Saturday, May 31, 2025
Homeसाहित्यस्वातंत्र्यवीर सावरकर : काही कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर : काही कविता

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने काही कविता सादर करीत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन.
— संपादक

१. असे सावरकर

स्वातंत्र्यवीर कल्पनांचा महासागर
स्वराज्य सुराज्य संकल्पनांचा अविष्कार IIधृII

ठिणगी नव्हे नुसती होते प्रज्वलित अग्नी
तादात्म्य होते एक रूप मन कर्मवचनी
व्यक्तित्व कृतित्व वक्तृत्व कवी कर्मवीर II1II

तप तत्व त्याग तेज तळपे सतत
क्रांतीच्या आवेगात होते चांदणे कवितेत
तितिक्षु जहाल हळवे होते सावरकर II2II

क्रांती भक्ती असाध्यत्व होते कुटुंबात
उद्वेग आवेग संवेग होते सम्मिलित
विरत्व कवित्व चंद्राशी गुज अलवार II3II

समाज सुधारक विद्वान टाळती भेदाभेद
मराठी भाषाप्रभू इंग्रजीला देती प्रतिशब्द
पुरोगामी विचारवंत इतिहासकार II4II

भूवरी पाय रोवून उंच भरारी घेत
आकाशी विहरताना धरित क्रांती ज्योत
दुष्प्रवृत्ती विरुद्ध लढती सावरकर II5II

मंत्र दिला सर्वांना तुजसाठी मरण जनन
स्वातंत्र्यार्थ चिंता वाहून केले मार्गदर्शन
त्यजिली पदे देह भारत माँ चरणावर II6II

— रचना : अरुण गांगल. कर्जत, रायगड

२. अनादी मी अनंत मी.

तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण मरण ते जनन

हिंदू तेज सूर्य उगवला
तेजाने तळपला
आसमंती झळकला
ध्रुवतारा झाला

ध्यास स्वातंत्र्य संग्रमाचा
वनवास तुरुंगवासाचा.
दृढनिश्चयी विश्वासाचा.
ज्वाज्वल्य राष्ट्रभक्तीचा.

क्रांतीचा यज्ञकुंड
रचले षडयंत्र पुकारले बंड
अथक प्रयत्न अन् अफाट कष्ट

निश्र्चयाचा महामेरू जगाते उद्धारू
अथांग कार्य अन् अतुलनीय कर्तृत्व
नतमस्तक नेतृत्व.

फिरंग्यांचेही धाबे दणाणले.
यश कीर्तीचे शिखर गाठले.
स्वतंत्रता देवीस सिंहासनी बैसविले

विनायक नाम सार्थ केले.
जनसामान्यांच्या
हृदयात विराजमान झाले.

भारतमातेचे पांग फेडले.
स्वातंत्र्यवीरांचे नाव अजरामर झाले.

अभिवादन त्या तेजाला
उदात्त बलिदानाला
मूर्तिमंत योगदानाला
महाराष्ट्राच्या देवपुत्रला

विनम्र आदरांजली
वीर सावरकर जयंती

— रचना : मीरा जोशी.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मरण

(वृत्त- हरिभगिनी/स्वरगंगा)

मातृभुमीचे रक्षण करण्या प्राण जयांचे तळमळले l
स्वातंत्र्याच्या आहुतीमधे समिधा होउन जे जळले ll१ll

देशप्रेम अन् स्वदेशभक्ती भरली ज्यांच्या रूधिरात l
महा-साहसी, वीर-पुरुष ते, केली मृत्यू वरी माता ll२ll

खुलीलेखणी, शब्दसंपदा, स्मरणशक्तिची तल्लखता l
लिहिली त्यांनी अनेक सुंदर समरगीते आणि कविता ll३ll

जरी मोडले, कधी न झुकले सोशिकतेची परिसीमा l
कुटुंबियांचा त्याग करोनि जपत राहिले भारतमाॅं ll४ll

दोन तपांची जन्मठेप तरी मुद्रा होती हसणारी l
ना डगमगला राष्ट्रभक्त हा सुरू ठेवली कामगिरी ll५ll

कोलुभोवती फिरता फिरता लाख वेदना हातांना l
सेल्युलरच्या कोठडीमधे भोगत होते नरकांना ll६ll

सर्वस्वाची होळी करुनी देशासाठी ते लढले l
स्वातंत्र्याची प्रबळ कामना हेच आत्मबळ मनातले ll७ll

जाज्वल्याची धगधगणारी मशाल होती निजधामीl
देहामधल्या कणाकणातहि जपली होती जन्मभुमी ll८ll

भारतभूच्या बेड्या पाहुन रक्त जयाचे सळसळलेl
देशभक्त ते सावरकरजी देशासाठी झिजलेले ll९ll

स्वातंत्र्याची गौरवगाथा या नावाविन नित अधुरी l
कृतघ्न आम्ही भारतवासी भारतरत्न नसे पदरी ll१०ll

— रचना : सुरेश शेठ. पुणे

४. स्वातंत्र्याचा निर्धार…!!!

करू जयजयकार मातृभूमी तुझा,
तुज स्वतंत्र करीन, निर्धार हाच माझा,

किती अवहेलना, कष्ट नि त्रास,
किती पुण्यजना, घोर वनवास,
किती साहुनी यातना, उपवास,
हा प्रण केला, अर्पिन प्राण तव काजा,

तुज स्वतंत्र करण्यासाठी, जे झिजले,
साहून यातना, अर्थ, घाम, रक्त दिधले,
सर्वस्व पणाला लावून, तुजला स्तविले,
आण घे त्यांची, त्यांना भूषविन मौजा,

जो मुकुटमणी, एक ध्यास स्वातंत्र्य,
सशस्त्र होऊन, वंदे मातरम् म्हणे मंत्र,
चैतन्य जागवी, संघटन, शुद्ध पवित्र,
त्या विनायका, त्रिवार दंडवत माझा…!!!

— रचना : हेमंत भिडे. जळगाव

५. जाज्वल्य काव्य

त्यागिले तयानी स्वजीवन
घेऊनी स्वराज्याची आण
वाढवूनी स्वतःची शान
समर्पिले हो आपुले प्राण..1

पडले धारातीरथी बहुजन
होऊनी नतमस्तक सर्वजण
करुनिया अविरत वंदन
स्वभूमीस कित्येकजण.. 2

जाज्वल्य काव्य प्रसवले
तैल बुद्धीमत्ते चा शूरवीर
कागद ना लेखणी शिवाय
कारागृही च्या भिंतीवर.. 3

लेखणी त्यांची, विचार जहाल
अन्यायाची पेटवी मशाल 
अशा देशभक्ताचे आपण
करू या जयजय सन्मान.. 4

सावरकर ते येथे जन्मले
त्याग करुनी वाढवूनी शान
घाण्यास जोडूनी हाल झाले
वीर होऊनी जाहले महान.. 5

अनादी अनंत, महान कार्य
मारता शत्रूस, झुंझुनी मरेन
वाणी लेखणी सह जीवन सार्थ
थोर देशभक्तास शतशः नमन.. 6

— रचना : सौ.मीना घोडविंदे. ठाणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम
उज्ज्वला केळकर on वि दा सावकर : चित्र कथा
अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर