अमेरिकेने आपल्या देशावर अवास्तव कर लादल्यामुळे आपल्या सरकारने आता स्वदेशी ची घोषणा केली आहे. ती देर आये दुरुस्त आये या म्हणीप्रमाणे योग्य अन् स्वागतार्ह आहे.
आता जागतिक वातावरण, राजकारण आरपार बदलत चालले आहे. अनेक देशात तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात म्हणता येईल, असा शस्त्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे अनेक राष्ट्रांच्या बाबतीत परराष्ट्र धोरण, राजकीय समीकरण असे सगळेच बदलले आहे. पूर्वीचे मित्र आता बोलेनासे झाले आहेत. आपल्याच मदतीने निर्माण झालेला बांगला देश आज आपल्या विरोधात उभा आहे. या बाबतीत कुणाला दोष देण्यात अर्थ नाही. कारण प्रत्येकासाठी आपला देश, आपली अस्मिता जास्त महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येकालाच स्वावलंबी व्हावे लागेल. अवती भवती इतकी अनिश्चितता, अशांतता, अन् गोंधळाचे वातावरण आहे की ताक देखील फुंकून प्यावे लागेल आता !
संरक्षण, अंतराळ संशोधन, तंत्रद्न्यान अशा अनेक क्षेत्रात आपण एक नव्हे अनेक देशावर अवलंबून आहोत. अनेक लसी, औषधे, वैज्ञानिक उपकरणे, युद्ध सामुग्री आपल्याला आयात करावी लागते. आपण मूलभूत संशोधनावर भर देण्याऐवजी कट कॉपी पेस्ट असेच धोरण ठेवले बहुतेक क्षेत्रात. कोऱ्या पाटीवर नवा अध्याय लिहिण्याऐवजी आयात करणे, जोडणी करणे अन् आपले स्वदेशी म्हणून त्यावर स्टिकर लावणे हेच काम आपण करत आलो. चिप्स, आय सीज, मेझरिंग इक्विपमेंटस यांची आयात बंद झाली तर आपण अनेक क्षेत्रात पांगळे होऊन जाऊ ही वस्तुस्थिती आहे. काही मोजके अपवाद सोडले तर !
मला असे वाटते की ज्यांची पांढरा हत्ती म्हणून सहज गणना होईल अशा सी एस आय आर, डी आर डी ओ, इस्रो, स्पेस रिसर्च, सर्व जुन्या आय आय टी ज यांचे सरकारने अकॅडमीक ऑडिट करावे. म्हणजे या संस्थेसाठी सरकार जितका अमाप पैसा खर्च करते, त्या तुलनेत यांचे नेमके रिसर्च आउटपुट काय ? याची सखोल तपासणी करावी. लाखो रुपयाचा पगार घेणारे शास्त्रद्न, प्राध्यापक नेमके काय किती संशोधन करतात, त्यापैकी देशाच्या, समाजाच्या उपयोगाचे किती याचा खरेच शोध घ्यावा. १९७० / ८० च्या दशकात सुरु झालेले जुन्या पाच आय आय टी तील संशोधन, आय आय टी मद्रास मधील दूर संचार क्षेत्रातले संशोधन अन् असेच काही अपवाद सोडले तर फारसे मूलभूत संशोधन झालेले नाही हे कटू सत्य आहे.
परदेशातील विद्यापीठाचे संशोधन हे संरक्षण, अंतराळ संशोधन, संगणकशास्त्र अशा थेट उद्योगाशी निगडीत असते. तेथील प्राध्यापकाच्या प्रकाशित संशोधन पेपर खाली तळटीप असते, कुठल्या अनुदानाने संशोधन झाले याची. असे करार आपल्याकडे केवळ अपवादात्मक दिसतात.
आपले आय आय टी ज चे विद्यार्थी इथल्या शिक्षणाचा लाभ घेऊन परदेशात योगदान देतात.हे वर्षानुवर्षे चालले आहे. कोणत्याच सरकारला त्यावर उपाय शोधता आला नाही.
आता स्वदेशीचा नारा दिलाच आहे तर इकडचे मूळ शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झालेल्या सर्व भारतीयांना आपली बुद्धिमत्ता इथल्या मातीत रुजवायला. इथे परत या म्हणून राष्ट्रभक्तीचे आवाहान करावे. पण प्रश्न असा आहे की आपले चांगले सुख शांतीचे जीवनमान सोडून ते इकडे कुठल्या आकर्षणाने येतील ? आपण त्यांना स्वच्छ, नैतिक पोषक वातावरणाची, योग्य पगाराची हमी देऊ शकू काय ? इकडचे घाणेरडे राजकारण, सरकारच्या लाल फितीची दिरंगाई, पैसा दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही ही सामाजिक परिस्थिती याचा सामना आपण कसा करणार आहोत ? ट्रम्प च्या धमक्यांना तिकडे स्थिरावलेली आय टी अन् तत्सम क्षेत्रात उत्तम काम करणारी आपली भारतीय मंडळी स्वदेशीचा नारा देत तो देश सोडण्याची धमकी देत आपल्या राष्ट्रभक्तीचे प्रदर्शन करू शकतात. पण आपल्या सरकारच्या नव्या स्वदेशी धोरणात अशा परदेशातून देशभक्ती खातर परत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय उपाय योजना आहेत ? या संबंधात आपण काही विचार केलाय का ? यासंबंधी आपले धोरण काय आहे ?
आपल्याकडे प्रतिभाशाली युवा वर्ग आहे. पण आज हा युवा वर्ग भांबावलेला, धास्तावलेला आहे.तो दिशाहीन झालेला आहे. कुणी पुढाऱ्याने, आकाने हाक दिली की हाच वर्ग खांद्यावर झेंडा अन् गळ्यात उपरणे घालून लाखोच्या संख्येने काही क्षणात जमा होतो. पण ही गर्दी उच्च शिक्षणासाठी विद्यापीठाच्या दारात दिसत नाही. स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम च्या कार्यालयात दिसत नाही. सर्व राज्यात उच्च शिक्षणासाठी च्या प्रवेशाच्या जागा चक्क खाली असतात. आय आय टी सारख्या संस्था सोडल्या तर पदवी पदव्युत्तर विद्यार्थ्याची वर्गातील संख्या नगण्य असते. विद्यापीठातील पी एच डी चे संशोधन हास्यास्पद असते. त्याचा समाजाला, देशाला काही उपयोग नसतो. मग ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय केले पाहिजे ? कोणते धोरण स्वीकारले पाहिजे ? की या प्रश्नाकडे आपले पूर्ण दुर्लक्ष झाले आहे ? हे सगळे गांभीर्याने विचार करण्यालायक मूलभूत प्रश्न आहेत.
स्वदेशीचा नारा देताना समांतर रीत्या या प्रश्नाचा शोध घ्यायला हवा. आपल्या कडे संसाधने आहेत. प्रतिभा आहे. उत्साही युवा वर्ग आहे. पण गलिच्छ राजकारणाने, भ्रष्टाचारी शासन व्यवस्थेने, गुंडगिरीच्या समाजकारणाने, धर्म जातीच्या विभाजनाने आपले सशक्त राष्ट्रीय व्यक्तिमत्व पोखरले जात आहे. ही कीड वेळीच मुळापासून दूर करणे गरजेचे आहे. स्वदेशी नाऱ्या च्या निमित्ताने हे काम प्राधान्याने केले तर एक काय दहा ट्रम्प अंगावर घेता येतील. गरज प्रबळ इच्छाशक्तीची आहे.

— लेखन : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. माजी कुलगुरू, हैदराबाद.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
