“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आणि भारतीयांच्या मनात विश्वास, जाज्वल्य अभिमान निर्माण करणाऱ्या लोकमान्य टिळक यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने “स्वराज्य” या संकल्पनेचा उहापोह पुढील लेखात करण्यात आला आहे.
लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन.
— संपादक
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” असे इंग्रज सरकारला बजावून सांगितले होते, असे आम्ही अनेक वर्ष बालपणापासून ऐकत आहोत.
२३ जुलै या लोकमान्यांच्या जयंतीच्या आणि १ ऑगस्टला लोकमान्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने शाळेमध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रत्येक वक्ता माझ्यासकट हे वाक्य जोशात ओरडून बोलत असे.
याव्यतिरिक्त लोकमान्य टिळकांनी काय केले हे माहीत असणाऱ्या फारच थोड्या व्यक्ती सध्या हयात असाव्यात याबद्दल आमची खात्री आहे. या वाक्याचा अर्थ सुद्धा किती लोकांना समजला असेल याबाबत आम्ही साशंक आहोत.
आता आमचेच पहा ना, सर्वात आधी आमचा जन्म झाला हे सरकार दरबारी सिद्ध करता करता आम्हाला नाकी नऊ आले. स्वराज्य म्हणजे काय हे आम्हाला मागील ७७ वर्षात अजूनही समजले नाही. स्वातंत्र्यानंतर जे राज्य येते त्याला स्वराज्य म्हणतात किंवा म्हणावे असे काहीसे आम्ही लहानपणापासून ऐकत आहोत. अर्थात लहानपणी स्वराज्य नावाचे एक वर्तमानपत्र होते त्यातील विनोद वाचून आम्ही कधीतरी खोटे खोटे हसायला शिकलो. पण तेही नंतर बंद पडले. अरे, स्वराज्य नावाचे वर्तमानपत्र सुद्धा जास्त वर्ष चालू शकत नाही तर स्वराज्य म्हणजे काय हा प्रश्न कसा सुटणार ? असे आमच्या बालबुद्धीला वाटत असे.
त्यानंतर स्वराज्य म्हणजे काय हे समजून घेण्याच्या आम्ही कधी फंदात पडलो नाही. आमच्या स्वतःच्या घरात सुद्धा आमचे राज्य कधी नव्हते. त्यामुळे स्वराज्य म्हणजे काय हे समजण्याची शक्यता आणि पात्रता आमच्यात नव्हतीच. म्हणजे एक तर स्वराज्य म्हणजे काय हे कधी समजले नाही. जन्मसिद्धता याबाबतीत मात्र सरकार दरबारी हेलपाटे घालून जन्म कसा सिद्ध करायचा याचा पुरेपूर अनुभव आम्ही घेतला. आता आधार कार्ड जवळ असल्याने जन्मसिद्धतेसाठी फारसा आटापिटा करावा लागत नाही याबाबत सरकारचे आभार.
त्यानंतर हक्क म्हणजे काय ? हे मात्र आजतागायत आम्हाला कधीच समजले नाही. ‘हक्क मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा लागतो’ असे कोणीतरी पुढारी म्हटल्याचे ऐकिवात आहे. ‘आमचा लढा हक्कासाठी आहे’ असेही कुणी कुणी पुढारी अधून मधून म्हणत असतात म्हणे ! ‘संविधानाने हा हक्क आम्हाला दिला आहे’ असेही कोणीतरी अधून मधून म्हणत असतात. संविधान ही काय भानगड आहे हे समजून घेण्यासाठी आम्हाला या आयुष्याच्या राम रगाड्यात कधी वेळच मिळाला नाही. “अहो, भाजी सांगितल्यावर नुसती भाजी काय घेऊन आलात ? प्रत्येक भाजीचा भाव काय आहे हे समजून घेणे हा आपला हक्क आहे.” असे पत्नीने सांगितल्यानंतर हक्काची थोडीफार जाणीव होऊ लागली. आयुष्यात हक्काबाबत जागृत असलेल्या अनेक समित्या ऐकिवात होत्या. ‘ग्राहक हक्क समिती’, ‘विद्यार्थी हक्क समिती’ ‘सामाजिक हक्क समिती’, ‘संविधानिक हक्क समिती’ अशा अनेक हक्क समित्या आम्ही आधी पेपर मध्ये वाचत असू.नंतर दूरदर्शनवर किंवा अनेक दुरदर्शन वाहिन्यांवर पहात असू. परंतु यातील कोणत्याही समितीला त्यांचे हक्क मिळाले किंवा किमान पक्षी नीट समजले असे अजून तरी ऐकू येत नाही.
स्वराज्य, हक्क आणि जन्मसिद्ध या तीनही शब्दांची अशी दुर्दशा आमच्या जीवनात घडल्यानंतर फक्त एकच शब्द राहिला तो म्हणजे माझा. माझा हे मी या शब्दाचे एक रूप आहे असे कोणीतरी शाळेत सांगितले होते. परंतु ‘मी मराठी’ आणि ‘माझा मराठी’ या दोन अत्यंत भिन्न गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे समजल्यानंतर मी आणि माझा यामध्ये काही संबंध असेल यावरचा आमचा विश्वास उडाला. आमच्या घरात मात्र हा माझा शर्ट, हा माझा पेन, हे माझे बनियन अशा फुटकळ गोष्टींच्या स्वामित्वाचे हे एक रूप आहे याची खात्री पटून गेली होती. त्यामुळे माझा या गोष्टीचा अर्थ म्हणजे काही फुटकळ गोष्टींचे स्वामित्व यापुढे आमच्या बुद्धीची झेप कधी केली नाही. या वाक्यातील आता ‘हा’ आणि ‘आहे’ हे दोनच शब्द शिल्लक राहिले. लहानपणी आमच्या आईने “कोण त्रास देतो आमच्या बाळाला ‘हा’त रे !” या वाक्यातून हा या शब्दाशी प्रथम संबंध आला. परंतु आयुष्यात नोकरी, व्यवसाय आणि लग्न या घटनांमुळे ‘हां जी’ याच शब्दातून हा या शब्दाशी संबंध आला. त्यामुळे ‘हा’ या शब्दात वीरश्री पूर्ण काय आहे ? याचा अजून आम्ही विचार करतो आहोत. त्याशिवाय ‘देवाने थोडी तरी अक्कल दिली आहे काय?’ हे वाक्य आधी आईकडून आणि नंतर पत्नीकडून इतक्या वेळेला ऐकलं आहे की ‘आहे’ या शब्दाचा एवढाच मर्यादित अर्थ आमच्या डोक्यात बसला आहे.
त्यापुढे ‘आणि तो मी मिळवणारच’ असेही लोकमान्यांनी म्हटल्याचे बोलले जाते. परंतु आयुष्यात मागील ७७ वर्षांमध्ये आपण काय मिळवले याचा हिशोब लावता येणे शक्य न झाल्याने, अजून काही ‘मिळवणे’ याचा अन्वयार्थ लावण्याची यातायात करण्यासाठी डोके शिणवणे शक्य होईल असे वाटत नाही.त्यामुळे आता मला सांगा ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ याचा अर्थ समजून घेण्याऐवजी त्या आदरणीय लोकमान्यां समोर नतमस्तक होण्याशिवाय आम्ही दुसरे काय करू शकतो ?
‘शिक्षण दारी आले रे,
अवघड सोपे झाले रे’
असे काहीतरी गाणे ऐकल्याचे स्मरते. अर्थ समजून घेणे हे अवघड. त्यापेक्षा नतमस्तक होणे हे सोपे. असाच सध्याच्या शिक्षणाचा अर्थ असावा आणि त्यातूनच हे गाणे निर्माण झाले असावे अशी आता आमची खात्री पटली आहे. त्यामुळे अवघड गोष्ट सोडून द्या पण सोपे तरी करूया की !
म्हणूनच पुन्हा एकदा लोकमान्यांपुढे नतमस्तक होऊ या !!!

— लेखन : सुनील देशपांडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800*