हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी ही विविध संगीत वाद्य निर्मिती आणि त्यांची विक्री करणारी अत्यंत नावाजलेली संस्था आहे. संगीत जगतात स्वतःचं विशिष्ट स्थान निर्माण करणारी ही गौरवशाली कंपनी पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण करीत आहे.ही कंपनी केवळ वाद्ये बनवून ती विकणे या पुरतीच मर्यादित नसून संगीत क्षेत्रात विविध उप्रकम आयोजित करण्यात अग्रेसर आहे. वेळ प्रसंगी सामाजिक संस्थांकडे पैसे नसतील तर अशा संस्थांना कंपनीने विनामूल्य वाद्ये दिली आहेत. या वरूनच हे दिसून येते की, ही कंपनी वाद्य उत्पादन आणि विक्रीकडे केवळ व्यवसाय म्हणून बघत आली नसून आपद् धर्म म्हणून बघत आली आहे.
या कंपनीच्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून, कंपनीने रविवारी मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात “तेजोमय स्वरनाद” हा मराठी भावगीतांचा कार्यक्रम प्रायोजित केला होता. अतिशय बहारदार झालेल्या या कार्यक्रमाच्या दिवशीच कुणा नतदृष्ठ व्यक्तीने “दादर येथील हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी बंद होणार असून तेथील वाद्ये अर्ध्या किमतीत उपलब्ध आहे” अशा आशयाची अफवा समाज माध्यमात पसरवली. ही अफवा क्षणात सर्वत्र पसरली. पण असे काही नसून, ही अफवाच असल्याचे या कंपनीच्या प्रभादेवी शाखेच्या सौ पद्मा दिनेश दिवाणे यांनी प्रभादेवी येथील कार्यक्रमात स्पष्ट केले.
या विषयी अधिक माहिती देताना श्री दिनेश दिवाणे यांनी सांगितले की, “हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीची दादर, गिरगाव, प्रभादेवी अशी ३ भावांची ३ दुकाने आहेत. आम्ही सर्व भाऊ एकमेकांना उत्तम सहकार्य आणि सौहार्द भावनांनी हा व्यवसाय अनेक वर्षे उत्तम चालवत आहोत. पण यापैकी दादरचे दुकान तिकडे फ्लायओव्हर झाल्यामुळे तसेच फेरीवाले, दारू बार, हा परिसर बकाल झाल्याने अशा काही कारणांमुळे आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक बाबींमुळे फक्त बंद होऊन ते जवळच असलेल्या प्रभादेवीच्या प्रशस्त दुकानात सर्व वाद्यांसहित सामावले जाणार आहे. आणखी एक अत्यंत सकारात्मक गोष्ट म्हणजे प्रभादेवीच्या दुकानाची जागा देखील अपुरी पडत असून, त्या जागेचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”
या अफवेविषयी बोलताना ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, संशोधक डॉ. श्रुती सडोलीकर काटकर म्हणाल्या, “आपल्या कारकिर्दीची शंभर वर्षे पूर्ण करत असताना अशा अफवा पसरणे आणि पसरवणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा अपप्रचार ताबडतोब थांबवलाच पाहिजे. या संस्थेची पुढील अनेक शतकांची वाटचाल निर्वेधपणे चालू राहावी हीच सदिच्छा”
“एक मराठी व्यावसायिक उत्तम प्रकारे वाद्य निर्मिती करून गेली शंभर वर्ष उत्तम व्यवसाय करतोय. त्याला मायबाप ग्राहक, विद्यार्थी, संगीत अभ्यासक, रसिक, गायक, वादक पुढेही नक्कीच पूर्णतः सहकार्य करतील आणि शतक महोत्सवासाठी हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी आणि त्यांचा परिवाराला आपण पुनश्च एकदा अनेक अनेक शुभेच्छा देऊ या” असे आवाहन शास्त्रीय, नाट्य सुगम संगीत गायक, संगीत अभ्यासक, गायक नट श्री मुकुंद राम मराठे, ज्येष्ठ संगीत संयोजक, संगीतकार श्री. उज्वल तथा आप्पा वढावकर, ज्येष्ठ गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे, आघाडीचा ज्येष्ठ तालवाद्य वादक दीपक बोरकर संवादक, संवादिनी, ऑर्गन वादक विघ्नेश जोशी, गायिका, निवेदिका, निर्माती नीला रवीन्द्र यांनी केले आहे.
खरं म्हणजे, अशी अफवा पसरवून कंपनीच्या नाव लौकिकास बाधा पोहोचविल्याबद्दल, कलाकार, ग्राहक, नागरिक यांच्या मध्ये संभ्रम निर्माण केल्याबद्दल कंपनीने केवळ खुलासे न करता माहिती तंत्रज्ञान, सायबर अशा संबधित कायद्यांच्या आधारे पोलिसात रितसर तक्रार दाखल करणे उचित ठरेल. जेणेकरून दोषी व्यक्तीविरुद्ध ठोस कारवाई होऊन पुढे असे गैर प्रकार करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.
— लेखन : देवेंद्र भुजबळ
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
“हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स” … ह्या नावाला असलेले प्रसिद्धीचे आणि आपुलकीचे वलय इतके मोठे आहे की ह्या परिघाला छेदून त्यांचे शत्रुत्व पत्करण्याचे निंदनीय कार्य केवळ नतद्रष्ट व्यक्तीच करू शकतात. दादर परिसरात जन्म आणि संगोपन झालेली माझ्यासारखी संगीत ह्या विषयाच्या जवळपास सुद्धा जाऊ न शकणारी व्यक्ती जर “हरिभाऊ विश्वनाथ” कंपनीवर इतके प्रेम व आदर करत असेल, तर विचार करा की केवळ दादरच नव्हे, तर मुंबईतील प्रत्येक संगीतप्रेमी आणि वाद्यप्रेमी व्यक्तीला ही खोडसाळ बातमी ऐकून, वाचून किती दु:ख झाले असेल? आपण लेखात वर्णन केलेल्या काही मोजक्याच व्यक्ती म्हणजे माझी बालपणापासूनची शालेय मैत्रीण श्रुती सडोलीकर, शालेयबंधू अप्पा वढावकर, मुकुंद मराठे, वगैरेंकडून ह्या बातमीचा तीव्र निषेध झाल्याचे वाचून मनाला दिलासा मिळाला.
मी संगीतज्ञ नाही, पण संगीताची आवड रक्तात भिनलेली असल्याने ह्या दुकानाविषयी मला लहानपणापासून खास आपुलकी आहे. दादर जवळच माटुंगा रोड रेल्वे स्टेशनसमोर , सेनापती बापट मार्गावरच माझे निवासस्थान होते, त्यामुळे आम्हा कुटुंबीयांची दादरला रानडे रोडवर खरेदीला जाण्यासाठी भेटण्याची एकमेव जागा म्हणजे ह्या दोन्ही रस्त्यांना जोडणारे काॅर्नरवरचे “हरिभाऊ विश्वनाथ कंपनी” हे दुकान. आमच्यावर , विशेषतः माझ्यावर, कुटुंबातील इतर माणसे पोहोचेपर्यंत वाट पाहण्याची व कंटाळा येण्याची वेळ कधीच आली नाही, कारण ह्या दुकानाच्या बाहेर उभे राहून आतली दर्शनी भागातील वाद्ये न्याहाळत बसणे हा माझा छंद होता. कधीकधी दुकानात आलेल्या गिऱ्हाईकाला वाद्य दाखवताना त्यातून निर्माण होणारे वाद्यझंकार ऐकण्यासाठी मी तिथे तासभर सुद्धा आनंदाने उभी राहात असे.शिवाय इतक्या सुरक्षित जागेवर मुलगी उभी असल्याची भावना आई, बहिणी किंवा इतर कोणीही भेटायला येणार असतील, त्यांनाही विश्वास देत असे की आपण पाचदहा मिनिटे उशिराने पोहोचलो, तरी हरकत नाही, चिंता करण्याचे कारण नाही. एकदा, अगदी एकदाच, असेही घडले की दुकानाच्या मालकांनी आत बोलवून, बाहेर खूप वेळापासून का उभी आहेस, अशी चौकशी केली आणि आत बसायला खुर्ची देऊ केली; पण तशी वेळ आलीच नाही. माझी आई ठाण्याहून दादरचा प्रवास करत, तिथे उशिरा पोहोचली, आणि मला आत बोलावून घेणाऱ्या मालकांना आभार मानून त्यांचा आम्ही निरोप घेतला.दुकानाच्या आत पाय ठेवण्याची तशी वेळ पुन्हा कधीच आली नाही.
पण ह्या कुटुंबातील महिलांची माझ्या तरुणपणात अचानकच गाठ पडली आणि काही काळ स्नेहसंबंध जुळले. १९७८ साली मे महिन्यात आम्ही तीन फडणीस बहिणी “हिमालयन ट्रॅव्हल्स ” ह्या व्यावसायिक टुरिस्ट कंपनीबरोबर काश्मीर ट्रिपला जाण्याचे निश्चित केले. तीन तरुण मुलींना एकट्यांना पाठवताना साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींनी सहलीत इतर कोण कोण आहेत, ह्याची चौकशी केल्यावर समजले की दादरच्या सुप्रसिद्ध “हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स ” कंपनीतील तीन सुना ह्या सहलीला जाणार आहेत. त्यांच्या बरोबर कुटुंबातील इतर कोणीच नाही.आमच्या कुटुंबीयांनी निश्चिंत होऊन आम्हाला ट्रीपला पाठवले.सहलीच्या प्रारंभीच दादर स्टेशनवर आम्हाला सोडायला आलेल्या आई-वडील, काका वगैरे मंडळींना नऊवारी साड्या परिधान करून काश्मीर सहलीला निघालेल्या ह्या माझ्या आई, काकू वगैरेंच्या वयाच्या महिलांनी निक्षून सांगितले की “आजपासून पुढचे पंधरा दिवस ह्या आमच्या मुली आहेत असे समजून निश्चिंत राहा , मुलींची काळजी करू नका.”
नऊवारी लुगडी नेसणाऱ्या ,पण विचारांनी अतिशय प्रगत आणि सुशिक्षित व्यक्तिमत्त्वाच्या ह्या तीन जावा- जावा हा त्याकाळात माझ्यासारख्या शिक्षण पूर्ण करून नुकत्याच नोकरीला लागलेल्या तरुणीसाठी मोठाच आदर्श होता. मोबाईल्स नसलेल्या त्या काळात पुढे काही वर्षे हे स्नेहसंबंध टिकले, मग हळूहळू काळाच्या ओघात मागे पडले ; पण माझ्या डोळ्यांना ह्या म्हाताऱ्या वयातही दादरला गेल्यावर त्या दुकानाच्या काचेआड डोकावून आपल्याला “लेक” मानणाऱ्या त्या माऊलींपैकी कोणी दिसतेय का, ह्याची उत्सुकता असते; किमान एकदातरी दुकानाच्या आत शिरून त्यांच्यापैकी कोण कोण आणि कुठे आह, ह्याची चौकशी करण्याची इच्छा मनात दाटून येते. आता ते दुकानच तिथून हटणार, म्हणजे हे सर्व विचार मनातच राहणार, हे खरे आहे. पण आज भुजबळ सरांच्या लेखामुळे हे मनातले विचार कागदावर, नव्हे मोबाईलवर उतरले आणि मनाला व्यक्त होण्याची एक संधी मिळाली, ह्यासाठी भुजबळ सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि “हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स ” कंपनीला हार्दिक शुभेच्छा. तुमचा शतकमहोत्सव दणक्यात साजरा होऊ देत आणि पुढच्या पिढीतही हा संगीताचा वारसा जपत, तुमचे कुटुंबीय शतकोत्तर वाटचाल आनंदाने करत राहू देत. तुमचे हार्दिक अभिनंदन आणि अंतःकरणापासून शुभेच्छा 🙏💐