लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीला तो आवर्जून आला होता..। पराग देशपांडे त्याच नाव..।
त्याला आईवडील आणि बहीण ही होती..।
रंजना देशपांडे, जी रुची बरोबर त्या ट्रॅप मध्ये अडकली होती..।
“आपलं घर” मध्ये अविनाश आणि रोमीने तिला आसरा दिला होता..। ती तिथे सापडल्या नंतर तिच्या आईवडीलांना कळवण्यात आलं..।
त्यांनी यायला नकार दिला..। “ती आणि तिचं नशीब..। काय कमी केलं होतं आम्ही ? आईवडील म्हणून काय केलं न्हवत हीच..।
म्हणेल ते देत होतो..। घरातून पळून गेली, ते ही पंचवीस हजार रुपये घेऊन..।” अस रागारागाने तिची आई पोलिसांना बोलली..।
अविनाश आणि रोमीने तिला समजावलं, “भूतकाळ विसर, वर्तमानाला सामोरी जा..।” तिला नोकरी शोधून दिली, आणि externally शिकण्यासाठी मदत ही केली..। हे सर्व करताना बऱ्याच गोष्टी लपवाव्या लागत होत्या..। समाजात ह्याची चुकून जरी भनक लागली, तर डोमकावळे टोचा मारायला तयार असतात..।
नागपूर मध्ये प्रसिद्ध व्यावसायिक होते तिचे वडील..। रंजना कुठल्या तरी मुस्लिम तरुणाबरोबर पळून गेली अशी बातमी सगळीकडे पसरली..। खूप बदनामी झाली..।
एक तर यशस्वी उद्योजक होते ते आणि ते यश बाकीच्यांच्या नजरेत खुपत होत..। यश आणि त्याच्या पाठोपाठ येणारा अहंकार ही..। हाच अहंकार ज्यामुळे कधी कोणाची मदत केली न्हवती आयुष्यात..। तो राग ही होताच..।
म्हणून त्यांनी मुलीच नावच टाकलं..।
पराग रंजनाचा धाकटा भाऊ..। त्याला खात्री होती की ताई फसली गेलीय..। त्याने आईवडिलांना समजावल, की ती फसली गेलीय हे लक्षात घ्या..। आजपर्यंत एकही गोष्ट आपल्या पासून न लपवणारी ती, अस काय झालं असेल की तिने ही गोष्ट लपवली..। असा ही विचार करा..।
पराग ला हे कळल्यावर तो आला, ताईला भेटायला…। अत्यंत कृश झालेल्या, पार रया गेलेल्या बहिणीला पाहून त्याला भडभडून आलं..। दोघेही मिठी मारून खूप रडले..। तो म्हणाला घरी चल म्हणून…। पण तिने ठाम नकार दिला..। जोवर पंचवीस हजार रुपये आणि डिग्री हातात येत नाही, तोवर मी आईबाबांना भेटणार नाही..। तिथेच त्याची आणि रुचीची, अविनाश, रोमीची भेट झाली…। तो अविनाशच्या पायाच पडला..। अविनाशला तो आला, म्हणून बर वाटल..।
गरजेच्या वेळी आधार मिळणं हा ही नशिबाचा भाग..। तो रंजना ला मिळाला होता….। हे तिच ही सुदैवच…।
आजच्या आनंदात रंजना, पराग आणि आईवडील ह्यांची भेट हा ही आनंद सोहळा होता..।
आईवडीलांना पाहून रंजना ने धावत येऊन मिठी मारली, खूप वेळा माफी मागितली आणि पंचवीस हजार रुपये, डिग्री दाखवली..।
अर्थात हे सगळं एका रूमवर घडलं, जे ठराविक जणांना माहीत होतं आणि मग सर्व फंक्शन ला आले..।
अविनाश आणि रोमी चे त्यांनी खूप आभार मानले..।
रंजनाचे आईवडील तिला घेऊन नागपूरला गेले…। घरचा व्यवसाय सांभाळ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..अस म्हणत…। खर तर अविनाश, रोमीला बघून त्यांना लाज वाटत होती स्वतःच्या विचारांची, जास्त करून अहंकाराची..।
“आपलं घर” मधल्या अनेक मुली आयुष्यात सेटल होत होत्या आणि सुरवात रंजना ने केली होती..।
जाताना एक निश्चय सर्वांनी केला तो म्हणजे आपण “आपलं घर” च्या संपर्कात कायम रहायचं आणि अश्या फसलेल्या मुलींना सक्षम करण्यासाठी मदत करायची आणि आणायची सुद्धा..।
“आपलं घर” चा आर्थिक डोलारा आणि इतरही काम सांभाळायची जबाबदारी त्यांनी घेतली, ज्यांना इथे आसरा मिळाला..। उत्तम टीम तयार झाली..।
अविनाश आणि रोमी ला थोडा मोकळा श्वास मिळाला..।
पाच वर्षे ते मनापासून मेहनत करत होते..। अविनाश ची लेक्चर्स, रोमीचा क्लास, विहान च शिक्षण हे सगळं सांभाळून काम करायचं, म्हणजे तारेवरची कसरतच होती…। त्यात यश आलं, कित्येक जीव मार्गी लागले हे समाधान अपार होतं..। कुठल्याही मालमत्तेपेक्षा अनमोल…।
आणि पराग फक्त मनाने नागपुरात होता..।
आणि रुची ? तिच्या मनात काय होत ? क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800