किती रोमांचकारी दिन ते
त्या चोरुनी गाठी भेटी
ते काळजांत धडधडणे
त्या मोरपिशी स्पर्षाची आवड मोठी…..
ती मूकभाषा नजरेतली
ते लाजणे ते मुरकणे
द्दृष्टीआड होताच तू
अधीर मनाचे हिरमुसणे…….
ती प्रतीक्षा त्या तरूतळी
रूबाबदार चाल ती
दुरुनीच तुला पाहतांच
विलग अधर हासती……..
त्या रेघोट्या पुळणीवरच्या
ती सागराची भरती
लहरींवर लहरी उठती
प्रीतीच्या उर्मी उसळती………
अवचित मेघांचे बरसणे
करांत कर घेऊनी भिजणे
दोघांत एकच भुट्टा खाणे
रम्य आपुले जीवनगाणे………
दोघांमधले तू तू मै मै
येती नयनी आसू
अल्पशा त्या कलहानंतर
फुटती ओठी हासू………
कधी मी होता नजरेआड
जीव तुझा झाला कासावीस
नको ना जाऊ एकटी
आहे मी तव सोबतीस………
गजरा गुंफला प्रीतीचा
सुगंध भरला जीवनी
बंद कुपीत अंतरीच्या
स्मृतीगंध दरवळे अजुनी…….
– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
अरुणा मुल्हेरकर यांची स्मृतीगंध ही काव्यरचना फार आवडली..
हळुवार आणि भावुक..तितकीच लडीवाळ..
शब्दांची नाजुक गुंफण…