सकाळी जाग आली आणि मोबाईलमध्ये तिने वेळ पाहिली, तर साडेआठ वाजले होते.. !
अविनाश चे पाच मिसकॉल येऊन गेले..!
ती लगबगीने किचनमध्ये गेली..सासूबाईंचा चहा, नाश्ता केला होता..! ती सॉरी म्हणाली, तर त्या म्हणाल्या, “असू दे ग..रोज करतेस की ! रात्री अविशी बोलत बसली असशील ना !” त्यावर लाजून ती काहीच बोलली नाही..!
तिला आठवलं, त्याचे पाच मिसकॉल आलेत, स्वारी चिडली असेल..तिने फोन लावला, “अग, पाच मिनिटांत लेक्चर सुरू होईल..! नंतर करतो..”!
तिला आश्चर्य वाटलं, रागावला कसा नाही..!
सगळं आवरून टेबलावर येऊन बसली..! पोहे केले होते..! ते डिशमध्ये भरले..चहा झाला होता, तो आणला…!
सासूबाईंनी विचारलं,
“काल कोणाचा फोन होता ग ? मैत्रिणींचा का ?”
“हो..! कॉलेजमध्ये एकत्र होतो..!”
“किती मजा येते ना, अश्या जुन्या मैत्रिणींचा फोन आला की ! सगळ्या आठवणी फेर धरून नाचायला लागतात.!”
त्यावर सासरे म्हणाले, “तरी तू पाच मिनटात बोलणं आटपलस, तुझी सासू असती तर दोन तास कुठेच गेले नसते.!”..आणि जोरात हसले..!
“हो..आणि स्वतः मित्रांमध्ये गेले की दिवसभर घरची आठवण सुध्दा येत नाही, त्याच काय हो ?” सासूबाईंनी ही टोमणा मारला..!
रोमी हसत म्हणाली, “एन्जोय करा असच..! खूप मस्त वाटत…!” त्यावर दोघांनी एकमेकांकडे समाधानाने पाहिलं..!
“बर, ऐक, मैत्रीण आलीये ना..जा..तिला भेट.! खूप गप्पा मार.. ! आज घरच सगळं मी बघीन..!” सासूबाई उत्साहात बोलत होत्या, जणू त्यांचीच मैत्रीण आली होती..!
रोमीला भरून आलं..
“आई ! ह्या घरात आले आणि आईवडिलांच प्रेम मिळालं..!”
“आम्ही तुझे आईवडीलच आहोत ग बेटा..! जा..! मस्त नट जरा..!”
तिच्या मनात आलं, एक काळ दुःखाचा, कष्टाचा आणि एक काळ सुखाचा, हेच आयुष्य !
स्वतःच आवरून सासुसासऱ्यांना बाय करून ती मिताली ला भेटण्यासाठी ‘ओला’ त बसली..!
किती दिवसांनी भेटणार आहोत..! मिताली नंतर परदेशात गेली आणि रोमीला बंगलोर मध्येच चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली..!
“मॅडम, आलं हॉटेल” ! अस ‘ओला’ चालकाने म्हणताच ती भानावर आली…!
उतरली तर समोर मिताली उभीच !
दोघींनी कडकडून मिठी मारली एकमेकींना..!
तिच्याकडे बघत मिताली म्हणाली, “hmm ..! लग्न मानवलेलं दिसतंय..! गालावरची लाली सांगतेय खुणा, तुला भेटला ग मनपसंद सजणा”
खूप बोलायच होत दोघींना..! मनात साचलेलं..!
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800