Wednesday, March 12, 2025
Homeसाहित्यस्वातंत्र्योत्तर साहित्य : 'ती' च्या लेखणीतून !

स्वातंत्र्योत्तर साहित्य : ‘ती’ च्या लेखणीतून !

स्वातंत्र्योत्तर साहित्य: ‘ती’ च्या लेखणीतून !

“जशी हाती धरली तू लेखणी
तुझी घुसमट, तुझी व्यथा, तुझीच कविता, तुझीच कथा,
वेगळी काय असेल ती,
तूच निर्मिली तुझीच
साहित्य गाथा
तुझीच साहित्य गाथा”

काळाची फुल बदलली तरी स्त्रीत्वाचा धागा तोच हे काळनेच सिद्ध केले आहे.

साधारणतः तेराव्या शतकापासून स्त्रिया मराठी भाषेतून लिहित्या झाल्या. त्याविषयी त्यांच्या लिखाणा मागची तत्कालीन सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परंपरा, रुढी रितींचा पगडा, वांड्.मयीन मूल्याचा प्रभाव, होऊ घालणारी सामाजिक स्थित्यंतरं, स्त्रीत्वाचे भान, आत्मसन्मान जपण्याचे वेध, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये निर्माण झालेली स्वअस्तित्वाची जाणीव, स्त्री मुक्ती आंदोलनाचे परिणाम, संस्कृती जपणारे लेखन करत करत समाजाचा मागोवा घेत कधी कधी अन्यायाविरुद्ध नकळत लिखाणातील आधुनिकतेकडे वळलेली स्त्री…… असे अनेक कंगोरे स्त्री लेखनातून दिसून येतात.

स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री लेखनाचा धावता आढावा घ्यावा म्हटलं तरी अनेक स्त्री साहित्यिका असून सर्वांचाच येथे उल्लेख करता येणे शक्य नाही. सर्वच ज्ञात, अज्ञात साहित्यिकांना वंदून जास्तीत जास्त लेखिका, कवयित्री यांचा नामोल्लेख करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. यातील जवळजवळ सगळ्याच जणी वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

स्वतः जवळ अत्यंत प्रगल्भ अशी प्रतिभा आहे याबद्दल अनभिज्ञ असलेलं, वास्तवतेच्या चटक्यांनी तावून सुलाखून निघालेलं एक अफलातून व्यक्तिमत्व म्हणजे बहिणाबाई चौधरी.
स्वयंप्रेरणेने आतून आलेली भावना म्हणजे बहिणाबाईंची कविता, ग्रामीण जीवनशैलीशी बांधली गेलेली नाळ, ईश्वरभक्तीचे प्रकटीकरण, निसर्ग व बळीराजाची सांगड अशी विचारांची एक स्वतंत्र चौकट हे बहिणाबाईंचे लेखन वैशिष्ट्य.
‘माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरादी टांगलं,
माझं दुःख माझं दुःख तळघरात रे कोंडल’

‘माय नांदते सासरी
लेकीच्या ग माहेरासाठी’
हे सांगणारी एक संवेदनशील कवयित्री.
त्यानंतर अनेक कवयित्री ज्यात संजीवनी मराठे, इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे, प्रभा गणोरकर, शिरीष पै, वृंदा लिमये, सुहासिनी इर्लेकर, रजनी परुळेकर, निरजा, प्रज्ञा लोखंडे किती म्हणून नावे घ्यावीत. प्रत्येकाचा धावता आढावा घ्यावा म्हटले तरी शब्द मर्यादेमुळे येथे शक्य होणार नाही.

इंदिरा संतांच्या कवितांचा जर परामर्श घेतला तर स्व: दुःख व सर्वस्पर्शित्व, निसर्ग सानिध्य हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य.
‘तिच्या जाणिवेची कळ कशी कुणा सांगायची
नव्या संसाराची राणी, राणी नाही हृदयाची’
त्यांच्या ‘गर्भरेशीमला” साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला.

रचित सुनीते, प्रेम भावना व हळुवारपणा जपत जपत पुढे कधीकधी अंतर्मनाची घुसमट व नैराश्य या आत्मानुभूतीने अधिकाधिक अंतर्मुख होत गेलेली कविता म्हणजे कवयित्री शांता शेळके यांची कविता.
शांताबाईंनी चित्रपट गीते, भावगीते, कोळीगीते भूपाळी, आरती, अशा विविध प्रकारातून लेखन केले. छंदोबद्ध व वृत्तबद्ध लेखन हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य.
उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म असल्यामुळे आत्म तृप्तीपर लेखन, आकर्षण व प्रेमभावना, निसर्गाशी नातं, सुखाच्या गर्भरेशमी कोशातील लेखन हे पद्मा गोळे यांचे लेखन वैशिष्ट्य. त्यांचे एकूण पाच कविता संग्रह प्रकाशित आहेत.

शिरीष पै या प्रल्हाद केशव अत्रे यांच्या कन्या. कवयित्री ,संपादक, नाटककार ज्यांनी जापानी काव्य प्रकार ‘हायकू’ प्रथमत: मराठी भाषेत आणला. उत्कट प्रेम भावना हे ज्यांचे लेखन वैशिष्ट्य. यांचे आईची गाणी, हायकू, एका पावसाळ्यात, एकतारी असे अनेक कवितासंग्रह प्रकाशित झाले.
आधुनिक कवितांमध्ये प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, मल्लिका अमरशेख आशा कवयित्री महत्त्वाच्या ठरतात.
प्रभा गणोरकरांनी मध्यम वर्गीय स्त्रीची घुसमट व स्व अस्तित्वाची जाणीव, समाज मर्यादा सांभाळून चाकोरी बाहेर जगता येण्याची धडपड त्यांच्या लेखनातून चित्रित केली आहे.

पद्य, गद्य, ललित लेखन, कादंबरी, नाटक, लघु निबंध, गझल, लघुकथा अशा विविधांगी क्षेत्रात स्त्रिया लिहित्या झाल्या. कुणी इंग्रजीत, कुणी हिंदीत, कुणी मराठीत कुणी पंजाबीत अशा विविध भाषेत वा आपापल्या प्रादेशिक भाषेत स्त्रिया लिहित्या झाल्या. कुणाकुणाची म्हणून नावे इथे घ्यावीत.

ज्यामध्ये अमृता प्रीतम, महादेवी वर्मा, योगिनी जोगळेकर, सरोजिनी बाबर, अरुणा ढेरे, सुधा मूर्ती, विजया राज्याध्यक्ष अशा विविध अंगी पैलू असणाऱ्या लेखिका त्यामध्ये सुधा मूर्ती यांच्या ‘वाईज अँड अदरवाईज’, ‘गोष्टी माणसांच्या’ या पुस्तकांचा आवर्जून नामोल्लेख करावा वाटतो. ज्यामध्ये सामान्य आणि असामान्य जनमाणसांच्या व्यक्तिरेखा चित्रित केलेल्या आहेत.
यामध्ये प्रथमतः महादेवी वर्मा एक चिंतनशील व संवेदनशील हिंदी साहित्यिका, ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या, लेखिका, कवयित्री यामा साठी 1982 चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. प्रेम या संकल्पनेला त्यांनी अलौकीकतेच्या पातळीवर नेलं हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य. स्त्री जीवनातल्या व्यथा, दुःख,विषमता, दैन्य, दुय्यम स्थान, समाजातील अंधश्रद्धा, उपेक्षितांचे दुःख त्यांनी ऐरणी वर आणलं. त्यांचे हिंदी साहित्य अजरामर ठरलं आहे.

अमृता प्रीतम
सुप्रसिद्ध पंजाबी लेखिका व कवयित्री. समाज जीवनाच्या चौकटी बाहेर जाऊन वास्तवतेच्या कोंदणात लिहीणे ही त्यांची खासियत खुबी हे त्यांचे लेखन वैशिष्ट्यं. सहजी जनसामान्यांना पचनी न पडणारी विचारसरणी. अध्यात्माचं सखोल ज्ञान व आधुनिकतेची जोड असं संमिश्र लेखन. पंजाबी संस्कृती व स्त्री मनाची घुसमट त्यांच्या लिखाणात निदर्शनास येते.हरजितचा जिंदगीनामा तसेच त्यांचे आत्मचरित्र रशीदी टिकट अशी अनेक पुस्तके प्रकाशित. त्यांच्या आत्मचरित्रास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला असून एक बंडखोर लेखिका म्हणून त्यांची जनमानसात प्रतिमा आहे.

योगिनी जोगळेकर एक लोकप्रिय लेखिका ज्यांनी चाळीस कादंबऱ्या, बावीस कथासंग्रह, चार कविता संग्रह, बारा बाल वांड्.मय संग्रह, तीन नाटके अशी विपुल साहित्य सेवा केली. प्रत्येकच लेखिकेचे येथे साहित्य विवरण देणे शक्य नाही. जोगळेकरांच्या बहुतेक कथातील स्त्रिया सोशिक, सात्विक ,प्रेमळ व भाबड्या दिसतात.
लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक रामचंद्र ढेरे यांच्या सुविद्य कन्या डॉ.अरुणा ढेरे यांनी आपली स्वतंत्र प्रज्ञा आणि प्रतिभा यांच्या बळावर परंपरेचे महत्त्व आणि सत्व प्रकट करतच स्त्री आणि तिचे भाव जीवन याचेही सुंदर वर्णन स्वलेखनात केले आहे.

नाट्य क्षेत्र लेखनात ही स्त्रिया कुठेही कमी नव्हत्या.

  1. गिरीजाबाई केळकर
    नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा पहिला मान मिळविणारी स्त्री नाटककार .
  2. शांता गोखले
    नाट्य समीक्षक, मार्मिक व सखोल नाट्य समीक्षा, बहुअंशी इंग्रजीमध्ये लेखन
  3. विमल घैसास
    स्वतःची नाटक कंपनी
    1995 साली कुंपणावरची कोरांटी हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
  4. मालती दांडेकर
    प्रसिद्ध नाटककार स्त्री समस्या प्रधान नाटके व विनोदी नाटक हे त्यांचे लेखन वैशिष्ट्य आहे, एकूण 18 कथा संग्रह प्रसिद्ध.
  5. मालती बेडेकर
    परितक्त्या स्त्रीला कुटुंब तसेच समाज या दोन्ही पातळ्यांवर कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो. साधारणतःअशा वळणाचे लेखन, मॅजेस्टिक पुरस्काराने सन्मानित, 1988 मध्ये विभागीय संमेलनाध्यक्ष
    पारध हिरा जो भंगला नाही अशा प्रकारची नाटके
    घराला मुकलेल्या स्त्रिया संशोधनात्मक लेख,
    स्त्री जीवनातील मनस्वी नीचे चिंतन हा निबंध संग्रह.
  6. .कुमुदिनी रांगणेकर
    कादंबरीकार, कथालेखक, अनुवादक, नाटककार
    एका स्त्रीच्या पाठीमागे स्त्रीनेच खंबीरपणे उभे राहावे या विचारसरणीच्या लेखिका.

प्रतिभा ही दैवी शक्ती असून, आतल्या आवाजाचे ते एक प्रतीक म्हणून स्त्रिया व्यक्त होत गेल्या. परमेश्वर ही ताकद प्रत्येकाला देतो असे नाही, या ताकदीच्या बळावर स्त्रियांनी स्वतःच्या व्यथांना आणि कथांना वाचा फोडली, अंतरीक घुसमट, भावभावनांचे प्रकटीकरण केलं, वात्सल्य मूर्ती चित्रित केली, हळुवार हृदय उलगडून दाखवलं, प्रसंगी स्वतःचा हेका, स्वतःची बंडखोरी, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकदही ही आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्यक्त केली. या सर्व उदात्त, शुद्धात्म्यांप्रती मी नतमस्तक.

— लेखन : संगीता कासार.
मुख्याध्यापिका, श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, लातूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित
सौ.मिनल शशिकांत शिंदे, on चित्र भाषा संमेलन : अभिनव उपक्रम