Saturday, July 5, 2025
Homeकलास्वातंत्र्यदिन आणि मी

स्वातंत्र्यदिन आणि मी

सौ. दिपाली महेश वझे या मूळच्या गुजरात मधील कडी येथील आहेत. कडी हे उत्तर गुजरातमधील तालुका स्तरावरचे एक लहान शहर आहे. त्यांचे फाईन आर्ट्स पर्यंतचे शिक्षण बडौद्यात झाले. सद्ध्या त्या बेंगळुरू मध्ये स्थित आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या काही विशेष स्मृती त्यांना सविस्तर सांगावयास वाटते आहे. …..

आमच्या इथे कडीला, आमच्या मंदिरा सामोरच (माझ्या घरा समोर) दर वर्षी तिरंगा फडकावला जायचा. माझ्या आठवणीतला तो पहिला तिरंगा मला भव्य दिव्य वाटला.

आमच्या घरासमोर मामलतदार कचेरी असल्यामुळे संपूर्ण कडीतले लोकं ध्वजवंदन करायला इथेच यायचे. बर्‍यापैकी गर्दी असायची. आम्ही मंदिरातच वरच्या माडीवर रहात असताना आम्हाला हा सर्व कार्यक्रम सहज पाहता यायचा.

मला आठवतंय..
आजुबाजुच्या शाळेतील मुलं देशावरची गाणी गात होती. काही नृत्य करत होती. माईक मधला एवढा मोठा ध्वनी मी पहिल्यांदाच ऐकला होता. मलाही काहीतरी बोलायचे आहे.. बाबांकडे तेव्हा मी जणू हट्टच धरला होता. एवढ्यात राष्ट्रगीत सुरू झाले. सर्व जण एकदम शांत उभे राहिले.

थोड्या वेळाने बाबा म्हणाले, बाळा अजुन तू लहान आहेस. पुढच्या वेळी आपण त्यांना तुझे नाव देऊ. माझी शांतता काही वेळेपूरतीच होती. पण माईकवरून काही बोलता आले नाही ते त्या क्षणी मनात राहून गेले. मी जरा मोठे झाल्यावर शाळेत दर गुरुवारी शिक्षकांच्या आग्रहावर मला शाळेतल्या मोठ्या सभागृहात माईकवरून प्रार्थना करायला मिळाली खरी आणि त्यानंतर दरवर्षी देशभक्ती गीत पण गायला मिळाले. तेव्हा जणू मी धन्यच झाले.

शाळेत आम्ही मैत्रिणी मिळून वेडेवाकडे पण नाटकाचे प्रयोग करायचो. आज ते सर्व आठवून या क्षणी मलाच हसायला येतंय. मोलाचे ते क्षण आणि मोलाच्या त्या आठवणी अजूनही जश्याच्या तश्या जपून आहेत.

लग्नानंतर काही वर्षे मी परदेशात राहिले. त्यामुळे तिथे आपल्या देशाची ओढ मला विशेष जाणवली. तिथे भेटणारे भारतीय मला जास्त जवळचे वाटायचे. मी माझी ओळख एक भारतीय म्हणून द्यायचे. परदेशात होते तेव्हा स्वातंत्र्यदिन आला की पुन्हा जुन्या आठवणींचे वेध लागायचे.

येथे आपल्याला काहीही करता येत नाही अश्या वेळी देशासाठी कृतज्ञता व्यक्त करायला लिहिणे हा पर्याय मी निवडला आणि त्यासोबत माझ्या लेखनालाही वाव मिळत गेला. मी माझे लेखन अनेकांकडे पोहचवणे सुरू केले.

एक चित्रकलेची शिक्षिका म्हणून मला नेहमी वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना चित्रकला या क्षेत्रात आपण चांगल्या प्रकारे घडवावे. सद्ध्याच्या परिस्थितीत मी ओनलाईन चित्र शिकवणेही सुरू केले आहेत. मुलांसोबत पालकही आवर्जुन पाहतात आणि कौतुकाने सांगतात. आपणही या लिंकवर जाऊन पाहू शकता. आपला अभिप्राय देऊ शकता.   https://youtu.be/kvA8u42GE5w

आज मी माझे मुलं व माझ्या लहान विद्यार्थ्यांना त्यांची कल्पना शक्तीप्रमाणे चित्र काढायला प्रवृत्त करते आणि तेही त्यांच्या परीने उत्तम प्रयत्न करतात.

खरं तर ह्याने मला समाधान मिळतं. दरवर्षी प्रमाणे या वर्षी लिहिलेली कविता आणि काढलेली चित्रे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा म्हणून आपण स्वीकाराव्यात..

तिरंगा
इतिहास वाचताना कळतो मला तिरंगा
स्वातंत्र्य काय असते म्हणतो मला तिरंगा

जे शूरवीर झाले देशात कैक माझ्या
मी रोज त्यांस स्मरता दिसतो मला तिरंगा

जावे ऋणे भराया घ्यावेत जन्म पुढचे
डोळ्यात पापण्यासम जपतो मला तिरंगा

गवतातला सडा बघ तो पारिजातकाचा
ते रूप पाहताना स्मरतो मला तिरंगा

ही वेळ आज नाही आपापल्या लढ्याची
शत्रूस वार करण्या धरतो मला तिरंगा

दिपाली वझे

– लेखन : सौ. दिपाली महेश वझे, बेंगळूरू
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments