परवा साडी डे होता. सगळ्या मैत्रिणींनी साडी परिधान करून काढलेले फोटो पाहून माझ्या अंगात पण साडी नेसून फोटो काढायचा किडा वळवळला. आता साडी काढून सेल्फी घ्यायची तर कॅमेऱ्यात फक्त थोबडंच येत …!!! संपूर्ण फोटो येणार नाही हे माझ्या बुद्धीला चालना देण्यासाठी अजून एक किडा वळवळला. मग आता करायचे काय ????
इतक्यात माझी ट्यूब पेटली. मला माझे इटूकले पिटुकले छोटे सरकार दिसले समोर लॅपटॉप मध्ये डोके खुपसून बसलेले. मग मी त्याला हळूच हाताने खुणवले की कॉल सुरू आहे का तुझा हा प्रश्न विचारला पण इशाऱ्यानेच. त्याने मला पाहून एक असा लूक दिला कि काय सांगू.
कॉल संपल्यावर, “अम्मी काय ग फोनमध्ये आणखीन काय समजले नाही का तुला ?? कितीदा शिकविले तरी तुला येत नाही फोन वापरायला. कठीण आहे तुझं. आण इकडे फोन. कोणते अॅप समजेना तुला आता ?” असे वैतागून त्याने मला विचारले.
“छे रे…!!!! आज मला सगळे अॅप समजले. तो अॅपचा तर प्रश्नच नाही. मला फक्त तुझी एक मदत हवीय रे.” मी म्हणाले.
त्याने काही न बोलता फक्त मान डोलावली. कारण मी काय मदत मागणार हे बहुधा त्याला समजले असेल ही.
“हे बघ पिल्लू. साडी डे आहे रे, म्हणून मी पण साडी नेसते. आणि तू माझे पटापट फोटो काढ. मग मी पण तो धडाधड पोस्टून देते.”
हे ऐकून तो जरा हसलाच. पण मी दुर्लक्ष करून कपाट उघडून पटापट साड्या काढल्या. एक तास कोणती साडी नेसू यातच गेला. मग शेवटी एक साडी निवडली.
‘हो हिच ती साडी. किती दिवसांनी शोधत होते आज सापडली.’ असे मनात म्हणत साडी नेसायला आत गेले. साडी तर सुंदर होतीच पण प्रश्न होता तो आता हे ब्लाऊज बसेल का मला??? कारण लॉकडाऊन इफेक्ट आहेच अजून.
एक एक करत सगळ्या साड्यांचे ब्लाऊज घालून बघायचा प्रयत्न केला पण शपथ एक तरी ब्लाऊज बसला असेल तर. काही ब्लाऊज हातातूनच वर चढेना. आई ग ऽऽऽऽ
एकेक करून ब्लाऊज हातात घेऊन मनामध्ये एक गाणे गुणगुणत होते मी.
कोण होतीस तू…
काय झालीस तू…
अगं वेडे किती
जाडी झालीस तू…!!!!!
“अम्मी..!!! झाले का तुझे ? अगं किती वेळ. बघ पाच मिनिटे देतो तुला. माझा कॉल आहे आता लगेचच. ये लवकर बघू फोटो काढतो पटकन.” बाहेरून पिल्लू ओरडत होते.
“हो रे आलेच थांब. काही समजेना रे एक पण ब्लाऊज बसेना. असे कसे झाले हे.” मी आतूनच बोलत होती.
“दोनच मिनिटात हे ब्लाऊज उसवून घालते. मग काढ फोटो.” असे म्हणत ब्लाऊज उसवायला घेतले.
“अगं अम्मी तू तर आता न चुकता रोज वॉकिंग ला जाते मग तू बारीक व्हायला हवी न.”
“ती वॉकिंग ला कुठे जाते. ती तर टॉकिंगला जाते. मैत्रीणींचा घोळका आणि ही सगळ्यांचा म्होरक्या.” इतके बोलून हास्याचे चौकार षटकार मारत टाळ्या वाजवत असणारे कोण हे तुम्हाला सांगायला हवेच का.
मग मला रागच आला आणि मी फुगले टम्म पुरी सारखे. साड्या सगळ्या गुंडाळून परत कपाटात ठेवून गेले स्वयंपाक घरात. मळलेले पीठ पण रागारागाने फ्रिजमध्ये ठेवले. होता तो भातच फोडणी दिले.
पण मला कुठे आवडतो फोडणीचा भात. म्हणून मला केला साजूक तुपाचा शिरा. सगळ्यांना दिला फोडणीचा भात आणि मला एका प्लेटमध्ये शिरा वाढून घेऊन खाणार इतक्यात पुन्हा दुसऱ्या प्लेटमध्ये शिरा वाढून यांना दिला. काहीही न बोलता फक्त त्यांच्या समोर प्लेट ठेवून मी परत आत किचनमध्ये गेले.
तोच मागून हे छोटू आले आणि म्हणाले, “अम्मी मी विचार केला कि मी लग्न करणार नाही.”
त्याच्या बोलण्यावर मी माझी भुवयी उंच करुन त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले.
“हो अम्मी. बघ मी लग्न केलेच नाही तर शिऱ्या मध्ये वाटणी करायला लागणार नाही. मग फक्त आणि फक्त मीच एकटाच शिरा खाऊ शकतो.”
– लेखन : परवीन कौसर. बेंगलोर
ता.क. हा फोटु साभार गुगल असे नाही हो. ही मीच आहे फक्त तीन महिन्यापूर्वीची ! 😀
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800