चार वर्षाच्या गाढ झोपलेल्या पोरीला, जोराचा फटका देऊन तिने उठवलं.. “उठ ..! किती वेळ झोपतेस ? भांडी कोण घासणार ?.. थोडया वेळाने गिळायला लागेल ना ?”
अवघी चार वर्षांची पोर..भांडी ही नीट घासता यायची नाहीत..नीट घासली नाही, म्हणून मार परत …स्त्री एवढी क्रूर असू शकते ? तिला ममतेचं लेण लाभलंय, मातृत्वाच्या वराच्या रूपाने..!
जेवायला मागितलं तर शिळ्या पोळ्या किंवा दोन दिवसांचा ब्रेड आणि एवढीशी भाजी, अर्ध आम्लेट अस मिळायचं..खूप भूक लागायच..वाढत वय ते..!
खरं तर स्वतःचा, लग्नाचा निर्णय चुकला होता..! चुकीच्या माणसाशी लग्न केलं मोहात पडून..! तो राग काढायला ही कोवळी पोर..!
म्हणतात ना चुकलेल्या निर्णयांचे राग काढायला कोणीतरी हव असत आयुष्यात..! त्याचाच हा प्रत्यय..!
शेजारची मिनी द्यायची खायला..! ते ही त्यांची बिल्डिंग सोडून, दोन बिल्डिंग च्या मागे एक जागा होती.. आडवाटेला..! तिथे जाऊन खायचं..हे कळलं तर मार निश्चित..
शाळेत घालायचं न्हवतच आईला..! फुकटची मोलकरीण कोण सोडणार ? रिटा मावशीने सगळा खर्च उचलला..म्हणून शिक्षण तरी झालं..! तिच्या घरी ती नेऊ शकत न्हवती.. तिची खाष्ट सासू खूप त्रास द्यायची..!
दिवस असेच जात होते..! हळूहळू मोठी होत होती…!
छोट्या भावाच आगमन झालं..! डॅनियल नाव ठेवल, रोमीच्या आवडीचं ..! एवढ्या छोट्याशा गोष्टीने ही पोर सुखावली..!
त्याला रोमी खूप प्रेमाने सांभाळायची..! ते बघून थोडं मन निवळल..! तरी कष्ट काही चुकले नाहीत ..!
शाळेत जाताना घरच सर्व काम करून जायच.. आल्यावर ही करायचं..रात्री अभ्यास करायचा..एवढे सगळे कष्ट सोसून, शाळेत ती दुसरा किंवा तिसरा नंबर आणायची..
शिक्षकांना खूप अभिमान वाटायचा तिचा आणि खुप सहाय्य ही करायचे..!
दहावीला 98 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली ती..आणि बोर्डात 10 वी..! आईवडिलांचा सत्कार केला शाळेने, सर्व माहीत असून सुद्धा.! नाईलाज म्हणतात ना तस..!
रिटा मावशीचा उल्लेख सर्व शिक्षकांनी केला आणि तिला भेटून “हे सगळं तुमच्या मुळे” अस ही म्हणाले..
इकडे छोटा भाऊ अति लाडामुळे बिघडत होता..! तिने समजवायचा खूप प्रयत्न केला..! काही उपयोग झाला नाही..! मग तिनेही नाद सोडला..!
आता प्रश्न पुढच्या शिक्षणाचा होता.. शाळेतल्या एका शिक्षकांनी, खाजगी ट्युशन घेणाऱ्या एका क्लास मध्ये तिला नोकरी लावून दिली आणि तिचा अभ्यास ही होऊ लागला..
पैसे कमावते म्हणल्यावर आईवडील बरे वागू लागले.. वडलांचा अर्धा पगार दारुतच जायचा.. हिच्यामुळे चार पैसे तरी हातात येतात, असा विचार आई करायची..!
रोमी ने विचार केला, शिकायला मिळतंय हेच महत्त्वाच..ह्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग..! उच्च शिक्षण आणि आर्थिक स्वयंपूर्णता..! हा आणि हाच आहे..!
तिने तोच ध्यास घेतला.. त्या ध्यासाने तिला खूप मोठ्या उंचीवर नेलं..कस ?
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800