीत व खास चवीमुळे सर्वांनांच आवडतील आणि बडीशेप, धणे, जिरे यांच्या जाडसर पावडरमुळे जास्तच चवदार व क्रिस्पी लागतात. कंगव्याचे खूप छान डिझाईन त्यावर आल्यामुळे हे तयार कुरकुरे दिसायलाही खूपच आकर्षक दिसतात.

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800