स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख…..
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म दिनांक २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे एका सरदार घराण्यात झाला. तर त्यांचे आत्मार्पण दिनांक २६ फेब्रुवारी १९६६ रोजी मुंबईत झाले.
जससजा काळ पुढे जात आहे, तसतसे त्यांचे विचार, कार्य यांची गरज आपल्याला तिव्रतेने जाणवत आहे ? यामुळेच देशविदेशात सावरकर सम्मेलने आयोजित होत आहेत, ही अत्यंत आवश्यक, अभिमानाची बाब आहे.
सावरकर राष्ट्रीय प्रतिष्टानतर्फे २६ -२७ फेब्रुवारी २०२० असे दोन दिवसाचे सावरकर राष्ट्रीय सम्मेलन नवी दिल्ली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसात विविध विषयांवर विचार मंथन झाले. या संमेलनात मला “स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समतेत दिलेले योगदान आणि त्याचे आजचे महत्व” या विशेष पैलूंवर बोलायची संधी मिळाली.
ब्रिटीश सरकारने, क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा सूड घेण्यासाठी, अनंत कान्हेरे या निधड्या छातीच्या तरुणाने नाशिकचा कलेक्टर ए एम टी जॅक्सन याला २१ डिसेंबर १९०९ रोजी गोळी घालून ठार मारले. या प्रकरणात सावरकरांवर ३८ दोषारोप ठेवुन त्याना जन्मठेप झाली.
४ जुलै १९११ पासून सावरकारांची अंदमान कारागृहात शिक्षा सुरू झाली.कारागृहात त्यांचा अनन्वित छळ सुरू झाला. तरी गप्प बसतील, ते सावरकर कसले ? तेथेही त्यांनी आपले कार्य सुरु केले.
साक्षरता प्रसार
कैद्यांमधील अज्ञान पाहून सावरकरांना त्यांना साक्षर करणे महत्वाचे वाटू लागले. त्यामुळे सावरकरांनी तुरुंगात साक्षरतेचे कार्य हाती घेतले.यामुळे अनेक कैदी साक्षर झाले. त्यांना कारकुनाच्या जागा मिळू लागल्या. अक्षरज्ञान करून घेतल्यामुळे जेव्हा कैद्यांना वृत्तपत्र वाचता येऊ लागले, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना.
ग्रंथालय उभारणी
साक्षरतेबरोबरच सावरकरांनी कारागृहात ग्रंथालय उभारणीचे कार्य हाती घेतले. जेव्हा त्यांनी अंदमान सोडले, तेव्हा तिथे दोन हजार ग्रंथ जमा झाले होते !.
कारागृहातुन पत्रकारिता
कारागृहात शारीरिक, मानसिक कष्ट, हाल अपेष्टा, अतोनात छळ होऊनही सावरकर खचले नाहीत. अशाही परिस्थितीत त्यांनी गुप्तपणे पत्रकारिता सुरूच ठेवली. क्रांतिकारक इंदूभूषण व उल्लास्कर यांचा छळ आणि हौतात्म्य याविषयीचे थरारक वृत्तांत भारतीय वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रसिद्ध केले. त्यामुळे इंग्रज अधिकारी हादरले. वृत्तपत्रातून झालेली टिका, मध्यवर्ती मंडळात विचारले गेलेले प्रश्न, लोकमताचे वाढते दडपण, या सर्वांचा सरकारवर दबाव आला. शेवटी १९१३ साली सर रेजिनाल्ड क्रडॉल यांनी अंदमानला भेट दिली. प्रत्यक्ष पाहणी केली. ते कैद्यांशी बोलले. त्यांनी सावरकरांची भेट घेतली. या सर्वांचा परिणाम होऊन अंदमानच्या यमपुरीतील छळ आणि निर्बंध किंचितसे सैल झाले.
अस्पृश्यता निर्मूलन
अंदमान कारागृहातून सावरकरांना रत्नागिरी कारागृहात हलविण्यात आले. हिंदू जाती व्यवस्थेमुळे एक होऊ शकत नाही, हे सावरकरांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यता निर्मुलना, जातीप्रथा निर्मूलन यासाठी सतत प्रयत्न केले. त्यांनी विविध कार्यक्रम हाती घेतले. २२ फेब्रुवारी १९३१ रोजी सर्वांना खुले असणाऱ्या रत्नागिरीतील पतित पावन मंदिराचे उद्घाटन झाले. आचार्य, शंकराचार्य, पंडित, देशभक्त यांनी जाहीर केले की, रत्नागिरी हे एक तीर्थक्षेत्र बनले आहे. एक वक्ते म्हणाले, रत्नागिरी ही नवजागृत, शुद्धीकृत, एकीकृत हिंदू जगताची नवं काशी ठरली आहे. ब्राह्मणांनी या उपाध्याय, प्रवचनकारांना हार घालून नमस्कार केले. एका ब्राह्मण तरुणाने अखिल हिंदू उपाहारगृह चालविले होते. खरोखरच पतितपावन मंदिर हे अखिल भारतीय हिंदू चळवळीचे विद्यापीठ बनले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “जनता” पत्राने सावरकरांनी केलेल्या उपदेशाला पाठिंबा दिला. त्याआधी काही दिवस सावरकरांनी एक पत्रक काढून, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी नासिक येथे चालविलेल्या मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहाला आपला पाठींबा जाहीर केला होता. “दलित वर्गाच्या हिंदूंना काळाराम मंदिर उघडे करा” अशी नासिकच्या सवर्ण हिंदूंना सावरकरांनी त्या पत्रकाद्वारे विनंती केली होती. भाऊराव गायकवाड यांनी नासिकच्या सवर्ण हिंदूंमध्ये ते पत्रक वाटले होते. “मी जर आज मोकळा असतो तर नासिकच्या सत्याग्रहात भाग घेऊन आधी पहिल्या प्रथम तुरुंगात गेलो असतो.” असे उद्गार सावरकरांनी काढले होते.
विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन
सावरकरांचा दृष्टिकोन सम्पूर्णतः आधुनिक, विज्ञाननिष्ठ होता. मानवाला जे साधक ते चांगले आणि जे बाधक ते वाईट,अशी त्यांची विचार सरणी होती. यंत्र हा शाप नसून मानवाला मिळालेले ते वरदान आहे, बेकारी हा यंत्राचा दोष नसून तो विषम वाटणीचा आहे, असे प्रतिपादन सावरकर कटाक्षाने करीत.
एका लेखात सावरकरांनी निरीश्वरवादी रशियाच्या अंतराळ प्रगतीचे वर्णन करून विज्ञानाची कास धरण्याचे कळकळीचे आवाहन हिंदूना केले आहे. मानव अहितासाठी नव्हे तर मानव हितासाठी विज्ञानाचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट मनुष्याने ठेवले तर विज्ञान हे वरदान ठरेल, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता.
लिपी सुधारणा
लिपी सुधारणा, पंचांग सुधारणा याहीकडे सावरकरांनी लक्ष दिले होते.या विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले, पुस्तके प्रकाशित केली.
सावरकरांनी छापखान्यातील नागरी टंक २५० वरून ८० वर आणुन दाखविले .ही सर्वाधिक शास्त्रीय लिपी आहे, असे मुंबईच्या एका सभेत त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पंचांग आवश्यकता या विषयावर त्यांनी केसरी वृत्तपत्रात दोन लेख लिहिले होते.
सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी शब्द सुचविले आणि ते प्रचारात आणले. हे सर्व शब्द आज रूढ झाले आहेत. त्यातील काही शब्द म्हणजे, “मेयर”ला महापौर, “बजेट’ ला अर्थसंकल्प, “टेलीप्रिंटर” ला दूरमुद्रक इत्यादि.
आत्मार्पण १९६६ च्या प्रारंभी सावरकरांची प्रकृती विकोपाला गेली.त्यांनी औषध सोडले. पचनक्रिया बिघडल्याने अन्न वर्ज्य केले .आधार घेऊन ते उठू शकत. त्यांना वेदना सहन होत नव्हत्या. मृत्यू केव्हा येईल, असे त्यांना झाले. एका लेखात, त्यांच्या दृष्टीसमोर तरळणाऱ्या अंतकाळाची सूचक कल्पना त्यांनी मांडली. ते म्हणतात, अत्यंत असमाधानाने, विफलतेच्या तीव्र जाणिवेने, संकटाना कंटाळून, इच्छा असतानाही सुखाने जगता येत नाही म्हणून, अत्यंत अतृप्त अशा मनस्थितीत, वैतागाच्या भरात बळाने जे जीव देतात, त्यांच्या त्या कृत्याला साधारणत: “आत्महत्या” म्हटले जाते. पण आपले जीवितकार्य सफल झाल्याने, आपल्या ऐहिक अस्तित्वाची हर्षभराने समाप्ती करतात, त्यांच्या या कृत्यास “आत्मार्पण” म्हणतात.
सावरकरांनी आपल्या विचारांना जागून आत्मार्पण करण्याचा निर्धार केला. ३ फेब्रुवारी१९६६ रोजी त्यांनी उपोषण सुरू केले. ते २३ दिवस चालले. शेवटी २६ फेब्रुवारी १९६६ रोजी सकाळी ११ वाजता, वयाच्या ८३ व्या वर्षी या खऱ्या स्वातंत्र्यविराने आपला देह मृत्यूला अर्पण केला.
भारतमातेच्या या महान, कणखर, प्रखर सुपुत्रास शतशः नमन…
– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
खरोखरच भारतमातेची ही कणखर महान दैदीप्यमान रत्नेच.
सावरकारांसारखी माणसं कारागृहातही मुक्त असतात.त्यिंच्या ध्येयवादाला कुठल्याच शृंखला अडकवू शकत नाहीत.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र हा फक्त इतिहास नसून भारतियांनी तो वर्तमान आणि भविष्य या अनुषंगाने समजावून घेतले पाहिजे,जाज्वल्य देशभक्ती ही त्यांच्याकडूनच आणि जाज्वल्य धर्माभिमान छत्रपती संभाजी राजे यांच्या चरित्रा वरुन घ्यावा.
जयहिंद