नवीन वर्ष सुरु होऊन आता ११/१२ दिवसांपेक्षा अधिक दिवस उलटून गेले. नव्याची नवलाई असते तीही संपून गेली आहे.
या दिवसात मी सतत विचार करीत होतो की नवीन वर्षात काय नवीन संकल्प करावा ? पण विचार करता करता याही वर्षातील नवीन संकल्प करण्याचा सुमुहूर्त हुकला. आता काही संकल्प करण्यात मजा नाही असेही वाटायला लागले. दरवर्षी माझे असेच होते. दरवर्षी मी ठरवतो काहीतरी नवीन संकल्प करावा आणि विचार करता करता तो बेत दरवर्षी रद्द होऊन जातो. माझ्या बरोबरीचे कितीतरी जण नवीन संकल्प करुन ते अंमलातही आणतात तेव्हा मला अगदी कसेतरी होत रहाते. लहानपणापासून ही माझी खोडच बनून गेली आहे.
काही ठरवावे तर ठरतच नाही आणि मग कितीतरी रौप्य सुवर्ण संध्या दवडून जातात. हात चोळतच बसावे लागतात. याचा परिणाम असा की मला एकही सवय अशी लागलीच नाही. न मी पहाटे उठत. न व्यायाम करीत. न मी रपेट मारायला जात. न मी नवीन नवीन काही वाचत. न मी काही लिहित. एक साधा संकल्प सुध्दा मला करता येऊ नये ? छे छे काहीतरी संकल्प केलाच पाहिजे असे माझ्या मनाने ठामपणे ठरवले आहे.
काय संकल्प करावे बरे. मला वाटते मित्रांची मदत घेतलेली बरे. एक दोन मित्रांना मी फोन करुन विचारलेही पण त्यांनी तब्येत बरी आहे ना म्हणून माझे म्हणणे हसल्यावारी नेले. म्हणजे पहा मी संकल्प करण्याचे गंभीरपणे विचार करतो तर मित्र ते गंभीरपणे घेत नाही. काय म्हणावे याला. मग मी नवीन वर्षाचे संकल्प असे गुगलवर सर्च केले आणि त्यावरुन नवीन संकल्पांची एक यादीच बनवली. यादी वाचता वाचताच माझी दमछाक झाली. अरे बापरे यातला एक संकल्प जरी अंमलात आणायचा म्हणजे किती कष्ट.
विनासायास करता येईल असा एकही संकल्प मला त्यात दिसेना. माझी अगदी निराशा झाली. एक मन म्हणाले की कशाला पाहिजे एवढा खटाटोप. कोणी पारितोषिक तर देणार नाही मग कशाला करायचे कष्ट? पण मन मोठे विचित्र असते. नको त्या गोष्टींनी उगाचच भंडावून सोडते. नवीन वर्षात नवीन संकल्प करण्याचे मनाने जे घेतले आहे ते काही केल्या मनातून जात नाही. अशी कितीतरी वर्षे गेली. वय वाढले पण आतापर्यंत एकही नवीन संकल्प करता आला नाही त्यामुळे फुशारकीने मला कोणाला काही सांगताच आले नाही.
माझे मित्र एकेक संकल्प सांगायचे. कोणी नवीन वर्षात कमी सिगारेट ओढण्याचा संकल्प केला होता, कोणी किमान रात्री 12 वाजता झोपण्याचा संकल्प केला होता, कोणी चार्जिंग पुरते मोबाईलचा वापर कमी करण्याचा संकल्प केला होता, कोणी किमान अर्धा किलोमीटर पायी चालण्याचा संकल्प केला होता. कोणी डोक्यावरुन जाणार नाही अशी पुस्तके वाचण्याचा संकल्प केला होता. कोणी काय तर कोणी काय. एक संकल्प करायचा आणि तो किमान एक वर्षभर इमानेइतबारे राबवायचा म्हणजे अगदी कठीण कर्म. कितीतरी मित्रांना मी मोठमोठे संकल्प करुन दुसर्याच दिवशी ते विसरतांना पाहिले आहे. तेव्हा मला त्यांचे अगदी हसू येते. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा नवीन संकल्प करण्याचा आणि पुढील प्रत्येक दिवस हा तो संकल्प मोडण्याचा असा जणू शिरस्ताच बनून गेला आहे.
खूप विचार केला. आता नवीन संकल्प करुन काही फायदा नाही आणि समजा केलाच एखादा संकल्प तर तो कोणाला जाऊन फुशारकीने सांगता येणार आहे का? त्यापेक्षा मनात येईल तसे मनसोक्त जगत रहावे. मनात येईल तेव्हा सिगारेट सोडावी, मनात येईल तेव्हा फिरायला जावे, मनात येईल तेव्हा व्यायाम करावा, मनात येईल तेव्हा पुस्तक वाचावे, मनात येईल तेव्हा सरळ ताणून द्यावी. अगदी फुलपाखरासारखे स्वच्छंदी जगावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन वर्षाचे कॅलेंडरचे पान चिंतीत मुद्रेने एकही दिवस न्याहाळयाचे नाही. ठरले तर मग !!!
– लेखन : विलास कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मनासारखे वागायचे…कुठलेही बंधन न ठेवता जगायचे
हाच नविन वर्षाचा संकल्प…कॅलडरची पानं आनंदातच न्याहाळात….प्रत्येक महिन्यातलं पान पलटी करायचे….
मनापासून धन्यवाद मॅडम
खूप सुंदर लेख आणि खरंच संकल्प फार कमी लोक पूर्ण करतात.
खरे आहे. मनापासून धन्यवाद मॅडम.