Sunday, July 13, 2025
Homeसाहित्यस्वातंत्र्य दिन : काही कविता…

स्वातंत्र्य दिन : काही कविता…

१. स्वातंत्र्य दिन

गुलामगिरीतूनी झालो स्वतंत्र
संविधानाने दिली समानता, न्याय
सत्य निष्ठा, आरोग्यसेवा सुविधा
केली प्रगती सर्व क्षेत्रात ||१||

आज स्रीवरी होतो अन्याय
तिचा जन्म ठरतो मरण
सर्व क्षेत्रात तिची धडाडी
तरी घरात तिचे सरण ||२||

बळिराजाचा रोजचा बळी
सैन्य रोजच पडे शत्रूस बळी
युवा पिढी पैश्यामागे धावे
मनोरूंग्ण नायक, नायिका मरती ||३||

नशेने डुंबली युवा पिढी
वृध्दाश्रमाच्या वाढती छत्र्या
परदेशात ज्ञानाची किंमत
भारतात ज्ञानाकडे पाठ ||४||

विकासाच्या प्रवाहात जो न आला
त्याला द्याना लाभाची वाट
ज्ञाना समोरी समान सारे
देशसेवा करा सक्तीची बात ||५||

महागाई, मंत्र्यांचे अव्यापार
टाळा आता न्याय वाढा समान
भ्रष्टाचार टाळा योग्यतेने पद भरा
तरच स्वातंत्र्याचे करू अमृतपान ||६||

— रचना : अंजली सामंत. डहाणू.

२. “तिरंगा

भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याला वंदन
विश्व मार्गदर्शक असे राखूया सन्मान ।।ध्रु।।

अस्मिता आहे तीन रंगांचे मिश्रण छान
भावार्थ भरला आहे रंगात मौल्यवान
रचिता पिंगाली व्यंकय्यांचे करू स्मरण ।।1।।

ध्वजाचे महत्त्व आहे पूर्वापार अनन्य
अद्वितीय आहे चढवू गगनी निशाण
राहावे नम्र राखावे त्याचे अधिष्ठान ।।2।।

केशरी रंग दावी ऊर्जा त्याग बलिदान
शिकवे सोशिकता आत्मविश्वास स्वाभिमान
एकाग्रता सूर्य तेजासम चैतन्य जाण ।।3।।

भूमी रंग सतेजता संस्कृती अग्नि चिन्ह
रक्तरंग निशाण ध्येयासक्त निष्ठावान
परंपरा यशस्विता स्फुल्लिंग वीर शान ।।4।।

सफेद रंग दावी स्वच्छता शांती सद् वर्तन
सहिष्णुता एकात्मता निर्व्याजता आल्हाद
सर्व रंगात मिसळणारा जाई सामावून ।।5।।

हिरवा रंग दर्शवी सृष्टी वैभव शान
नेत्र सुख समृद्धी दाता गारवा आल्हाद
हरित सृष्टी रक्षुया सांभाळू पर्यावरण ।।6।।

अशोक चक्र सांगे धर्म कायद्याचे निधान
चोवीस आरे सांगती प्रगत गतिमान
सर्वं भार वाहे अन्याय भेदी सुदर्शन ।।7।।

अरुण गांगल

— रचना : अरुण गांगल. कर्जत-रायगड

३. देशामध्ये

बंधुत्वाने राहू आपण देशामध्ये
सुखात सारे नांदू आपण देशामध्ये

नवतंत्रज्ञान शिकून पुढेच झेपत जावू
प्रगत गीतास गाऊ आपण देशामध्ये

हिंदू मुस्लिम सिख ईसाई एकच सारे
भेदभावास सारू आपण देशा मध्ये

हिरवा निळा व केशरी जरी रंग वेगळे
तिरंगा उंच नेवू आपण देशामध्ये

झाडे लावू झाडे जगवू सभोवताली
निसर्ग ठेवा ठेवू आपण देशामध्ये

प्रा.अनिसा शेख

— रचना : अनिसा सिकंदर. दौंड

४. तिरंगा

आहे त्याचा अभिमान
तिरंग्यात रंग चार
नील नभी फडफडे
शोभूनच दिसे फार  ||१||

केशरीत त्याग धैर्य
सत्य शांतता पांढरा
प्रेम विश्वास हिरवा
गति ती अशोक चक्रा  ||२||

दिला लढा स्वातंत्र्याचा
शूरवीर ते महान
रक्त सांडे भूमीवर
जीव ठेविला गहाण  ||३||

सीमेवरी सैनिकांना
जीवाचीही पर्वा नसे
शांत झोप आम्हा येई
रात्रंदिन गस्त असे     ||४||

भारताची शान आहे
तिरंग्याला मान आहे
स्वातंत्र्याचे दान आहे
आम्हालाही भान आहे  ||५||

आपणही तिरंग्याचे
घेऊ महत्त्व जाणून
स्वाभिमान ठेवू जागा
घरोघरी तो आणून  ||६||

— रचना : डॉ. सौ.अनुपमा पाटील. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अंजली सामंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज दिसणारे विषम वातावरण सुरेख स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments