दात असतात पण आपल्याला आरशात पाहिल्याशिवाय दिसत नाही. आपण हसलो की लोक म्हणतात ‘काय दात काढतो ?’ पण पु. लं सारखे दात दिसल्याशिवाय हसणेही खरे वाटत नाही. लोक हसायला लागली की आपण म्हणतो ‘हसू देत. हसतील त्याचे दात दिसतील’!
दात आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहेत हे आपण रोजचा आहार घेताना पार विसरुन गेलेलो असतो. एखादा बुलडोझर चालवावा तसे आपण दात चालवून भक्ष्य, अभक्ष्य सगळेच स्वाहा करीत सुटतो.
मला आठवते कधीतरी एकदा मेनरोडला एका मिठाईच्या दुकानात सगळ्या कंपनीबरोबर मी गेलो होतो. समोसे मागवले. समोसे चांगले तगडे होते. पण आपणही कमी नाही म्हणून पुढील दातांनी बलप्रयोग करायला गेलो आणि काय तो समोसा मला नुसताच भारीच नाही तर चांगला महागात पडला. कारण तेव्हापासून खिळखिळा झालेला दर्शनी दाखवायचा दात सांभाळता सांभाळता माझ्या नाकी नऊ येऊ लागले आणि एके दिवशी मला गाफील ठेवून तो केव्हा निसटून गेला मलाच कळले नाही. खायचे दात वेगळे असतात हे तेव्हा मला तो समोसा खाताना अजिबात लक्षात आले नव्हते. लोक जसे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात चमकते ठेवतात तसे मला जमलेच नाही. त्यामुळे दर्शनी एक दात गमावलेला कुणाच्या अधिक लक्षात येऊ नये म्हणून मी कितीही मजली हसावेसे वाटले तरी गालातल्या गालातच हसतो. ओठ न उघडताही मला हसता येते हे मी जास्तीत जास्त लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. असे असले तरी कोणी दात काढून सात मजली हसत असेल तर मी त्याचे कौतुकच करतो आणि मनातल्या मनात हेवाही करतो.
दात जसे आपल्या आहारात आहेत तसेच ते आपल्या भाषेतही आहेत. ‘काय दात काढतो’ ‘त्याचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत’ ‘हसतील त्याचे दात दिसतील’ ‘दात घशात घालीन’ ‘दात धरणे’ ‘दात न दाढा अन म्हणे सागुती वाढा’ ‘दात आहे तर चने नाही, चने आहेत तर दात नाही’ ‘दात ओठ खाणे’ अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
बोलताना काही शब्द दात लावल्याशिवाय ओठातून बाहेर पडतच नाही. वधू वर परिक्षेत पुसटसे दिसणारे दातही मोठी भूमिका बजावत असतात.’ जरा हसा ‘अशी फोटोग्राफर सूचना देतो तेव्हा असे पुसटसे दात दिसणे त्याला अभिप्रेत असते.
जन्मल्यानंतर दूधाचे दात येतात त्यांचे केवढे कौतुक होते. बारीकशा दात कण्या दाखवत बाळ हसते तेव्हा आईचा उर किती भरुन येत असतो. ते दूधाचे दात पडून दुसरे दात यायला सुरुवात होते तेव्हा जीभ सांभाळण्याबद्दल धाक भरला जातो. अशा दातांवरुन बिल्कुल जीभ फिरवायची नाही, नाहीतर वेडे वाकडे दात येतील असा दम द्यावा लागतो. बरे असे दात पडले तर मात्र पुन्हा दात येणार नाही अशी भिती तेव्हापासूनच घालावी लागते. लहान वय अल्लड असते. अशावेळी दातांना खूपच जपावे लागते.
एकदा लहानपणी मी बसलेल्या बकरीवरुन टांग टाकण्याच्या प्रयत्नात असा धपकलो की माझा खालचा ओठ वरच्या ओठात शिरला. नशीब तेव्हा तो दात पडला नाही. त्यानंतर आईचा बसलेला मार एकवेळ मला परवडला. आणखी आठवते तेव्हा गल्लीत दंतवैद्य होता. तेव्हा आजच्या इतके विज्ञान प्रगत नव्हते. तो दंतवैद्य तेव्हा बहुधा दात उपटित असावा असा अंदाज आम्ही मुले बांधायचो आणि धूम ठोकायचो.
दिवाळी अंकात दंतवैद्य आणि पेशंट यांच्यावर हमखास कार्टून यायची. त्यामुळे तेव्हा पासून दंतवैद्याविषयी मनात जशी भिती बसून गेलेली होती. अनेक दंतकथाही तेव्हा कानावरुन गेलेल्या होत्या. पडलेला दात घरातून बाहेर फेकायचा असतो.
मौसमी चटर्जीसारखे ३३ दात म्हणे शुभ असतात. गल्लीत पहिल्यांदा लाल खोक्यात ‘कोलगेट’ आले तेव्हा तोपर्यंत चुलीतील राखुंड्याने दात घासणाऱ्या आम्हा मुलांना कोण कौतुक वाटले होते. काही घरी तेव्हा बिटको काळी दंतमंजन लावायचे. पण ती कोळशापासून बनवत असतील म्हणून आम्ही पोरं तिला नाक मुरडायचो. नंतर लाल दंत मंजन आलं.
आज तर कितीतरी टूथपेष्ट आणि टूथब्रश बाजारात आलेले आहेत. तितक्याच त्यांच्या जाहिरातीही. ‘मसुडेकी जान तो दातोंकी शान’ ‘विको वज्रदंती’ पासून तर जवळ येणाऱ्या जोडप्यांसाठी ‘क्लोज अप’ पर्यंत.
वर्तमानपत्रांचे जसे वेगवेगळे वर्ग असतात तसे या पेस्ट आणि ब्रशचे वर्ग असतात. निंबाची काडी चावून दात साफ करणाऱ्यांचा वर्ग आणखी वेगळाच आहे.आपले खाणे दुसर्याला दाखवू नका. कोणती टूथपेष्ट वापरायची यावर घरगुती खटल्याची जाहिरात.
एवढे सगळे प्रकार आहेत पण दात किडायचे ते किडतातच. आणि मग जीवनभर ज्याने आपल्याला साथसंगत केली व जो आपल्या जीवनाचा अपरिहार्य भाग झालेला असतो, ज्याने बत्तीसवेळा घास चावून खाण्याचा आपण उपदेश घेतलेला असतो त्या दाताला जड अंतःकरणाने डॉक्टरच्या हवाली करावे लागते. निरोप द्यावा लागतो.
“थंडी इतकी पडली की पाण्याच्या ग्लासात काढून ठेवलेल्या कवळ्या कडकड वाजायला लागल्या ” असा विनोद एखादा सोन्याचांदीचा दात दाखवत एखादा मित्र सहज सांगून जातो. तोंडाचे बोळके ओठांची रवंथ करत पडून गेलेल्या दातांच्या आठवणी चघळतच राहते.
पुढे आलेल्या दाताची एक गोष्ट मला आठवते.
कुण्या एके काळी कचेरीत दोन कारकून होते. दोघेही एकमेकास पाण्यात पाहून !
भांडती न कधी समोरासमोर.
कागदावरच करीत राहती वार.
एकाच्या हातात होते मस्टर. दुसर्याच्या हाती पे बील. एक करी मस्टर क्रास. दुसरा करी बिलात घोळ.
एक करी सीआर गायब. दुसरा मारुन ठेवी मेख. एकास होता पुढे आलेला एकच दात.
दुसर्यास मात्र पुढे आलेले दोन दात.फजिती होता कधी दोघांची, ते दाखवती आपापले दात.
एरव्ही ते धरुन बसत एकमेकांवर आपापले दात. एक धरुन बसे डूक.
दुसरा ठेवी नुस्तीच पाळत. साहेब एकास सारखे बोलावी.
दुसरा नुस्ताच जळत राही. कान काही भरत तर नाहीना म्हणून भिंतीस कान लावी.
एक खाता बोलणे साहेबाचे, दुसर्यास उकळ्या फुटत राहे.
एक मग साहेबाच्या पुढे पुढे करत राही.
दुसराही त्याला मागे मागे खेचत राही.
रोजच दोघे एकमेकाविरोधात धुमसत राही.
काहीतरी कुरापत काढीत राही.
तेढ संपत नव्हती. उलट वाढत होती.
यात कामे ठप्प होती.
इनेस्पेशनची भिती वाढतच होती.
साहेबाची झोपच उडाली होती.
एके दिवशी साहेबांनी दोघांनाही खूप झापले. चांगलीच खरडपट्टी काढली. दणादण मेमो दिले. कारणे दाखवा नोटीसा बजावल्या.
खुलासे मागविले. डीईची धमकी दिली. पगार रोखून ठेवले.
दोघेही मग खूप बिथरले.
तुझ्यामुळेच झाले सारे म्हणून एकमेकांवर
उखडले. एकाने खुर्ची उचलून दुसर्याच्या डोक्यात टाकली.
दुसऱ्यानेही टेबल उचलून त्याच्या अंगावर भिरकावले. या मारामारीत एकाचा पुढे आलेला एक दातच पडून गेला. पण तेवढ्यात साहेब आले आणि दोघांवरही जोरात खेकसले. डिसमिस करीन म्हणत एकेकाला
चापले. ते गयावया करु लागले. कानाला खडा लावू म्हणू लागले.
एक म्हणाला मी पोराबाळांचा एकटाच कमवता धनी.
दुसरा म्हणे, साहेब मुलगी लग्नाची झाली.
साहेबाने मग दोघांकडून बाँड लिहून घेतले.
दोघेही गुण्यागोविंदाने कामे करु लागली.
एकमेकांवर जीव पाखडू लागली.
एकमेकांच्या कामात मदत करु लागली.
एकमेकांच्या डब्यात जेवू लागली.
ऑफीसनेही सुटकेचा निश्वास टाकला.
कामामध्ये प्रगती दिसू लागली.
साहेबाचा सीआर वरुन अतिउत्कृष्ट म्हणून आला.
साहेबाने दोघांनाही घरी पार्टीला बोलावले.
पार्टीत एकाला सहज कोणीतरी विचारले,
‘तुमचा तो पुढे आलेला दात दिसत नाही’
‘छे छे हे काही बरे दिसत नाही बुवा’
घरी येऊन त्याने मग आरशात पाहिले.
पुढे आलेला एक दात म्हणजे आपली ओळख होती आणि आपली ओळखच नष्ट करुन टाकली या
विचाराने तो व्याकुळ होऊन गेला.
दातओठ खायचे तरी दातच शिल्लक ठेवला नव्हता !
त्याला आठवले या दाताला सारे टरकून राहायचे.
दात खपा होऊ नये म्हणून काय काय घेऊन यायचे एकेकजण. वाणोळा म्हणून बोरं, मेथीच्या जुड्या, आंब्याच्या पेट्या, कणसं, भुईमूगाच्या शेंगा, करवंदं,
नागलीचे पापड… सगळ्या सगळ्याला आता मुकलो म्हणून त्याचा तिळपापड झाला. तिरीमिरीत येऊन त्याने आरशापुढे डोळे पुढे काढून मोठ्याने शपथ घेतली
‘नाही तुझे दोन दात पाडले तर नावाचा…. नाही ‘
दाणकन मुठ आपटून तो पुढील बेत आखू लागला.
दिवसामागून दिवस गेले. तसे दोघे जीवाभावाने रहात होते. एकमेकांशिवाय पानही हालत नव्हते. कुठले भांडण नाही. तंटा नाही. धुसपुस नाही. पाण्यात पाहणे नाही. कार्यालय सुटले की दोघे एकाच बाजारातून भाजीपाला, मसाला घेऊन घरी जात होते. दोघे कामावर असतांना दोघांच्या बायकाही एकमेकींच्या घरी कामे उरकल्यावर गप्पा मारायला जात. पोरंही मग तिथे अंगणात खेळत.
बेत तडीस जात नव्हता. दिवस मात्र भराभर उलटत होते. मनातल्या मनात पुढे आलेले दोन दात सलत होते पण हात चोळीत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची शेवटी सेवानिवृत्ती जवळ येऊन ठेपली तरी बेत मनातच राहिलेला होता. अस्वस्थता वाढत चालली होती. शेवटी तो सेवानिवृत्त झाला. निरोप समारंभात त्याने गळा काढून भावपूर्ण भाषण केले.
त्यालाही या भाषणाने अगदी भरुन आले. दिवसामागून दिवस गेले. एके दिवशी अचानक पत्र आले. पेन्शन पेपरवरील फोटोत पुढे आलेले दोन दात आहे पण सेवापुस्तकात नोंदवलेल्या ओळख खुणेत हे जुळत नाही. पेंशन मंजूर करता येणार नाही. पेंशनसाठी त्याने कचेरीच्या खूप खेट्या मारल्या पण दादच लागेना. शेवटी तो याला भेटला. आपली कैफियत मांडली. पुढे आलेले दोन दात दाखवतांना त्याला रडूही कोसळले. रडू नको म्हणून त्याने धीर दिला व शेवटी दंतवैद्याकडे जावून एकदाचे ते पेंशनमध्ये अडथळा ठरलेले दोन दात पाडून पुन्हा फोटो सादर केले तेव्हा कुठे एकदाचे पेंशन मंजूर झाले. त्या खुशीत त्याने याला घरी आमरसाच्या जेवणास सहकुटुंब बोलावले. त्याचे डोळे निराळ्याच खुशीत चमकत होते. आमरस भुरकावत तो मनातल्या मनात उद्गारला ‘शेवटी पाडलेच ना तुझे पुढे आलेले दोन दात !’
दुखर्या दाताचे दु:ख काय सांगावे. ज्याने अखंडपणे जीभेचे चोचले पुरवण्यात आयुष्यभर पुढाकार घेतला तो दात दुखायला लागला की कधी एकदा त्याला उपटून टाकतो असे होऊन जाते. तो दात काढून टाकेपर्यंत रसास्वाद घेण्याच्या सुखाला अगदी पारखे होऊन जावे लागते. दात काढून टाकणे आता वेदनादायक राहिलेले नाही.
आता विज्ञानाने कवळी ऐवजी सगळे दात इंप्लान्ट करायचे तंत्र विकसित केलेले आहे. दात इतका हसत खेळत काढला जातो की दात काढल्यावर भूल उतरेपर्यंत तुम्ही खुशाल सात आठ मजली हसू शकता ! असा आहे हा दाताचा महिमा !
– लेखन : विलास आनंदा कुडके
– संपादन : देवेंद्र भुजबळ.☎️ 9869484800
सुंदर लेख, आतिउत्तम
अप्रतिम लेखन….दाताचे उपयोग, दाताबद्दलच्या म्हणी, पूर्वीचे गैरसमज आणि शेवटची गोष्ट…. सुंदर लेख 👌👌
अक्कल दाढेच्या उल्लेखाशिवाय दंतोधारिष्ट्य पुरे कसे होणार ?
वैसेभी तुम्हारे दूधके दात नहीं तुटे थे, तबसे हम गुंडोंके दात तोंड रहे है |
🌹अप्रतिम, सुंदर लेख. दाताचे उपयोग आणि विडंबन याचा ताळमेळ, अतिउत्तम 🌹
धन्यवाद सर