रामभक्त हनुमानाचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला असल्याने त्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. आज ; 2 एप्रिल 2026 रोजी हनुमान जयंती आहे. हनुमानाचा जन्म पहाटे सुर्य उगवतांना झाला असल्याने उगवत्या सकाळी हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून मंदिरात जाऊन पूजा करतात. हनुमानाला फुले, नारळ, सिंदूर आणि तेल अर्पण केले जाते.
जन्मल्याबरोबर मारुतीने पहाटेच्या उगवत्या लालबुंद सूर्याला पकडण्यासाठी आकाशात झेप घेतली होती आणि तेंव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे त्याचे तोंड भाजले, त्यामुळे त्याचे तोंड लाल,काळे पडले अशी कथा सांगितली जाते. त्यामुळे टरबूज, खरबूज, नारळ फोडून नैवेद्य दाखवला जातो. कदाचित ही उन्हाळ्याची सुरुवात शांत, थंड व्हावी असा यामागील उद्देश असावा. नंतर पूजा, आरती भक्तिभावाने करून हनुमान स्तोत्रे,”हनुमान चालीसा” आणि “सुंदरकांड” यांचे पठण केले जाते.
अनेक ठिकाणी भजन, कीर्तन आणि मिरवणुका आयोजित केल्या जातात.प्रसाद म्हणून बुंदी लाडू वाटले जातात. रामायण या महाकाव्यात त्यांनी भगवान श्रीराम यांची निःस्वार्थ सेवा केली.
हनुमान जयंती आपल्याला सांगते की — खरी शक्ती ही नम्रतेत आणि भक्तीत असते. अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि श्रद्धा आवश्यक आहे. हिंदू मान्यतेनुसार संकटमोचन हनुमानाचा जन्म भगवान विष्णूच्या राम अवताराच्या सहकार्यासाठी झाला होता. सीता आणि रावण यांच्यातील युद्धात हनुमानाने भगवान श्रीरामांना मदत केली होती. त्या अगोदर रामनवमी साजरी केली जाते. त्यानंतर हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो.
हनुमान जयंती हा अंजनीच्या पुत्राचा म्हणजेच हनुमानाचा आशीर्वाद मिळविण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भक्त उपवास ठेवून हनुमानाची पूजा करतात. पंचांगानुसार या वर्षी हनुमान जयंतीला रवि योग तयार होत आहे.
शास्त्रामध्ये हा योग कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. सूर्याच्या विशेष प्रभावामुळे रवि योग हा प्रभावी योग मानला जातो. सूर्याच्या ऊर्जेमुळे या योगात केलेल्या कामात यश मिळते.
हनुमानाचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला.तो पवन म्हणजेच वायुदेवाचा पुत्र होता. म्हणूनच त्याला अंजनीसुत्, वायुसूत, पवनपुत्र, बजरंगबली किंवा आंजनेय अशा अनेक नावानी ओळखतात.तो जन्मापासूनच अत्यंत असामान्य ताकद असलेला होता. लहानपणापासुनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या. एकदा सुर्याकडे आकर्षित होऊन त्याला गिळण्याकरता हनुमानाने सुर्याकडे कुच केले. इंद्रदेवांसह सर्व देव भयभीत झाले इंद्रदेवाने सुर्याला आणि पृथ्वीला वाचवण्याकरता आपले वज्र हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मुर्च्छित झाले, त्यांनतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू ओढून घेतला त्यामुळे प्राण्याचं अस्तित्व धोक्यात आले त्यांनतर सर्व देवतांनी हनुमानाला त्या बेशुद्ध अवस्थेतुन बाहेर आणले, त्या नंतर पवन देव शांत होऊन सुरवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले, तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांनी आशिर्वाद देत काही शक्ती प्रदान केल्या.
एक दिवस खेळते वेळी हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप दिला ’तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल’. पुढे प्रभु श्रीरामचंद्र वनवासात असतांना त्यांची आणि हनुमंताची भेट झाली. हनुमानाने प्रभु रामचंद्राना वनवासात आणि युध्दादरम्यान फार मदत केली. हनुमंताच्या आणि वानरसेनेच्या बळावरच रामाने रावणाशी युध्द केले आणि जिंकले देखील. त्याला चिरंजीवत्व लाभलेले आहे. म्हणजेच त्याला कधीही मृत्यू नाही,तो अमर आहे. तो कायम सत्याच्या बाजूने उभा असतो. म्हणूनच तो महाभारताच्या काळात सुद्धा अगदी अर्जुनाचे सारथ्य करत असलेल्या श्रीकृष्णाच्या पक्षात असल्यामुळे त्याच्या रथावर असलेल्या भगव्या झेंड्यावर कायम होता. आणि म्हणूनच कौरव आणि पांडवांच्या युद्धत पांडवांचा विजय झाला.
हनुमानाला संजीवनी विद्याही प्राप्त होती. कोणत्याही असाध्य रोगांवर त्याच्या जपाने,नामस्मरणाने मात करता येते, अशी भविकांची श्रद्धा आहे. राम-रावण युद्धात जेंव्हा लक्ष्मण बेशुद्ध पडला, तेंव्हा मारुतीने औषधी वनस्पती आणण्यासाठी चक्क आपल्या शक्तीने एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले. ही खरी स्वामीनिष्ठा ! युद्धात विजय मिळवून वनवास संपल्यावर अयोध्येत परत आल्यावर सीतामाईंनी त्याला बक्षीस म्हणून एक किंमती मोत्यांचा हार भेट दिला.तेंव्हा त्यांनी त्यात काहीच ‘राम’ नाही, तर राम माझ्या हृदयात आहे असे सांगितले आणि चक्क हृदयात, मनात जपलेल्या श्रीरामांची मूर्ती दाखवली.अशी असावी स्वामीनिष्ठा !
समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामाचे, बजरंगबलीचे थोर उपासक होते. लोकांना शक्ती प्राप्त व्हावी, ताकद मिळावी, मनोबल उत्तम राहावे यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी हनुमान मंदिरांची स्थापना केली. आखाडे बांधून कुस्त्यांचे महत्व म्हणजेच ताकदीचे महत्व लोकांना पटवून दिले,व्यायामाचे महत्व पटवून दिले. जनजागृती केली. ही सर्व हनुमान मंदिरे सातारा जिल्ह्यात व आसपास आहेत.
हल्ली बरेच लोक अकरा मारुती यात्राही करतात. हनुमान हे केवळ शक्तीचे प्रतीक नाही, तर ते भक्ती, निष्ठा आणि सेवाभावाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हनुमानाने आपल्या बुद्धी, धैर्य आणि पराक्रमाच्या जोरावर अनेक संकटांवर मात केली.
बेट द्वारका येथे भारतातील एकमेव असे हनुमान पुत्र मकरध्वज आणि हनुमान यांचे एकत्र असलेले मंदिर आहे. हनुमान तर ब्रह्मचारी होता ,मग त्याला पुत्र आहे हे ऐकुनच खरे तर आश्चर्य वाटले होते . मग खुपच उत्सुकता वाढली तेंव्हा अशी माहिती समजली, की हनुमानाच्या तीन पत्नी होत्या. पहिली सूर्यपुत्री सुवर्चला, दुसरी वरुण पुत्री सत्यव्रती व तिसरी रावण दुहिता म्हणजेच चंद्रलेखा बहिणीची व खर दुषण यान्ची मुलगी राजकन्या अनंगकुसुमा.
सूर्यदेव हे मारुतीचे गुरु. त्यानी ६४ विद्या शिकवण्याचे कबुल केले होते. त्यापैकी 60 कला शिकवल्या. पण चार कला शिकण्यासाठी त्यांनी विवाहीत असणे आवश्यक आहे अशी अट घातली. अशावेळी ते आपली आजन्म ब्रह्मचाऱ्याची शपथ पण मोडू शकत नव्हते. त्यावेळी सूर्यदेवानी त्यांची पुत्री सध्या व्रतस्थ आहे, त्यामुळे तिच्याशी लग्न कर,म्हणजे तुझीही शपथ मोडणार नाही आणि लग्नाची अट पण पूर्ण होईल, त्यामुळे सगळ्या विद्या तुला प्राप्त होतील असा उपाय सुचवला. मग त्यांच्या मुलीशी विवाह केल्यावरच सूर्यदेवांनी हनुमन्ताला शिक्षण दिले. शिक्षण संपेपर्यंत सुवर्चला उग्र तपश्चर्येला बसल्यामुळे ते ब्रह्मचारीच राहिले. नंतरही त्यांना विवाह करावा लागला पण त्यांचे मन रामसेवेत लीन असल्यामुळे ते ब्रह्मचारीच राहिले.
लंका दहन केल्यानंतर हनुमानाच्या अंगाचा प्रचंड दाह झाला होता.घामाने संपूर्ण शरीर डबडबले होते. अशावेळी दाह कमी व्हावा म्हणून समुद्रात पाण्यात शेपूट बुडवले त्यावेळी त्यांच्या घामाचा एक थेंब मगरीने गिळला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. कालान्तराने पाताळपुरीचा राजा अहिरावण यांच्या शिपायाने मगरीचे पोट कापले आणि मकरध्वजाचा जन्म झाला. मगरीच्या पोटातून जन्म झाला म्हणून त्याचे नावं मकरध्वज असे ठेवले. त्याला पाताळपुरीचा द्वारपाल केले. पुढे अहिरावण् याने राम व लक्ष्मणाला बंदी करून समूद्राच्या तळाशी असलेल्या पाताळपुरीत कैद केले होते. त्यांना सोडवण्यास हनुमंत जेंव्हा समूद्राच्या तळाशी गेला तेंव्हा मकरध्वजाने त्यांना अडवले.त्याच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली. आत्तापर्यंत हनुमंताना कोणीही हरवू शकले नव्हते, पण मकरध्वजाचे सामर्थ्य पाहून ते चकित झाले. तेंव्हा मगर सुंदर स्त्री वेशात समोर आली आणि तिने हा मकरध्वज तुमचा आणि माझा मुलगा असल्याचे सांगितले. हनुमंताना खूप राग आला, कारण ते तर ब्रह्मचारी होते. मग हे कसे शक्य होते .तेंव्हा तिने सर्व वृत्तांत सांगितला. मकरध्वजालाही वडिलांची ओळख सांगितली तेंव्हा त्यांला खूप आनंद झाला. त्याने वडिलांचा आशीर्वाद घेतला. पण तो पडला अहिरावणाचा द्वारपाल! त्यांच्याशी बेईमानी कसा करणार, मोठ्ठाच पेच होता. कारण जन्मदात्या वडिलांची आज्ञापालन करणेही तेवढेच महत्वाचे होते. शेवटी त्याने मारुतीला सांगितले की मला मोठ्या साखळदन्डाने बांधून बंदी बनवून अहिरावणा समोर घेऊन जा.मारुतीने तसे केले व अहिरावणाबरोबर युद्ध करून त्याचा वध केला आणि राम- लक्ष्मणाची सुटका केली. नंतर श्रीरामानी हनुमानपुत्र मकरध्वजाला पाताळ लोकीचा राजा बनवले. अशा पिता पुत्राचे एकमेव मंदिर इथे आहे आणि इथे मारुतीच्या हातात नेहमीप्रमाणे गदा नाही ,तर मोट्ठी दान्डी आहे .म्हणूनच याचे नाव “दांडी हनुमान” मंदिर असे आहे.
अशा अनेक हनुमानकथा खूपच श्रवणीय, आपल्याला स्फूर्तीदायक आहेत. म्हणूनच हा हनुमान जयंतीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बोला.. “बजरंगबली की जय !”

— लेखन : स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
