Saturday, March 15, 2025
Homeलेखस्फूर्ती देवता

स्फूर्ती देवता

शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा असणारे “सार्वजनिक वाचनालय, कल्याण” द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “माझे प्रेरणास्थान
या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेला ज्योत्स्ना तानवडे यांचा निबंध पुढे देत आहे. तानवडे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन.
– संपादक

“स्फूर्ती देवता
“माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वा” चा विचार करीत असताना “घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे” या प्रसिद्ध भावगीताप्रमाणे माझी अवस्था झाली. माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्व घरातच असताना का शोधाशोध करायची ? या व्यक्तिमत्त्वाने माझ्या जन्मापासून माझे संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलेले आहे. “जिच्यामुळे माझे अस्तित्व ते प्रभावी व्यक्तित्व” म्हणजे माझी आई माझी.

माझी आई ती. मालतीबाई बाळकृष्ण देव ही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील सुप्रसिद्ध वकील श्री. आप्पासाहेब देव यांची पत्नी. आई म्हणजे एक अतिशय कणखर, प्रभावी, हुशार, आदर्श व्यक्तिमत्व होतं. गोरी, उंचीपूरी, लांबसडक केसांचा अंबाडा, त्यावर गजरा किंवा वेणी, चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि मोजके ठसठशीत दागिने घातलेली आई एकदम भारदस्त, रूबाबदार दिसायची‌.

आईचं माहेर दहिवडी. सातारा जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. बापूराव कुबेर यांची ती सर्वात धाकटी कन्या मुक्ताबाई. ती खूप लहान असतानाच मातृसुखाला वंचित झाली. पण आजोबांनी अतिशय डोळसपणे तिला वाढवले. ‘हिंगणे स्त्री शिक्षण संस्थे’त आईचे शिक्षण झाले. गाण्याच्या तीन परिक्षा झाल्या. उत्तम हार्मोनियम वाजवायला शिकली. वस्तीगृहातील कामांमुळे अनेक कौशल्यं शिकत स्वावलंबी बनली.
लग्नानंतर आई वाईला आली. तिथून दीड-दोन वर्षात १९४८ साली माळशिरसला बिऱ्हाड केले. आई माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली. तिथे खूप सुबत्ता पण होती. तरीही माहेरचं ऐश्वर्य सोडून ती आपल्या संसारात मनापासून रमली.

सुरुवातीच्या काळातली दगदग, त्रास, कष्ट तिने आनंदाने सोसले. आनंदी सहजीवनाची ही पायाभरणी होती. हळूहळू संसाराची घडी बसत गेली. गावाजवळच्या शेतात घरही झाले. पण तिथे लाईट यायला मात्र १९७० साल उजाडावे लागले. तोपर्यंत कंदीलाची सोबत होती. सर्व कामे घरातच करावी लागत. आजच्यासारखे तयार काहीच मिळायचे नाही. जात्यावर दळायचे, चुलीवर स्वयंपाक. दिवसा कामाच्या व्यापातून सवड नाही मिळाली तर रात्री जागून फराळाचे करायचे. आई अतिशय सुगरण. सर्व फराळाचे पदार्थ, रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करायची.

खरंतर आई अतिशय कलासक्त होती. अनेक गोष्टींमध्ये ती पारंगत होती. प्रत्येक गोष्ट ती अगदी मनापासून करायची. तिला फुलांची खूप आवड होती. गजरा, वेण्या करून सर्वांना देण्याची भारी हौस. स्वतः अंबाड्यावर वेणी घातल्याशिवाय ती कधी बाहेर जायची नाही. आई आणि फुलाचा गजरा हे समीकरण अजूनही सर्वांना आठवते. घरी रवा पिठी काढून उत्तम शेवया करायची. चिरोटे तर अगदी अलवार व्हायचे. क्रोशाचे विणकाम, मण्याची तोरणं, वायरच्या पिशव्या बनवायची. त्या त्या काळातल्या प्रचलित गोष्टी ती शिकत, करत गेली. पण कोणतीही गोष्ट आखीव रेखीव करण्यात तिचा हातखंडा होता. स्वयंपाक करताना अगदी कोशिंबीर असो, भाजी असो, पोळ्या भाकरी असो नाहीतर पक्वान्न ते अगदी पद्धतशीर निगुतीनेच झाले पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा. घाई गडबडीने गोष्टी ‘उरकणे ‘हे तिला मान्यच नव्हते. त्यामुळे स्वयंपाकाची नेहमी पूर्वतयारी सज्ज असायची.

कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची भारी हौस. वयाच्या ७०व्या वर्षी क्राॅसस्टिचचे विणकाम तर ७५ व्या वर्षी पोतीच्या मण्यांचे दागिने करायला शिकली. अनेक स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवली. शेवटपर्यंत तिच्या मनातलं हे उस्फुर्तपण जागं होतं.

शिस्त हा तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. कसलाही कंटाळा न करता वेळच्यावेळी कामे करी. कोणतीही लहान मोठी गोष्ट गरजेला ऐनवेळी हातात हजर असे. आई कधीच दुर्मुखलेली किंवा अव्यवस्थित नसायची. नेहमी नीटनेटके आवरून उत्साही, आनंदी असायची. सर्व कामे चटाचट उरकून पोथी वाचे, आवडीचे काम करत असे. वर्तमान पत्र वाचून राजकीय, सामाजिक गोष्टींबाबत सजग असायची.

आपल्या बोलक्या स्वभावामुळे तिने खूप माणसे जोडली होती. स्मरणशक्ती चांगली. त्यामुळे नावे, इतर संदर्भ लक्षात राही. त्यामुळेच ती वैयक्तिक संवाद छान साधू शके. त्यातूनच जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते. कुणाच्याही आनंदात ती चटकन सामील व्हायची आणि दुःखात मदतीला जायची. त्यामुळे लोकंही तिला खूप मानत असत. माणसं जोडण्याची आईची ही कला शिकण्यासारखी आहे.

संसारात तिलाही अडचणी, संकटं आली‌. पण ती कधी खचली नाही. कायम वडिलांच्या साथीला खंबीरपणे उभी राहिली. वडील सोलापूर जिल्ह्यातले निष्णात वकील होते. पण सुरुवातीचे दिवस खूप दगदगीचे होते. वकिली व्यवसाय वाढवण्यासाठी आईने खूप मदत केली. एसटीची सोय नसल्याने खेडेगावातून आलेले पक्षकार रात्री मुक्कामाला रहात. त्यांना आई स्वतः जेवण बनवून देई. दिवसाही कुणी ना कुणी पंगतीला असेच. यातूनच अनेकांशी कायमचे ऋणानुबंध जुळले.

आई वडील श्रद्धाळू, भाविक होते. खूप गोष्टींवरची त्यांची श्रद्धा डोळस होती. गावातल्या मारुतीरायाला अनेकदा तिने दिवे लावण्याचा नेम केला होता. याचे नक्की फळ तिला काय मिळाले हे सांगता येणार नाही. पण तिला मानसिक बळ नक्की मिळायचे. त्यासाठी गावात चालत जाणे, वेळ पाळणे आवश्यक होते. चालण्याने व्यायाम व्हायचा. यामागे काहीतरी नेम केला की हातून देवाची सेवा नियमितपणे होते हे विचार सूत्र होते. यातून मन प्रसन्न राहायचे हे मात्र खरे.

आई वडीलांची पांडुरंगावर खूप श्रद्धा होती. दोघांनाही वारीची आवड होती. आईने ३०-३२ वर्षे तर वडिलांनी १७ – १८ वर्षे वारी केली. वारीला जाऊन आल्यावर आपला दृष्टिकोन बदलतो. गरजा कमी होतात हे आई वडिलांच्या वागण्यातून जाणवायचे. आईने सुरवातीला ओढग्रस्त सोसली तशीच अगदी भरभराट पण उपभोगली. पण कसला हव्यास नव्हता. आहे त्यात आनंद मानायची समाधानी वृत्ती होती.

मला गाण्याची आवड लागली ती आई वडीलांमुळेच. दोघांचेही आवाज छान होते. आईच्या तर परीक्षा झालेल्या होत्या. घरी पेटी, तबला, मृदुंग होता. दर गुरुवारी भजन होत असे. दारापुढच्या ओट्यावर रात्री जेवणानंतर आमच्या सगळ्यांच्या गाण्यांनी रंगलेल्या खूप चांदरात्री आठवतात.
यातूनच माझी शब्दांशी, सुरांशी मैत्री झाली. वडीलांना मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत सर्व भाषा उत्तम अवगत होत्या. प्रचंड पाठांतर होते. त्यांचे वक्तृत्व ओघवते आणि लिखाणात शारदेचा वरदहस्त लाभलेला होता. हीच शब्दांची ओढ, लिखाणाचे थोडे कसब मला त्यांच्याकडून लाभले हे माझे मोठे भाग्य आहे. वडिलांनी व्यवहारज्ञान दिले, अभ्यासातली कौशल्य शिकवली. तर आईने संसार सुखाचा होण्याची गुपितं शिकवली.

त्यांनी आम्हा भावंडांना अतिशय डोळसपणे खूप चांगले घडवले. वडील कधी पुण्या मुंबईला गेले की तिथून उपयोगी अशा नव्या वस्तू, पुस्तके, गावात जे मिळायचे नाही ते आवर्जून आणायचे. आपण खेड्यात राहतो म्हणून मुले नवीन गोष्टींपासून वंचित राहू नयेत हा दृष्टिकोनच खूप मोठा होता.
आईवडील अतिशय धोरणी होते. आम्ही कॉलेजला जायच्या वेळेस त्यांनी पुण्यात घर घेतले होते .आम्ही चार भावंडे तिथेच राहून शिकलो. आम्ही दोघी बहिणी घरी स्वयंपाक करायचो. त्यासाठी आई माळशिरसहून सतत मसाले, चटण्या, पीठे, फराळाचे पाठवायची. या प्रात्यक्षिकामुळे लग्नापूर्वीच आम्ही बहिणी तयार झालो होतो.

आई-वडिलांचे सहजीवन अतिशय आदर्श होते. दोघांनीही एकमेकांना मान देत कायम योग्य आदर केला. त्यांच्यातही मतभेद असतीलच पण ते कधी उघडपणे सर्वांसमोर आले नाहीत. अगदी आमच्या सुद्धा. कधीच टोकाची भूमिका नसायची. जे करायचं ते एकमेकांच्या साथीनंच. तो काळ एकमेकाबद्दलच्या भावना बोलून दाखवण्याचा नव्हताच. पण न बोलताच दोघेही एकमेकांच्या आवडीनिवडी जपत, कौतुक करीत. आईला जेवायला थोडा जास्त वेळ लागायचा तर स्वतःचं जेवण झाल्यावरही वडील तिच्यासोबत गप्पा मारत बसायचे. ती भाजी निवडत असेल तर ते पण निवडू लागत. ह्या गोष्टी जरी लहान असल्या तरी त्यांचं प्रेम यातून दिसून येतं. त्यामुळंच त्यांचं नातं घट्ट होत गेलं. त्या काळात घरातल्या बायकांना नुसतं गृहित धरलं जायचं. त्यांचं मत कुणी विचारायचं नाही तर निर्णय सांगितले जायचे. पण वडील प्रत्येक गोष्ट आईला सांगत असत आणि ती पण त्यांना योग्य साथ देई. ते कुठे गेले तरी तिला बरोबर नेत आणि ती पण त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी टापटिपीत असायची. दोघेही आनंदाचे, सुखाचे सहजीवन जगले. सुखी संसारासाठी हा आमच्यासाठी वस्तूपाठच आहे.

जिथे जाऊ तिथे आनंद द्यायचा हे धोरण असल्याने आई कधी कुणाकडे मोकळ्या हाताने गेली नाहीच पण तिथे गेल्यावर कामाला हातभार लावायची. हेही अंगीकारण्या सारखेच आहे. आईवडील दोघेही गावातील सार्वजनिक जीवनात एकत्र हिरीरीने भाग घेत असत. गावातल्या असंख्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले. त्यामुळे दोघेही लोकांमध्ये तितकेच लाडके, हवेहवेसे होते. यानिमित्ताने अनेक नामवंत साहित्यिक, वक्ते, नेते आमच्या घरी आलेले होते.
दुर्दैवाने वडील अचानकपणे ६६ व्या वर्षी गेले. त्यांच्या माघारी २३ वर्षे आईने दोघांचीही भूमिका उत्तम निभावली. सगळी कर्तव्यं पार पाडली. आई एवढी कर्तबगार हिंडती फिरती, आनंदी पण शेवटी तिचे हाल झाले. पडल्यामुळे ऑपरेशन झाले. त्यावेळी एक गुडघा आखडल्याने पुढे ती चालू शकली नाही. बरीच वर्षे एका जागेवरच आली. हे परावलंबित्व स्वीकारणे सुरवातीला खूप जड गेले.पण शेवटी या वास्तवाशी तिने जुळवून घेतलं. कोणते भोग वाट्याला यावेत हे आपल्या हातात नसतं हेच खरं.

आपले आईवडील तर प्रत्येकालाच प्रिय असतात. शिवाय त्याकाळी बऱ्याच अशा कर्तबगार बायका होत्या. मग आईत विशेष काय ? तर तिच्यात अनेक चांगले गुण एकवटलेले होते. तिने ते जाणीवपूर्वक जोपासले होते. ती आदर्श गृहिणी, चांगली कलाकार, हाडाची शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे तिची शिकवणच होती जे काम करायचे ते चांगलंच, सुबक, आखीवरेखीव, परिपूर्ण करायचं.
आजकाल व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक मार्ग, अनेक साधने उपलब्ध आहेत .पण आई-वडिलांच्या काळाचा विचार करता ही गोष्ट सोपी नव्हती. त्यामुळेच त्यांनी जीवनात अनेक गोष्टींमध्ये एक विशिष्ट आदर्श पातळी गाठली होती ही कौतुकाची गोष्ट आहे. एकेका क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणारे असंख्य असतात. पण सर्वच क्षेत्रात अशी आदर्श पातळी गाठणारे फार कमी असतात. अशाच लोकांपैकी माझे आई वडील होते हे विशेष आहे.

हिऱ्याला जितके जास्त पैलू तितके त्याचे मोल जास्ती. त्याप्रमाणे व्यक्तिमत्त्वाला शक्य तितके विकसित करावे. त्यासाठी अनेक कला आत्मसात करणे, अनेक गोष्टींचे ज्ञान मिळवणे, सतत नवनवीन गोष्टींचा ध्यास घेऊन त्यांचा अभ्यास करणे, जीवनाच्या सर्व अंगांचा आस्वाद घेणे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी स्वतः ती अंमलात आणलीच पण आम्हालाही ते बाळकडू दिले. आज कोणतीही नवीन गोष्ट करताना त्यांच्या विचारांनी नवीन उभारी मिळते. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते आणि काही अंशी त्यात यशस्वी झाले आहे ही समाधानाची बाब आहे.
आईवडीलां पैकी फक्त एकाचेच स्वतंत्र कर्तृत्व सांगता येणार नाही. त्यात दुसरा सहभागी असायचाच इतके त्यांचे जीवन एकमेकांत मिसळून गेलेले होते. याचा नुकताच आम्ही अनुभव घेतला. २०२२ साली वडिलांची जन्मशताब्दी होती. त्या निमित्ताने आम्ही त्यांच्या स्मृतींचे पुस्तक काढले. तर नातेवाईक, स्नेही यांच्या लेखांचा वर्षाव झाला. वडिलांना जाऊन ३४ वर्षे तर आईला जाऊन ११ वर्षे झालीत. पण अजूनही लोक त्यांना विसरलेले नाहीत. त्यांच्या आठवणींचे, सहवासाचे वर्णन वाचून मन भरून आले. सर्वांनीच दोघांबद्दल अगदी भरभरून लिहिले आहे. संत कबीरजींचा एक दोहा आहे,

“कबीरा जब हम
पैदा हुए
जग हॅंसे हम रोये
ऐसी करनी कर चलो
हम हॅंसे जग रोये”

या उक्तीप्रमाणे आईवडील जगले आणि आमच्यासाठी मोठा आदर्श घालून दिला आहे. आज समाजात कुटुंब व्यवस्थेला हादरे बसत आहेत. अशावेळी आई-वडिलांच्या शिकवणीची गरज अधोरेखित होते. म्हणूनच हे स्मरण.

प्रत्येक व्यक्तीमधे अधिक-उणे असतेच. पण ज्यांच्या व्यक्तिमत्वात अधिकांची बेरीज जास्ती तेच आदर्श होतात. म्हणूनच माझी आई माझ्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी प्रेरणादायी व्यक्ती आहे.

माहेरच्या पायरीला
टेकविला माथा
जिने जीवनविद्येची
शिकविली गाथा ….

ज्योत्स्ना तानवडे

– लेखन : ज्योत्स्ना तानवडे. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments