रविवारी दुपारी वामकुक्षी घेत असताना समोरच्या खुर्चीवर माझा मोबाईल पण वामकुक्षी घेत असलेला दिसला. त्याला तसे आरामात पहुडलेला बघून माझे हात शिवशिवायला लागले. मनाची चलबिचल सुरू झाली. हात हळूच मग त्याच्या जवळ गेलाच. हलकेच हाताने मोबाईल उचलून घेतला. त्याला बघून जराशी खुदकन हसले मी. मग तो पण मला बघून हसलाच.
यानंतर पहिले काम केले ते म्हणजे मोबाईल सुरू करायचे. पटकन वेळ न दवडता मी तो सुरू केला. मग काय हो, धडाधड मेसेजचा पाऊस सुरू झाला !
रविवार असल्यामुळे काही समुहामध्ये स्पर्धा असते. कुठे अलक, कुठे कथा, कुठे चारोळी तर कुठे कविता स्पर्धा.
एकेक करून सगळे गृप मधील साहित्य वाचायला सुरुवात केली. वाचता वाचता अभिप्राय देताना कवितेतून अभिप्राय दिला. आणि एकदमच मला ‘hi..’ असा कोणाचा तरी मेसेज आला.
‘आता हा नंबर कोणाचा असेल ???’ असे मनात म्हणत मी त्या हाय ला एक हसरी 😊ईमोजी दिली.
“मॅडम धन्यवाद.” लगेच रिप्लाय.
मी बुचकळ्यात पडले. कोण आणि कशासाठी धन्यवाद ???
“कशाबद्दल” माझा मेसेज.
“अहो आताच तुम्ही माझ्या कवितेला इतका सुंदर अभिप्राय दिला, तोही कवितेच्या माध्यमातून ! यासाठी…!!!” रिप्लाय आला.
“अरे हो हो …!!! ते तुम्हीच का. खरंच खूप सुंदर कविता केली ओ तुम्ही सर/मॅडम” माझा मेसेज.
“अहो मॅडम प्लिज तुम्ही मला मॅडम आणि अहो जाहो म्हणू नका. मी तुमच्या मुलीच्या वयाचीच असेन.” तिकडून एक मोठा बॉम्ब पडला.
“हो का. ते काय आहे की व्हाट्सअप वर फक्त मेसेज दिसतात. ते पाठवणार्यांचे वय नाही !.” हा माझा फडतूस पीजे.
“हो बरोबर आहे मॅडम. मी मेसेज इतक्या साठी केला की मी माझा कविता संग्रह प्रकाशित करणार आहे. आणि यासाठी तुम्ही अभिप्राय लिहून द्यावा अशी माझी इच्छा आहे.”
“अरे बापरे…!!! मी ???”
“हो मॅम. तुम्ही लिहून द्यावा. कारण तुमचे लिखाण मी वाचले आहे. तुमचे साहित्य वाचताना मला माझ्या आजीची आठवण येते.”
‘मॅडम, मग आई आता आजी आणखीन काही वेळाने मी पणजी होईन वाटतं.’ हे मी मनात पुटपुटत तिला फक्त एक ईमोजीच पाठविले.
“मी तुम्हाला माझ्या तीस कविता पाठविते. त्या वाचून तुम्ही अभिप्राय द्या मॅम.” रिप्लाय
“ओके…!!” माझा मेसेज.
“मॅडम ऐका न. तुम्ही पण तुमच्या कवितांचा एक कविता संग्रह प्रकाशित करा न. नक्कीच तुमचा संग्रह पुरस्कार प्राप्त ठरेल खात्री आहे मला.” रिप्लाय.
“आई ग ऽऽऽऽ मी आणि माझा कविता संग्रह ? माझ्या कविता मलाच वाचायला होत नाहीत ते दुसरे कोण संग्रह खरेदी करून वाचणार ?” माझा मेसेज.
“छे हो मॅम असे काही नाही. तुमच्या कविता किती सुंदर आणि साध्या सोप्या भाषेत असतात. अगदी म्हणजे अगदीच आमच्या आजीच्या काकूंसारख्या. त्या अशाच कविता साध्या सोप्या भाषेत म्हणायच्या, असे आमची आजी सांगायची.”
‘झालं दहा मिनिटात मी मॅडम पासून पणजी झाले…!!!’ असे मनात म्हणत तिला मेसेज केला
“आधी तुझ्या कविता पाठव मी त्या वाचून झाल्यावर तुला अभिप्राय पाठवते. मग बघू पुढे माझा कविता संग्रह वगैरे…!!!”
एवढा मेसेज करुन मी पटकन आॅफलाईन झाले आणि परत मोबाईल खुर्चीवर ठेवून मनात म्हटले, ‘मी माझा कविता संग्रह प्रकाशित करणार म्हणजे गंमतच नाही का ? माझ्या कविता मलाच वाचायला होत नाहीत, तर ते दुसरे कोण वाचणार. चल बाई परु राणी तू वामकुक्षी घे. आणि कवितेला विसरून जा. शेवटी एकच “कविता बाई” तेरा मैंने क्या बिगाडा हैं ? जो तू सब को है आती और मुझ से कोसो दूर है भागती’…..!!!!!

– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800