Thursday, September 19, 2024
Homeसाहित्यहजार धागे सुखाचे ; वाचकाला सुखाचा आनंद देणारा कथासंग्रह

हजार धागे सुखाचे ; वाचकाला सुखाचा आनंद देणारा कथासंग्रह

माणूस सुखाचे क्षण घटाघटा पिऊन घेतो आणि दुःखाचे क्षण चघळत बसतो. खरं तर माणसाच्या जीवनात हजार सुखांनंतर एकदा दुःखाचा क्षण येतो, परंतु तो दुःखाचा क्षण येणाऱ्या पुढच्या असंख्य सुखांना दुःखमय बनवतो. त्यामुळे माणसाला सुख क्षणिक व दुःख अगणित वाटते. असे हरवलेले ‘ हजार धागे सुखाचे ’ कोणते ? याची सकारात्मक जाणीव करून देणारा किरण सोनार लिखित कथासंग्रह चपराक प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. त्यांचा हा पहिलाच कथासंग्रह असला तरी पहिलारू लेखनाची कुठलीही लक्षणे कथासंग्रहात आढळत नाही, उलट त्यांची लेखणी कथा लेखक म्हणून स्वतःला सिद्ध करते.

नाशिकस्थित किरण सोनार हे खरे तर मुळचे पत्रकार आहेत. त्यांनी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखन केले आहे. त्यांचे ‘ डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रियल हिरो ’ हे चरित्रात्मक पुस्तक प्रकाशित आहे. ते एक उत्तम वक्ते असून त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. कथावर्ती अरविंद गोखले हे त्यांचे आवडते लेखक आहे. त्यांच्या कथा वाचनातूनच त्यांना कथा लेखनाची गोडी निर्माण झाली. त्यांच्या प्रेरणेनेच ‘हजार धागे सुखाचे’ हा सुखाचा शोध घेणारा कथासंग्रह त्यांनी वाचकांच्या भेटीस आणला आहे.

या कथा संग्रहाला ‘ सर्जनाचा सुंदर प्रवास ’ संबोधणारी डॉ विजया वाड यांची प्रस्तावना असून घनश्याम पाटील यांची पाठराखण आहे. ते पाठराखण करताना म्हणतात, ‘ हजार धागे सुखाचे ‘ या कथा संग्रहातील कथा वाचकाच्या मनात सुखाचा आशावाद निर्माण करतात. असाच काहीसा आशावाद वाचक म्हणून माझ्याही मनात निर्माण करण्याचे काम या कथा संग्रहाने केले आहे.

या कथासंग्रहात एकूण आठ कथा आहेत, पहिली कथा *पोरका बाप* पर्यावरण प्रेमी अण्णा पोटच्या मुलाप्रमाणे झाडांना जीव लावतात, त्यांना लहानाचे मोठे करतात, अशा मुलाप्रमाणे जपलेल्या झाडांना एक वेडगळ माणूस लाथा मारतो व शिव्या देतो, तेव्हा अण्णा विरोध करतात तर तो त्यांनाही जुमानत नाही, नाईलाजास्तव हे प्रकरण पोलिसापर्यंत जाते, अखेर अण्णा माघार घेत त्यांच्या वेडथर वागण्यामागचे कारण जाणून घेतात, तेव्हा अण्णाबरोबर वाचकही अवाक झाला नाही तर नवलच.

दुसरी कथा अनमोल श्वास या कथेत लहानगा स्वामी आई वडिलांकडे वाढदिवसानिमित्त भेट म्हणून कुत्र्याच्या पिल्लाची मागणी करतो . ते सहपरिवार कुत्र्याचे पिल्लू घ्यायला जातात. परंतु कुत्र्याच्या पिल्लाची किमंत परवडणारी नसते. कुत्र्याच्या पिल्लासाठी हटून बसलेल्या स्वामीला पाहून दुकानदार एक अपंग कुत्रा त्यांना फुकट देतो, त्यावर स्वामीने दिलेले उत्तर व कृती थक्क करणारी आहे.

नजरेतून शिक्षा या तिसऱ्या कथेत भूमिहीन पुंडलिक दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करून जीवन जगत असतो. त्याची पत्नी मंजुळाला स्वतःची जमीन असावी असे वाटते, तसा त्यांचा आदिवासी या नात्याने एका प्लॉटवर कोर्टात दावाही चालू असतो, ही कथा वाचकाच्या मनात सरकारी व्यवस्था व राजकारण्यांबद्दल प्रचंड संताप निर्माण करते.

अनपेक्षित पाऊलवाटा या कथेत इंजिनिअरींगची पदवी मिळविलेला मयूर नोकरी मिळत नाही म्हणून हतबल होत नाही, मिळेल ते काम करून अनपेक्षित वाटणारी स्वतःची पाऊलवाट तो अपेक्षेप्रमाणे निर्माण करतो. त्याची ध्येयपूर्ती व मेहनत नक्की आजच्या नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे.

इरपाची लढाई ही कथा सरकारी यंत्रणा आणि नक्षलवादी या दुहींच्या कैचीत सापडलेलं गाव आणि त्या गावातील सुशिक्षित इरपा यांच्यावर बेतली आहे. गावातील अठरा विश्वे दारिद्र्य पाहून इरपाला गावासाठी काहीतरी करावेसे वाटते, परंतु सरकारी अधिकारी व नक्षली यांची दहशत त्याच्यासाठी अडचणीची ठरते. तरीही इरपा गावासाठी असे काम करतो, जे आजपर्यंत कोणीच केलेले नसते, या कथेतून लेखकाने सामाजिक बांधिलकीचा छान संदेश दिला.

शाळेची खिचडी ही कथा गरीब घरातील गणेशच्या जीवनावर चितारली आहे. इयत्ता चौथीत शिकणारा गणेश शिक्षकांना चोर वाटतो, परंतु वस्तुस्थिती जाणताच शिक्षकांबरोबर वाचकही नकळत भावनाविभोर होतो. कधी कधी परिस्थितीवरून मत बनवणं कसं फोल असतं हे या कथेत लेखकाने छान प्रत्ययास आणून दिले आहे.

स्कार्फवाली बाई ही कथा नवरा बायकोच्या घरगुती वादावर गुंफली आहे. विनाकारण बायकांची नवऱ्याबद्दलची संशयी वृत्ती किती निरर्थक असते हे या कथेतून लेखकाने खूपच मनोरंजक पद्धतीने लिहिले आहेत. भांडणाचे कारण जाणताच वाचकही स्तंभित होतो.

हजार धागे सुखाचे ही शीर्षक कथा आहेत. ही कथा नोकरी गमावलेल्या रणजीतच्या जीवनावर आधारित आहे. आधुनिक लाइफस्टाइल जगत असलेल्या रणजीतला नोकरी शोधूनही मिळत नाही, तेव्हा त्याला खूप नैराश्य येते. परंतु या नैराश्यमय काळातही मनाला उभारी देणारी एक घटना घडते, व रणजीतला जगण्याची एक सकारात्मकता निर्माण करते. या कथेतून लेखकाला दुःखातही सुख पेरलेले असते हे सांगायचे आहे.

अशा या मध्यमवर्गीयांची जीवनाशैली ते नक्षलीपर्यंत गुंफलेल्या आठ कथा वाचकाला छान हलकाफुलका सुखाचा आनंद देतात. लेखकाकडे कथा लेखनाची हातोटी आहे. त्यामुळे ते वाचकाला कथा वाचनास खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांची कथा लेखनाची निवेदनशैली पाल्हाळीक नसून मोजकी व प्रभावी आहे. त्यांनी प्रत्येक कथेला अंतसमयी छान कलाटणी दिली आहे, जी वाचकाला सुखद धक्का देते. त्यामुळे किरकोळ अशुद्ध लेखनाच्या चुका वगळता कथा संग्रह वाचनीय झाला आहे. चपराकने प्रकाशक म्हणून अंतर्बाह्य कथा संग्रहाची सजावट खूपच आकर्षक केली आहे.संतोष घोंगडे यांनी कथा संग्रहाला साजेसे मुखपृष्ठ दिले आहे. वाचक नक्कीच किरण सोनार यांच्या ‘हजार धागे सुखाचे’ या कथासंग्रहाचे भरभरून स्वागत करतील यात शंका नाही.

– संजय द. गोराडे ,नाशिक.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

श्रीकांत चव्हाण on आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
सुधीर थोरवे on दूरदर्शनची पासष्टी
अंकुश खंडेराव जाधव on देवेंद्र भुजबळ यांची फेर निवड
लता छापेकर on माझी जडणघडण : १६
Ravindra तोरणे on 🌺मोदक🌺