Sunday, July 13, 2025
Homeलेखस्वामी विवेकानंद आणि तरुण

स्वामी विवेकानंद आणि तरुण

स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे.
त्या निमित्ताने हा विशेष लेख.
स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

प्राचीन काळापासून ते आजपर्यंत इतिहासात अशी साक्ष मिळते की व्यक्ती ज्या वातावरणात वाढतो तसाच तो त्याच्या भविष्यात घडत जातो.

आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार हे आपल्यातील सकारात्मक विचार होय. मन, मस्तिष्क आणि मनगट यांचा संगम योग्य वेळी आणि योग्य प्रकारे झाला तर समाजात व्यक्तीची प्रगती होण्यापासून कोणीही त्याला थांबवू शकत नाही.

शिक्षणाचे स्वरूप काळानुसार बदलत जाते. काळानुसार घडून आलेली नवपरिवर्तने आपण आजही अभ्यासत असतो. या सृजनशील परिवर्तनातून राजकीय, सामाजिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक बदल घडून येतात.

शिक्षण या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे.
‘ शि ‘ म्हणजे शिस्तप्रिय
‘ क्ष ‘ म्हणजे क्षमताधिष्टीत
‘ ण ‘ म्हणजे न्यायपूर्ण

या त्रिवेणी एकात्मतेतून व्यक्तीची  वैचारिक क्षमता विकसित होते. शिक्षणातून व्यक्ती पुढे जाऊ शकतो पण संस्कारक्षम शिक्षणातून व्यक्ती समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो.

स्वामी विवेकानंदांचे विचार हे आजही प्रेरणादायी आणि समाजाला वेगळी दिशा देणारे आहेत. जीवनात ध्येयाकडे जाणारी वाट कितीही खडतर असली तरी ध्येय गाठेपर्यंत शांत बसू नये,हा मूलभूत विचार स्वअनुभवातून विवेकानंदानी समाजाला दिलेला आहे.

आजच्या तरुण पिढीचा विचार करता कमीत कमी कष्टामध्ये लवकरात लवकर यशस्वी होण्याचा मानस दिसून येतो. ज्या वेळेला या तरुण पिढीला यशप्राप्ती होत नाही त्यावेळेला ही पिढी नैराश्याकडे वळलेली दिसून येते. त्यामुळे आजच्या तरूण पिढीला योग्य मार्गदर्शन, दिशा, प्रेरणा मिळण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे  विचार त्यांच्या जीवनात आणि आचरणात  रुजवणे महत्त्वाचे आहे.

कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अपार कष्ट याच्या बळावर व्यक्ती समाजात किती पुढे जाऊ शकतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव केवळ भारतावर नाही तर जगावर आहे.

जीवन परिचय
स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे झाला. त्यांचे नाव नरेंद्र दत्त होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरीदेवी दत्त. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त यांचा पाश्चात्य संस्कृतीवर विश्वास होता. आपला मुलगा नरेंद्र याला इंग्रजी शिकवून त्याने पाश्चात्य सभ्यतेच्या पद्धतीवर चालावे अशी त्यांची इच्छा होती. नरेंद्रची बुद्धी लहानपणापासूनच तीक्ष्ण होती आणि ईश्वर प्राप्तीची तळमळही प्रबळ होती. पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.

कार्यप्रणाली
स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे विद्वान होते. विवेकानंदानी  ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञानयोग’ असे ग्रंथ तयार करून  जगाला नवीन मार्ग दिला आहे. ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर आहे. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या कार्याची गाथा सांगते. त्यानी  अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे मानवी जगताला  जगणे  शिकवले.

स्वामी विवेकानंदाचे गुरू रामकृष्ण यांनी कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ त्यावेळेस नरेंद्रनाथ म्हणाले, “हे माझ्याने होणार नाही.” रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “होणार नाही ? अरे तुझी हाडं हे काम करतील.”

पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले. त्यावेळेपासून त्यांच्या जीवनाचे लक्ष्य फक्त धर्माचा प्रसार करणे आणि लोकशिक्षण देणे हे झाले. याच उद्देशाने रामकृष्ण मठाची स्थापना श्री. रामकृष्णांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी आपले गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात केली.

ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यातच आहे, या त्यांच्या विचारातुन व्यक्तीला स्वतःच्या आत्मशक्तीची जाणीव होते.

स्वतःचा विकास तुम्हाला स्वतःलाच घडवावा, अध्यात्माच्या माध्यमातून घडवावा लागेल. व्यक्तीचे विचार त्याच्या जीवनात खूप महत्वाचे ठरतात तो जसा विचार करतो तसाच घडतो.

आजच्या तरुण पिढीत कमी झालेली जिद्द, प्रसार माध्यमांचा वाढता वापर, कष्टाची कमतरता, चिंतन – मनन यांच्यापासून दूर चाललेली पिढी प्रगतीपासूनही दुरावत आहे. समाजात जगत असताना प्रत्येक मानवाला चिंतन करण्याची गरज आहे. यातून नव्या विचारांना जन्म मिळतो.

समाजाच्या धार्मिक जीवनाला कलाटणी देणारा आणि आजच्या समाजामध्ये सत्यधर्माची विचारशैली रुजवणे गरजेचे आहे.

11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिका शहरातील शिकागो – आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्म परिषदेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली. तिथुन त्यांची नवीन ओळख निर्माण झाली. “जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा  प्राचीन संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो” या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान केले.

ह्या परिषदेत विवेकानंदांनी वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकला. त्यांच्या अलौकिक व्याख्यानाने अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधले. वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन ‘भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी’ असे केले.

सामाजिक विज्ञान, इतिहास, धर्म, कला, साहित्य याचे सखोल ज्ञान विवेकानंद यांना होते. ध्यान, योग, मनन, चिंतनाद्वारे समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविला. करुणा, निर्भयता, कुशाग्र बुद्धिमत्ता, ज्ञान, सेवा, कर्मठता या  गुणांच्या संगमातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. आपले जीवन फक्त आपल्यासाठीच नाही तर समाजासाठी आहे. विश्वबंधुत्व, विश्वकल्याण, विश्वसमर्पकता या गुणांचा विकास व्यक्तीचा ठाई त्यांच्या जीवन प्रवासातून समर्पकपणे  होतो.

आजच्या सध्यस्थितीत शाळेपासून ते महाविद्यालयीन जीवन जगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विवेकानंदाचे विचार नवसंजीवनी देणारे आहेत. येणारी पिढी सृजनशील, कार्यक्षम आणि मानवतेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी  विवेकानंदाचे विचार महत्त्वपूर्ण आहेत.  नवीन विचारशैली स्वीकारली पाहिजे पण संस्कार मात्र जुनेच असले पाहिजे.

प्राचिनतेला आधुनिकतेचे धागे जोडणारे विचार समाजाला विवेकानंदानी दिले आहे. नाव, ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःची असावी, ही जाणीव तरुणांमध्ये त्यांच्या विचारातून निर्माण होते. जीवनात जितका जास्त संघर्ष असतो विजय तितकाच शानदार असतो.

आजच्या तरूण पिढीने संघर्ष करून यशाची शिखरे गाठली पाहिजेत असा मार्मिक संदेश स्वामी विवेकानंदाच्या विचारातून मिळतो.

निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी प्रतिपादन केले. भारतातील राष्ट्रीय, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे अप्रत्यक्षरीत्या त्यांची प्रेरणा होती व आजही  आहे. पाश्चिमात्य जगात भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली. मानव त्याच्या विचारांनी श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असतो हा विचार आपल्या शिकवणुकीतून दिला आहे. ज्ञान धनापेक्षा श्रेष्ठ आहे कारण धनाची रक्षा तुम्हाला करावी लागते ज्ञान मात्र तुमची रक्षा करते.

देशातील दारिद्र्य आणि अज्ञान नष्ट करणे म्हणजेच ईश्वरी सेवा होय. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर, भारतावर आणि  जगावर आजही दिसून येतो.

डॉ.ज्योती रामोड

– लेखन : प्रा.डॉ.ज्योती रामोड. पुणे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments