Thursday, November 13, 2025
Homeकलास्नेहाची रेसीपी : ३५

स्नेहाची रेसीपी : ३५

“साताऱ्याचा साद्या”

काही पारंपारीक पदार्थ हे अगदी पुन्हा पुन्हा आठवले की करायचा, खाण्याचा मोह आवरत नाही. सातारा स्पेशल ‘साद्या’ आणि ‘म्हाद्या’ हे पदार्थ तसेच ! खमंग खाण्याची लहर आली किंवा एखादेवेळी भाजी, चटणी वगैरे बनवण्याचा कंटाळा आला की हे प्रकार हमखास बनायचे. करायला सोपे, बनतात झटपट आणि खायलाही चटपटीत !

तसा ‘म्हाद्या’ बऱ्याच जणाना माहिती असलेला पदार्थ आहे. पण ‘साद्या’ तसा कमी लोकांना माहिती असेल. साधारण सारखेच असलेले हे मिरचीचे कालवणं खूपच खमंग, पौष्टिक आहे. मग पाहायचे ना करून ?

साहित्य :
अर्धी वाटी उडीद डाळ, 1 वाटी कांदा मध्यम चौकोनी चिरलेला, 8..10 लसूण पाकळ्या, 7..8 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 2..3 चमचे तेल, मोहरी, जिरे, हिंग, चवीनुसार मीठ.

कृती :
प्रथम उडीद कढईमध्ये खमंग लालसर भाजून त्याचे मिक्सर मधून जाडसर पीठ बनवावे. यालाच डांगर असेही म्हणतात. मग मिरच्या, लसूण, कोथिंबीरीचा जाड कुटून ठेचा बनवावा. ही पूर्वतयारी झाली की मग साद्या अगदीच झटपट बनतो.
साद्या बनवण्यासाठी गॅसवर शक्यतो लोखंडाची कढई किंवा खोलगट तवा असेल तर ठेवून त्यात 2..3 चमचे तेल घालावे. तेल छान गरम झाले की त्यात मोहरी व जिरे घालावेत. ते मस्त तडतडल्यावर मग त्यात हिंग घालून कांदा घालावा व त्यावर झाकण ठेवावे. गॅस एकदम मंद ठेवावा. दोन मिनिटांत कांदा छान वाफून त्याचा रंग बदलेल. मग झाकण काढून त्यात आपण बनवलेला ठेचा घालावा आणि तो किंचित परतून लगेच त्यात 3..4 चमचे पाणी घालावे व झाकण ठेवावे म्हणजे मिरच्यांचा खाट होणार नाही. मग एक दोन मिनिटानी झाकण काढून त्यात उडीदाचा बनवलेला डांगर घालावा. चवीनुसार मीठ घालावे व सर्व छान परतावे. लागल्यास वरून थोडीशी तेलाची 1 चमचा धार घालावी व झाकण ठेवून गॅस बंद करावा. त्या वाफेवर हा साद्या छान वाफतो . आता आपला साद्या खाण्यासाठी तयार आहे. तो सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून ठेवावा.
जेवताना ताटात हा साद्या भाकरी किंवा पोळी सोबत भाजी, चटणी सारखा खाऊ शकतो. जोडीला ताक किंवा दही, कांदा असेल तर मग मस्त मेजवांनी होते.

वैशिष्टय :
म्हाद्या बनवण्याची आणि साद्या बनवण्याची साधारण पद्धत सारखीच आहे. पण म्हाद्यात आपण शेंगदाण्याचे कुट घालतो तर साद्या मध्ये उडीदाचा डांगर घालतात. उडीदाची डाळ तब्येतीसाठी खूप लाभदायक असते. शिवाय ती लालसर खमंग भाजल्यामुळे खूपच खमंग स्वाद येतो. जाडसर डांगर बनवल्यामुळे चिकट होत नाही. शेवटी वरून तेलाची धार सोडल्यामुळे वाफतो पण छान आणि पचायला हलका होतो. मिरच्यांचा तिखटपणा बाधत नाही आणि छान चमक येते. हा साद्या मस्त झणझणीत बनतो खाताना खूप मजा येते.

कमीतकमी आणि घरात असलेल्या साहित्यात आणि झटपट बनणारा असा हा खमंग व पौष्टिक ‘साद्या’ डब्यासाठी भाजी, चटणी नसेल घरात तेंव्हा किंवा बनवण्याचा कंटाळा येईल तेंव्हा नक्की करून पहा.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !