“षड्रसयुक्त कोकम चटणी”
कोकणात कोकम म्हणजेच आमसुले आणि नारळ ताजे, सुंदर मिळतात. त्यामुळे इथे षड्रसयुक्त कोकम चटणी खूपच चविष्ट होते. एरव्ही खोबरे, शेंगदाणे, नारळ, कारळ, जवस या चटण्या सगळेच बनवतात किंवा ओली चटणी म्हटली की चिंच गुळाची किंवा टोमॅटोची बनवली जाते. पण ही आमसूलाची अशा प्रकारे चटणी बनवली तर सगळेजण नक्कीच आवडीने खातील.
ही चटणी बाराही महिने बनवता येते. फ्रीझमध्ये ठेवली तर भरपूर दिवस मस्त राहते.
श्राद्ध किंवा पक्षात पितरांना सर्व चवी, सर्व रस खाऊ घालून तृप्त करावे अशी भावना, श्रद्धा असल्यामुळे दरवर्षी सर्व रस, सात्विक अन्न जेवायला घालावे अशी सर्वांची भावना असते. त्यामुळे दरवर्षी ठराविक पद्धतीने केलेला स्वयंपाक, ठरलेलेच पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. त्यात या आमसूलाच्या चटणीला विशेष महत्व आहे कारण यातून सर्व रस पितरांना मिळतात. म्हणून तेच पदार्थ वापरून थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले तर चवीत छान बदल मिळाल्यामुळे सर्वजण नक्कीच तृप्त होतील. मग पहायची आहे ना करुन..
साहित्य :
८-१० आमसुले, १ मोठा आवळा, अर्धी वाटी खोवलेला नारळ, ८-१० खजूर, अर्धा चमचा ओवा, आवडीनुसार लाल तिखट, सैंधव, हिंगपूड, ५-६कढिपत्त्याची पाने, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तेल, किंचित आले, मोहरी, थोडेसे मेथीदाणे, एक लाल मिरची.
कृती :
बिया काढून खजूर व आमसुले कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. भिजून मऊ झाले की पाण्यातून काढून त्यामध्ये आवळ्यातील बी काढून त्याच्या फोडी, नारळ, ओवा, आले, थोडे जिरे,व चवीप्रमाणे सैंधव व लाल तिखट घालून मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.काचेच्या बाऊल मधे काढून घ्यावी. तेलात मोहरी, मेथ्या, जिरे, हिंग, कढीपत्ता, एक लाल मिरची यांची खमंग फोडणी करून चटणीवर घालावी.
वैशिष्ट्य :
आंबट, गोड, खारट, तुरट, तिखट, कडवट असे षड्रस, सहा चवी एकत्र जमल्याने खूपच चवदार लागते. शरीरासाठी आवश्यक असे हे सहा रस आरोग्यवर्धक आहेत. आवळा,आमसुले, आले यानी ही चटणी पाचक आणि पित्तनाशक तर मेथ्या, हिंग, कढिपत्ता कृमीनाशक आहेत. गुळ किंवा साखर न वापरता खजूर वापरल्यामुळे गुणाकारी आहे.अशी ही बहुगुणी चटणी जेवणात किंवा स्टार्टर बरोबर किंवा वडे, ढोकळा, कोथिंबीर वड्या या सारख्या पदार्थांबरोबर खाता येते.
श्राद्धाच्या वेळी किंवा पितृ पक्ष पंधरवड्यात आमसुलाची चटणी आमसुले, जिरे, आले, गुळ, मिठ घालून वाटून बनवतातच त्या ऐवजी थोडा बदल करून अशी बनवली तर सर्वांनाच आवडेल.

— लेखन : सौ.स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800