Tuesday, September 16, 2025
Homeलेखस्पर्श…...

स्पर्श……

आजी, “अरे बाळा तुझ्या बाबाना जरा फोन लावून दे, गेल्या आठवड्यापासून बोलणं झालं नाही.” मोबाईल गेममध्ये रमलेला नातू मान वर करून आजीकडे बघण्यास पण तयार नव्हता.

आजीची अस्वस्थता वाढत चाललेली होती. आजी आत बाहेर करू लागली. आज तिच्या लाडक्या लेकाचा वाढदिवस आणि त्याला आशीर्वाद देणं, त्याचा आवाज ऐकणं यासाठी आजी आतुर झालेली. मुलगा कामानिमित्त परदेशी गेलेला. “आजी बाबा ऑनलाइन आहेत, थांब मी मेसेज करतो तू त्यांना मिस करतेय, आणि त्यांना हॅपी बिर्थडे पण म्हणतो तुझ्या कडून.” “अरे पण मला तर बोलू दे त्याच्याशी”. नातू परत मग्न मोबाईल मध्ये, “आजी थांब ग महत्वाचा मूव्ह आहे. आणि तुझा मेसेज पाठवलाय मी. बाबांनी स्माईल इमोजी पाठवलाय तुझ्यासाठी. थांब एक फोटो पण पाठवतो तुझा बाबा ला, एक अँप आहे त्यात फोटो मध्ये डोळ्यात पाणी आणता येतं, ते शोधतोय.”

नातू मोबाईलमध्ये डोळ्यात पाणी दाखवणारा अँप शोधत होता आणि आजीचे डोळे काठोकाठ भरून वाहत होते…..

आजी एका मायेच्या स्पर्शाला आसुसली होती. तो स्पर्श ती आपल्या मुलाच्या आवाजात शोधण्याचा प्रयत्न करत होती. पण तो ही तिला मिळू शकला नाही.

मानवी मन हे प्रेमाच्या ओल्या स्पर्शासाठी आतुर असतं, स्पर्श ही मानवी शरीराची नव्हे तर मनाची सगळ्यात मोठी गरज आहे. ही गरज मानवी मनाला कधी ऊब तर कधी ओलावा जाणवून देते. कधी नवजीवन तर कधी जगण्याला उभारी देऊन जाते. एखादा मायेचा, प्रेमाचा क्षण भराचा स्पर्श कायमचे ऋणानुबंध जोडून जातो. या स्पर्शाची तहान भागवण्यासाठीच मन अविरत नात्यांच्या शोधत असतं. घट्ट गुंफलेले हात मनाला ऊब देत असतात.

अन्नपूर्णा आश्रमात शिरताच गालावर ओघळणाऱ्या अश्रुंच्या स्पर्शाने तिच्या बालपणीच्या आठवणी चिंब झाल्या. आश्रमाच्या दारा जवळ एक गोड मुलगी बसली होती. बाहुलीचे नवीन परकर पोलके शिवायचे म्हणून ती लहान मोठ्या आकाराच्या चिंध्या जोडू लागली. बाहुलीचे निळे खोल डोळे तिच्याशी बोलत होते जणू..इवल्या इवल्या हाता बोटांनी ती इटूकले पिटुकले धागे भरू लागली. कुरळ्या केसांच्या बटा गुलाबी गालावर, टपोऱ्या डोळ्यावर खेळत होत्या. पाच वर्षा पूर्वी झालेल्या भयानक घटनेत पोरकी झाली होती ही पोरं. जीभेने स्वर शांत केले होते तिचे. पण, डोळे मात्र बोलके होते.

तिला बघताच अन्नपूर्णाला ती हवी हवीशी वाटू लागली होती. तिला तिच्या बालपणीच्या आठवणी इथे घेऊन आल्या होत्या. अठरा वर्ष ती इथेच लहानाची मोठी झाली होती. उच्च शिक्षण घेऊन आज मोठं पद मिळवलं होतं. पण मनाची पोकळी भरली नव्हती. ती गोड पोर बाहुलीत गुंग होती. अन्नपूर्णाने तिच्या डोक्यावर हात ठेवला तिचे टपोरे डोळे अन्नपूर्णाकडे रोखून बघू लागले आणि बाहुलीच्या निर्जीव निळ्या डोळ्यातून मिळणारी ऊब अन्नपूर्णाच्या डोळ्यात सजीव दिसू लागली. त्या दोघी एकमेकींचे हात धरून अनाथ आश्रमाच्या दारातून बाहेर पडल्या….

स्वतः अनाथ असण्याची पोकळी अन्नपुर्णाने त्या अनाथ मुलीच्या डोक्यावर हात ठेऊन, तिला कुशीत घेऊन त्या मायेच्या स्पर्शाने भरून काढली होती. तिची आणि स्वतःची पण.

एकदा का ही कोरड भिजली की, नाजूक पालवी फुटते नात्यांना. ही कोवळी पालवी जुन्या, निबर जख्मा वर आपल्या हळूवार स्पर्शाचं मलम लावत त्या नाहीश्या करत जाते.

चंदनाचा सुगंध दरवळला होता देवघरात. मधुराचे हात पण सुगंधी झाले होते. मंदार साखर झोपेत होता, कपाळावर फिरणाऱ्या तिच्या हाताचा स्पर्श त्याचे श्वास सुगंधी करून गेला. तिची तयारी झाली होती.

मधुराच्या सर्व हालचाली त्याच्या सरावाच्या होत्या. तरी रोज तेच तो नित्य नव्याने न्याहाळत असे. बाहेर जाताना त्याच्या कपाळावर हळुवार होणारा तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या जगण्याचा अर्थ होता.

बाहेरून कुलूप लावून ती निघाली. गेली दोन वर्षे तो असाच स्तब्ध होता आणि ती सर्वस्व पणाला लावून नियतीशी दोन हात करत होती. आज उपचारांनी तो बरा होणार की नाही हे कळणार होतं.

संध्याकाळी ती घरी आली. तो डोळ्यात प्राण आणून तिची वाट बघत होता. उपचार होणार की नाही हे जाणुन घेण्यासाठी तो अधीर झाला होता. तिने ओठांनी त्याच्या कपाळावर स्पर्श केला आणि त्याचे ऑफिसचे कपडे, फाईल्स नीट लावायला घेतल्या. दोघांच्या डोळ्यातून आनंदअश्रू ओघळत होतें आणि ते थांबेचना….

अपघात झाल्या पासून दोन वर्षापासून मंदारच्या शरीराला कुठलाच स्पर्श कळत नव्हता. त्याच्या मनाला जाणवत होता तो फक्त मधुराचा स्पर्श. आणि त्या स्पर्शानेच त्याला जिवंत ठेवलं होतं. सहजीवनाची ही बाग त्यांच्या मनाच्या स्पर्शाने फुलली होती. सुगंधित झाली होती.

भावना नसतील तर शरिराला ही स्पर्श कळत नाही. एकदा का भावना नसल्या की स्पर्शचं सौंदर्य मन फुलवून जातं. दगडी झालेल्या शरीराला नवी पालवी देऊन जातं.

डॉ राणी खेडीकर

– लेखन : डॉ राणी दुष्यंत खेडीकर, बालमानस तज्ञा
अध्यक्षा, बालरक्षक प्रतिष्ठान, मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments