प्रिय वाचकांनो,
नमस्कार !
लता मंगेशकर, अशी व्यक्ती जिच्या नावाचा महिमाच पुरेसा होता, तिच्या सुरांच्या जादूने भारलेल्या आवाजाच्या दिवाण्यांसाठी !
आज, ६ फेब्रुवारी २०२४. तिला जाऊन २ वर्ष झालीत. त्या गंधर्वगायनी कळांना या तारखेशी कांहीही देणे घेणे नाही. त्यांची मनमोहक सुरेल स्वरमधुरिमा आजही तशीच शाबूत आहे. जशी स्वर्गातील नंदनवनाच्या रंगीबेरंगी सुमनांची सुरभी कालातीत आहे, तसेच लताच्या स्वरांचे लाघवी लावण्य वर्षानुवर्षे सुगंधाचा शिडकावा करीत आले आहे आणि आमच्या दिलांच्या गुलशनला याच प्रकारे वर्षानुवर्षे असेच प्रफुल्लित ठेवीत राहील. तिने गायलेल्या एका गाण्यात हीच भावना अत्यंत सुरेख रित्या प्रकटली आहे, ‘रहें ना रहें हम महका करेंगे, बन के कली, बन के सबा, बाग़े वफ़ा में’ (चित्रपट ‘ममता’, सुंदर शब्द- मजरूह सुल्तानपुरी, लोभस संगीत-रोशन).
आमच्या कित्येक पिढ्या सिनेसंगीताच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत, त्यांनी बघितलंय सिनेसंगीत कसे बदलत गेले ते ! मात्र त्यात एक ‘चीज’ कधीच बदलली नाही, ती म्हणजे गायनाचा अमृतमहोत्सव पार करणाऱ्या लताच्या आवाजाचा गुंजारव ! याच स्वरांनी आमचे कोडकौतुक करीत अंगाई गीत ऐकवले, यौवनाच्या मंदिरी प्रणयभावना प्रकट करण्यासाठी स्वर दिलेत, बहिणीच्या मायेने ओथंबलेल्या राखीचे बंधन बहाल केले. इतकेच नव्हे तर, मनोरंजन क्षेत्रातील ज्या ज्या प्रसंगातील ज्या ज्या स्त्रीचे रूप, स्वभाव अन मनाची कल्पना आपण करू शकतो, ते ते सर्व कांही या स्वरात समाहित होते. श्रृंगार रस, वात्सल्य रस, शांत रस, इत्यादी भावनांना जेव्हां लताच्या स्वरांची साथ लाभायची तेव्हां तेव्हां त्या बावनकशी सोन्यात जडलेल्या रत्नांसारख्या उजळून निघायच्या !
मैत्रांनो, आपल्याप्रमाणेच माझ्या जीवनांत देखील लताच्या स्वरांचे स्थान असे आहे की, जणू सात जन्मांचे कधीही न तुटणारे नाते! लताच्या जीवनचरित्राविषयी इतके भरभरून लिहिल्या आणि वाचल्या गेले आहे की, आता वाचक म्हणतील, “कांही नवीन आहे कां ?” मी लताच्या करोडो चाहत्यांपैकी एक आहे. पौर्णिमेच्या चंद्राला बघून जशी सागराला भरती येते, तद्वतच लताच्या आठवणीने माझ्या मनात उचंबळून आलेल्या भावना इथे सामायिक करते.
मागील कांही दिवसांत लताच्या दोन गाण्यांनी मला भावविवश होऊन वारंवार ती ऐकण्यास भाग पाडले आणि मनाच्या अथांग गाभाऱ्यापर्यंत ठाव घेतला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोनही चित्रपटांची गीते निव्वळ शुद्ध हिंदी शब्दांची पराकाष्ठा करण्याचा आग्रह धरणारे गीतकार पंडित नरेन्द्र शर्मा यांनी लिहिली आणि त्यांना अभिजात संगीतसाज चढवला महान संगीतकार ‘स्वरतीर्थ’ सुधीर फडके यांनी !
१९५२- कोलकत्ता येथील अनोखा मिश्र संगीत महोत्सव -जेव्हा लताला उस्तादजींच्या आधी गाणे गावे लागले ! या चार रात्री चालणाऱ्या मिश्र संगीत महोत्सवात मिश्र अर्थात ध्रुपद- धमार,टप्पा-ठुमरीबरोबरच सिनेसंगीत देखील समाविष्ट करण्यात आले होते. एका रात्री लता आणि शास्त्रीय संगीताचे महान गायक उस्ताद बड़े गुलाम अली खान साहेबांचे गायन होते. पण आयोजकांनी लताला उस्ताद साहेबांच्या अगोदर गाण्याचा क्रम दिला. हे संगीत समारोहाच्या नियमांच्या चौकटीतून पाहिल्यास उस्तादजींचा अनादर करणे होते. लताला हे चांगलेच माहीत होते, म्हणून तिने आयोजकांना असे करण्याची मनाई केली, पण जेव्हां त्यांनी हे ऐकले नाही, तेव्हां तिने सरळ उस्ताद साहेबांकडेच तक्रार केली आणि म्हणाली की मी हे करू शकणार नाही. हे ऐकताच खांसाहेब जोराने हसले आणि तिला म्हणाले, ‘जर तू मला मोठा मानत असशील तर, माझे म्हणणे ऐक आणि तूच आधी गा,’ अन मग काय, कोलकत्तातील ती संध्याकाळ अविस्मरणीय ठरली.
लताने त्यांचे म्हणणे ऐकले तर खरे, पण तिने आपल्या हिट सिनेमांतील गाण्यांना वगळून निवड केली एका मधुरतम गीताची, जे बांधले होते जयजयवंती रागात. १९५१ साली आलेल्या ‘मालती माधव’ नांवाच्या सिनेमातील हे गाणे होते, ‘बाँध प्रीती फूल डोर, मन ले के चित-चोर, दूर जाना ना, दूर जाना ना…. ‘. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या भावपूर्ण शब्दांना मधाळ संगीताचा साज चढवला होता सुधीर फड़के यांनी ! या गाण्याचा असा कांही प्रभाव पडला की, तिने प्रेक्षकांना या संध्याकालीन संगीतलहरींच्या जादूने बांधून ठेवले. प्रेक्षकच नव्हे तर उस्तादजी सुद्धा लताच्या गायकीने प्रभावित झाले.
नंतर जेव्हां खां साहेब मंचावर आले तेव्हां त्यांनी लताला सन्मानाने मंचावर स्थान दिले आणि तिची खूप तारीफ केली. त्या वेळेपर्यंत जे गाणे प्रसिद्ध झाले नव्हते, ते त्या दिवशी हिट झाले ! मित्रांनो, हा लेख लिहिस्तोवर मी या गाण्याविषयी फारसे ऐकले नव्हते. मात्र जेव्हांपासून ते लक्षपूर्वक ऐकले आहे, तेव्हापासून त्याच्या जादूने भारल्यासारखे झाले आहे. लताचे हे गाणे यू ट्यूब वर उपलब्ध आहे. (शिवाय सुधीरजींच्या आवाजात देखील !) आपण देखील लताच्या या अनमोल गाण्याचा आनंद घ्या आणि माझ्यासोबतच आपणही एका विचाराने त्रस्त व्हाल की, ‘मालती माधव’ या सिनेमाची एकमात्र स्मृती असलेले हे गाणे चालले कां नाही ?
‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’
दुसरे गाणे आहे, भक्ती आणि प्रेमभावाने रसरसलेले असे गाणे ज्याचे एक एक शब्द जणू अस्सल दैदिप्यमान मोतीच, अन त्यांची चमक वृद्धिंगत करणारे कर्णमधुर संगीत सुधीरजी (बाबूजी) यांचे ! जर अशी जोडी सोबत असेल तर, लताच्या सुरबहारचा एक एक तार वाजणारच ना. ‘भाभी की चूड़ियाँ’ (१९६१) सिनेमाचे गाणे होते, ‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मैं प्रीत बाती’ (राग–यमन). रुपेरी पडद्यावर एका सुवासिनीच्या रूपात चेहेऱ्यावर परम पवित्र भाव असलेली मीना कुमारी. मी कुठेतरी वाचले होते की, या गाण्यावर सुधीरजी आणि लताने खूप मेहनत घेतली आणि गाण्याच्या वारंवार रिहर्सल झाल्या. सुधीरजींना या गाण्यापासून खूप अपेक्षा होत्या. हे गाणे श्रोत्यांना खूप पसंत पडेल अशी त्यांना आशा होती. पण झाले याच्या अगदी विपरीतच, याच सिनेमाचे दुसरे गाणे, ज्याच्या प्रसिद्ध होण्याची साधारणच अपेक्षा होती, ते सर्वकालीन प्रसिद्ध गाणे म्हणून गाजले. ते होते, ‘ज्योति कलश छलके’! भूपाली रागावर आधारित या गाण्याला शास्त्रीय संगीतावर बेतलेल्या चित्रपट गीतात अति उच्च स्थान प्राप्त झाले. कदाचित त्याच्या छायेत ‘लौ लगाती’ ला रसिकांच्या ह्रदयात ते स्थान मिळू शकले नाही. मैत्रांनो, आपणास ही विनंती की, आपण हे सुमधुर गाणे अवश्य बघा-ऐका आणि त्यातील शांति- प्रेम- भक्तिरसाचा अक्षत आनंद घ्या !
लताच्या असंख्य आठवणी आठवत असतांना नेमकं काय वाटतंय, त्यासाठी तिच्याच अमर (१९५४) या चित्रपटातील एक गाणे आठवले. (गीत-शकील बदायुनी, संगीत नौशाद अली)
“चाँदनी खिल न सकी, चाँद ने मुँह मोड़ लिया
जिसका अरमान था वो बात ना होने पाई जाने वाले से मुलाक़ात ना होने पाई दिल की दिल में ही रही बात ना होने पाई…”
प्रिय वाचकांनो, लताच्या गीतमंजूषेतील या दोन अमूल्य रत्नांच्या दिव्य प्रकाशात उजळलेल्या स्वरमंदिरात विराजित गानसरस्वतीच्या चरणी ही शब्दसुमने अर्पित करते !
धन्यवाद
— लेखन : डॉ मीना श्रीवास्तव. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
टीप :
* लेखात दिलेली माहिती वरील लेखन साहित्य आणि लेखिकेचे आत्मानुभव तसेच इंटरनेटवर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे.
** गाण्यांची माहिती सोबत जोडत आहे. यूट्यूबवर तुम्हाला गाण्यांच्या शब्दांवरून लिंक्स मिळतील.
‘बांध प्रीती फूल डोर’- चित्रपट -‘मालती माधव’ (१९५१)
गायिका – लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार – सुधीर फडके
‘लौ लगाती गीत गाती, दीप हूँ मै प्रीत बाती’- चित्रपट -भाभी की चूड़ियाँ (१९६१)
गायिका – लता मंगेशकर, गीतकार-पंडित नरेन्द्र शर्मा, संगीतकार – सुधीर फडके
खूप छान पद्धतीने लिहिलंय. विचार तेच पण मांडणी वेगळी!! व्वा!!
लता दीदी आणि त्यांची गाणी, खूप छान लेख
आजचा आपला लतादिदींबद्दलचा लेख म्हणजे एक कोहिनूरच आहे. कारण ही दोन्ही अप्रतिम गाणी मी कधीच ऐकली नव्हती व त्यांच्याबद्दल माहितीही कुठे वाचली नव्हती. मनःपूर्वक धन्यवाद. 👏👍👌🙏🌹 You are really genius
खुपच छान…लता आणि फक्त लता…विविध गाण्याची मैफिल ..संपूर्ण आयुष्य कमी पडेल इतकं संगीतमय सुख दिदींनी दिलयं..नवरसातलं अमुल्य संगीत..दिलयं..दिदीनां
श्रद्धास्थानी ठेऊन आदरांजली
लतादीदींच्या बाबतीत खूप छान लिहिले आहे.