भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वर्षीच्या जयंती निमित्त, युवा विवेक तर्फे आयोजित काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेली कविता.
जिथे वेगळे रंग वसती सुखाने,
अशी बाग ही भरतभूमी दिसे.
जरी एक माती फुले भिन्न फुलती
तिचे नाव हे लोकशाही असे.
जरी शेकडो साल केली गुलामी
रुजे लोकशाही इथे लीलया.
तिचे मूळ स्वातंत्र्य, बंधुत्व, समता
युगांपासुनी हेच रक्तात या.
असे रामराज्यातली ही त्रिसूत्री
उभे हिंदवी राज्यही त्यावरी.
दिली हीच शिकवण इथे प्रेषितांनी
रूजे संस्कृतीतून ती अंतरी.
मिळे स्थान ही राजघटनेत त्यांना
दिशा दाखवी न्याय संस्थेसही.
जसा वंद्य आम्हास आहे तिरंगा
तशी वंद्य मूल्ये अम्हा तीन ही.
नसे येथ बंधन विचारास काही
नसे कोणते व्यक्त करण्यासही.
मिळे पूर्ण स्वातंत्र्य श्रद्धांस साऱ्या
असो पूज्य कोणास चार्वाकही.
इथे लिंग, जातीमधे भेद नाही
जरी पंथ असले किती वेगळे.
कुणी उच्च नाही कुणी नीच नाही
यथायोग्य साऱ्यास संधी मिळे.
किती धर्म, भाषा असे वाद झाले
तरी एक नाते असे “बंधुता”
म्हणो मूर्ख, होतील तुकडे हजारों
तरी भंगते ना कधी एकता.
उभी याच तत्वांवरी लोकशाही
जिवापाड त्यांना जपूया चला.
तिचा मंत्र “स्वातंत्र्य बंधुत्व समता”
मिळूनीच सारे जपू या चला.
असे आगळे एक मंदिर उभारू
जिथे मूर्त होईल एकात्मता.
अशी सौख्य, शांती इथे पाहुनी हा
पुन्हा बुद्धही शांत हासे अता.

– रचना : समीर जिरांकलगीकर., कॅनडा