Sunday, September 8, 2024
Homeबातम्यास्मृतीगंध : काॅम्रेड मदन फडणीस

स्मृतीगंध : काॅम्रेड मदन फडणीस

“अनंत रुपे अनंत वेषे, देखिले म्या त्यासी ।
बाप रखुमादेवीवरू खुण बाणली कैसी ॥

संत ज्ञानेश्वरांना जो परमात्मा “बाप” विठ्ठल रूपात गवसला, त्याला साष्टांग वंदन करून, मी माझ्या विठ्ठलरूपी “बापा”ला म्हणजेच माझे वडील एडव्होकेट काॅम्रेड मदन फडणीस ह्यांना त्यांच्या दिनांक २३ सप्टेंबर, २०२३ रोजी झालेल्या जन्मशताब्दी निमित्त आणि दिनांक २ मार्च, २०२४ रोजी त्यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली अर्पण करत आहे.

माझे वडील काॅम्रेड मदन फडणीस हे केवळ स्वतःच्या तीन कन्यकांचे वडील म्हणून मर्यादित न राहता “हे विश्वची माझे घर” असे म्हणत अनेक कामगारांचे मायबाप झाले, लाखो मजुरांच्या कुटुंबांचे आधारस्तंभ झाले, आणि असंख्य गोरगरिबांचे आश्रयदाता ठरले.

दिनांक २ मार्च, २००९ रोजी माझे वडील काॅम्रेड मदन फडणीस ह्यांच्या निधनाची बातमी वाचून, ऐकून, कामगार विश्वात जो दु:खाचा महापूर आला आणि त्यांच्या निर्वाण यात्रेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामगार बंधूभगिनींचा जो अलोट लोंढा मुंबईत येऊन पोहोचला, तो अवर्णनीय आहे. आपल्या कुटुंबप्रमुखाचे, आपल्या अन्नदात्याचे निधन झाल्याची पोरकेपणाची भावना त्यामध्ये होती. ह्या व्यक्तीच्या तीन कन्यांचे सांत्वन करण्याचा खोटा आवेश त्यामध्ये नव्हताच ! उलट गरज होती, ती त्यांच्या सांत्वनाची; तुम्ही पोरके झालेले नाहीत, तुम्हाला आधार देण्यासाठी मदन फडणीसांचा परिवार कटिबद्ध आहे, हे समजावून सांगण्याची ! म्हणूनच काॅ. मदन फडणीस ह्यांच्या कनिष्ठ कन्या सौ.सोनल साटेलकर व तिचा पुत्र डाॅ. अद्वैत साटेलकर ह्यांनी काॅ. फडणीस ह्यांच्यावर अंत्यसंस्कार करतानाही “काॅम्रेड मदन फडणीस अमर रहे, अमर रहे” हा जयघोष केला आणि आम्ही दोन्ही ज्येष्ठ कन्या सौ.मृदुला राजे व सौ.प्रतिमा बावकर ह्यांनी कामगारांच्या स्वरात स्वर मिसळून त्यांना “लाल सलाम, लाल सलाम” अशी सलामी दिली.

आपले वडील हा एका कुटुंबापुरता सीमित “बाप” नाही, तर ह्या लक्षावधी कामगारांना विठ्ठल स्वरूप भासणारा “मायबाप” आहे, ही जाणीव आम्हाला त्यांच्या विरहवेदना दूर करताना चंदनाच्या लेपासारखी शीतल, शांत वाटत होती आणि आम्हाला त्यांच्यातलेच एक झालेले पाहून त्या कामगार बंधूभगिनींचे मनोबल वाढले होते; आपण एकटे पडलेले नाही, हा विश्वास मनात जागवत आणि पुन्हा नव्याने संघटित होऊन, नवीन चळवळीत उतरण्याचा आत्मविश्वास बाळगत त्यांनी आपापल्या घरी साश्रू नयनांनी प्रयाण केले.

कामगारांच्या मनात हा विश्वास निर्माण करण्याचे काम काॅ. मदन फडणीस ह्यांचे कनिष्ठ जावई एडव्होकेट लक्ष्मीकांत साटेलकर ह्यांनी निष्ठेने केले आणि आजतागायत पुढे चालवतही ठेवलेले आहेच ; आणि मुख्य म्हणजे “मदन साहेबां”ना एक व्यक्ती नव्हे, तर एक “विचारधारा”, एक “तत्त्वप्रणाली” किंवा एक “सामाजिक उत्थान” मानणारे त्यांचे अनेक सहकारी, अनेक अनुयायी आणि कामगार विषयक कायद्याचे अनेक विद्यार्थी आज १५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतरही त्यांचे विचार पुरस्कृत करताना दिसतात, तेव्हा काॅ.मदन फडणीस ह्यांनी आचरणात आणलेला हा कर्मयोग सफल झाल्याचा आनंद मिळतो.

तरुण वयात स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेताना आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करून काॅ.मदन फडणीस ह्यांनी बी.ए.,एल.एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या आणि कामगार चळवळीत उतरण्याचे ध्येय मनाशी बाळगून तत्कालीन सरकारी नोकरीकडे पाठ फिरवली. बीबीसी ह्या रेल्वे कर्मचारी संघटनेच्या संप काळात ते प्रत्यक्ष चळवळीत उतरले आणि कामगारांचा विजय झाला. त्यांना जीआयपी रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून निर्वाचित करण्यात आले. आपले मामा, सुप्रसिद्ध कामगार कायदेतज्ञ, एडव्होकेट काॅ. के.टी सुळे ह्यांच्या हाताखाली “कनिष्ठ वकील” म्हणून ते वकिली पेशातील कार्य करू लागले. हळूहळू “कामगार पुढारी” आणि “कामगारांच्या केसेस लढवणारे यशस्वी वकील” म्हणून मदन फडणीस ह्यांच्या नावाचा बोलबाला झाला. “कामगार विषयक कायदेतज्ञ” अशी कीर्ती त्यांना प्राप्त झाली. आपली कुशाग्र बुद्धी आणि सखोल ज्ञान, ह्यांच्या बरोबरच अत्यंत सचोटीचा, निष्ठावंत आणि “पैशाने विकत घेता न येणारा कामगार पुढारी” हे विशेषण लावून कामगार विषयक लवादांमध्ये एडव्होकेट काॅम्रेड मदन फडणीस ह्या नावाला प्रसिद्धीचे वलय प्राप्त झाले.

कामगार म्हणजे केवळ गिरणी कामगार किंवा औद्योगिक कामगार नव्हे, तर विविध क्षेत्रातील असंघटित कामगार आपल्या कायदेविषयक प्रश्नांची उकल करण्यासाठी फडणीस वकिलांकडे धाव घेत होते. ह्यामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, औद्योगिक कंपन्या,फार्माक्युटिकल, मेडिकल, विमा कंपन्या, बॅन्किंग क्षेत्र, एअरलाईन्स, खाणविभाग, रासायनिक क्षेत्र, शिपिंग काॅरपोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्थान एन्टिबायोटिक्स सारख्या निम-सरकारी संघटनांमधील कर्मचारी, वर्तमानपत्रे, प्रेस आणि मिडिया, सरकारी व निम-सरकारी कर्मचारी, सुशिक्षित व उच्च विद्याविभुषित डाॅक्टर व प्राध्यापक वर्ग, अशा विविध क्षेत्रातील कर्मचारी वर्गाचा समावेश होता. ते श्रमजीवी वर्गाप्रमाणेच सुशिक्षीत कामगारांना कायदेविषयक मदत उपलब्ध करून देण्यासाठी यशस्वीपणे लढत होते.

कामगारांकडून नाममात्र फी घेऊन किंवा कधी कधी ती फी सुद्धा देणगी रुपाने कामगार संघटनांना परत करून फक्त कामगारांच्या हितासाठी कोर्टात केसेस चालवणारा असा कामगार वकील दुर्मिळ होता. मुंबई बाहेर ठाणे, पुणे, नाशिक, बारामती, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल, तसेच दाक्षिणात्य प्रदेशांतही मदन फडणीस ह्यांच्या कीर्तीचे चौघडे वाजत होते. सुप्रीम कोर्टाने “ज्येष्ठ वकील” म्हणून त्यांच्या नावाला मान्यता दिली होती आणि भारत सरकारने वृत्तपत्र कर्मचा-यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांना परदेशांमध्ये विविध परिषदांतून सन्मानपूर्वक नियुक्त केले होते. “श्रम- महर्षी” हा जीवन-गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.

“आयुष्य हे दान देण्यासाठी आहे, घेण्यासाठी नाही” हे मदन फडणीस ह्यांच्या जीवनाचे ध्येयवाक्य होते. कामगार त्यांना देव मानत होते, आणि आदराने “दादा ” म्हणून संबोधत होते, आपले “मायबाप” मानत होते.

वारक-यांच्या “मायबाप” विठ्ठलाच्या मागे जशी त्याची रखुमाई सदैव सजगपणे उभी आहे, आणि त्याला आपल्या संसाराच्या पाशात न अडकवता, “विश्वाचा संसार” उभारण्यासाठी सहाय्य करत आहे, अगदी तशीच “मदन दादांच्या” पाठीशी त्यांची रखुमाई “सौ. मंगला मदन फडणीस” अविरतपणे उभी राहिली.

मदनच्या पत्नी, सौ. मंगला मदन फडणीस, ह्यांनी आपल्या पतीला त्यांच्या कामगार विषयक कार्यात संपूर्ण पाठिंबा दिला आणि स्वतःही एक कर्तृत्ववान शैक्षणिक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नावलौकिक कमावला. पतीला नोकरी आणि अर्थार्जनाची विवंचना करत राहावे लागू नये, म्हणून सौ. मंगला फडणीस ह्यांनी १९४९ साली, वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी, त्यांचे वडील, ठाणे शहरातील सुप्रसिद्ध वकील एडव्होकेट बी.टी सुळे ह्यांच्या सहाय्याने ठाणे शहरातील व जिल्ह्य़ातील पहिली माॅन्टेसरी शाळा “बाल विकास मंदिर” ह्याची स्थापना केली आणि ह्या संस्थेचा विकास करतानाच अनेक बालकांचे भविष्य घडवले; एवढेच नव्हे, तर संपूर्ण महिला संचालित संस्था म्हणून संस्थेतील शिक्षिका व अन्य कर्मचारी महिलांचाही विकास साधला. ठाणे शहर आणि जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्या काळात सौ. मंगला फडणीस हे नाव सन्मानाने घेतले जात होते.

मदन आणि मंगला ह्यांच्या सुखी संसारात मृदुला, मनोज आणि शर्मिला ह्या तीन कन्या जन्माला आल्या. समाजकार्यात व्यस्त असूनही ह्या दाम्पत्याने आपल्या तीन कन्यांना उत्तम शिक्षण आणि सुसंस्कार देऊन जीवनाचा प्रशस्त मार्ग त्यांच्यासाठी खुला करून दिला. आज ह्या तिन्ही कन्या, सौ.मृदुला राजे, सौ.प्रतिमा बावकर आणि सौ. सोनल साटेलकर ह्या आपल्या आपल्या क्षेत्रात नावलौकिक कमावत आहेत आणि वडिलांच्या कर्तृत्वाचा वारसा आपल्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिनांक २९ नोव्हेंबर, १९९३ ह्या दिवशी मंगला फडणीस ह्यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाले. तेव्हा हा अनपेक्षित धक्का सहन न झाल्याने मदन फडणीस काही काळ निराशेने कोलमडले होते. परंतु त्यांचे कामगार हीच त्यांची खरी जीवनरेखा असल्याने आणि आपल्याविना त्यांच्या केसेस चालवणारी समर्थ वारसदार व्यक्ती अजून निर्माण व्हायची आहे, ह्या जाणिवेने ते पुन्हा एकदा नवीन उर्जा घेऊन कामाला लागले, सक्रिय झाले. कामगार संघटना हेच आपले उर्वरित आयुष्य मानत, त्यांनी स्वतःला अधिक जोमाने ह्या कार्याला वाहून घेतले.

“अखेरच्या श्वासापर्यंत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहीन” हे ध्येय उराशी बाळगणारा हा थोर कामगार पुढारी अनेक आजार आणि दुखणी ह्यांच्याशी सामना करत करत, वयाच्या ८६ वर्षांपर्यंत जिद्दीने कार्य करत राहिला आणि दिनांक २ मार्च, २००९ ह्या दिवशी एका शांत, निवांत क्षणी आपला देह अनंतात विसर्जित करून दिगंतामध्ये विलीन झाला.

आपल्या लाडक्या पुढा-याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार उपस्थित होते आणि त्या कामगारांच्या सांत्वनासाठी मदन फडणीस ह्यांच्या कन्या व परिवार झटत होते. “लाल सलाम, लाल सलाम” ह्या घोषणांनी दुमदुमलेल्या स्मशानभूमीत त्यावेळी चैतन्य आणि उर्जा ह्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

काॅ. मदन फडणीस ह्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कामगार बांधवांनी पुणे शहराजवळ निगडी येथे, त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने “मदन फडणीस साहेब” ह्यांचा अर्धपुतळा स्थापित केला आणि त्यांचे चिरंतन स्मारक निर्माण केले आहे. त्यांच्या निधनानंतर १५ वर्षे पूर्ण झाल्यावरही त्यांच्या स्मृतींना जागृत ठेवण्यासाठी तिथे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.

नुकताच एडव्होकेट काॅ. मदन फडणीस ह्यांचा जन्म शताब्दी समारंभ मुंबई येथील महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ लेबर स्टडीज ह्या कायद्याच्या अभ्यासक्रमासाठी विशेष मान्यता पावलेल्या काॅलेजमध्ये अनेक विद्यार्थी, प्राध्यापक, कामगार पुढारी आणि कायदे क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. मदन फडणीस ह्यांचे जावई एडव्होकेट लक्ष्मीकांत साटेलकर आणि कनिष्ठ कन्या सौ.सोनल साटेलकर ह्यांच्या अथक प्रयत्नांनी ह्या कार्यक्रमाची आणि काॅ. मदन फडणीस ह्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा झाली आणि त्यांच्या स्मृतींचा दीप पुन्हा एकदा तेजाळला.

“श्रम कायद्यांचे ज्ञानभांडार” आणि “औद्योगिक तंटे सोडवण्यातील प्रगल्भ व्यक्तिमत्व” असा यथोचित सन्मान प्राप्त झालेल्या एडव्होकेट काॅ. मदन फडणीस ह्यांना, आम्हां कन्यांच्या नव्हे, तर कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या “मायबाप” मदन “दादांना” त्यांच्या १५ व्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली, मानवंदना आणि विनम्र अभिवादन. काॅ. मदन फडणीस ह्यांना लाल सलाम !

— लेखन : सौ. मृदुला राजे.
–संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments