.. आणि शाहरुख भेटला !
सध्या सगळीकडे एकच चर्चा चालू आहे आणि ती म्हणजे भारताचे प्रसिद्ध उद्योग पती मुकेश अंबानी आणि सौ नीता अंबानी यांचे कनिष्ठ चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची. वृत्तपत्र म्हणू नका, वृत्तवाहिन्या म्हणू नका की, समाज माध्यम म्हणू नका सगळीकडे याच नुकत्याच पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याच्या बातम्यांचा पूर आपल्याला पाहायला मिळाला. भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा याच विवाह सोहळ्याची चर्चा होती.
या लग्नाच्या चर्चेचे अजून एक कारण म्हणजे या लग्न सोहळ्याचा खर्च जवळपास ५ हजार कोटी रुपये आला असून या लग्नाने राजकुमारी डायना आणि राजकुमार चार्ल्स यांच्या लग्नात झालेल्या १३६१ कोटीच्या खर्चाला मागे टाकले म्हणे.
हा शाही विवाह सोहळा १२ जुलै २०२४ ला म्हणजे शुक्रवारी मुंबईच्या जिओ वर्ल्ड कॉन्वेंशन सेंटरला पार पडला. या विवाह सोहळ्याला देशातीलच नव्हे तर विदेशातील देखील मोठमोठ्या दिग्गजांनी आपली हजेरी लावून या नवदांपत्यांना आशीर्वाद दिला.
सांगायचा मुद्दा म्हणजे या शाही विवाह सोहळ्याची मी देखील एक साक्षीदार होती. अहो, खरंच विश्वास बसत नाहीये ना ? स्टाफ मेंबर म्हणून नाही हं, तर आमंत्रित पाहुण्यांमध्ये माझं नाव होतं ! हा नयनदीप विवाह सोहळा मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला. अबब ! काय ती फुलांची सुंदर सजावट, काय ते सुंदर झूम्बर, सगळीकडे टाकलेलं मखमली गालिच्याच्या पायघड्या, सगळीकडे दरवळणारा अत्तराचा सुहास…. सगळीकडे मंगलमय वातावरण.. डोळ्याचे पारणे फेडणारं होतं सगळं.
हळूहळू पाहुण्यांची होणारी रेलचेल आनंदात भर टाकत होती. चित्रपटसृष्टी, राजकारण, क्रीडा विश्व, अध्यात्मिक गुरु आणि विदेशातील दिग्गजानी आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली. ज्यांना मी आजवर फक्त टीव्ही पाहिले होते त्यांना मी प्रत्यक्षात पाहत आहे याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. सोनू निगम, श्रेया घोषाल, शंकर महादेवन आणि हो आपले अजय अतुल यांच्या गाण्यांनी आसमंत न्हाऊन निघाला होता. दुसरीकडे वधू-वराकडील मंडळी सगळ्यांचे स्वागत व्यवस्थित होत आहे की नाही याच्याकडे जातीने लक्ष देत होती.
पण या सगळ्यात माझी नजर मात्र किंग खान “शाहरुख खान” याला शोधत होती. आणि तेव्हढ्यात शाहरुख मला दिसला. त्याला पाहता क्षणी माझ्या अंगावर शहारे आले. अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्या नजरा चुकवून मी शाहरुखच्या दिशेने निघाली. मी शाहरुखला घट्ट मिठी मारणार या विचाराने मला धडधडायला होत होतं.
मी शाहरुखला मिठी मारणार तोच, “आश्लेषा, उठ चहा कर” हे शब्द माझ्या कानावर पडले. दोन सेकंद मी विचार केला शाहरुख मला चहा का मागत असावा ? तेवढ्यात घड्याळाच्या गजराने माझे डोळे उघडले आणि बघते तर काय माझे यजमान समोर उभे आहे आणि सकाळच्या चहाची वाट पाहत आहे. मग माझे डोळे खाडकन उघडले. डोळे चोळत चोळत घड्याळाचा गजर बंद करून पलंगावरून पाय जमिनीवर ठेवत मी भानावर आली. आणि रोजच्या दिनकर्माला सुरुवात केली.
चहा करताना, स्वप्न आठवून माझंच मला हसायला येत होतं. चहाचा कप नवऱ्याच्या हातात देत, त्याला एक घट्ट मिठी मारून म्हटलं हाच माझ्या आयुष्यातला शाहरुख ! जो चित्रपटातल्या शाहरुख सारखे चंद्र, तारे जरी आणत नसला तरी कोथिंबीर आणि मेथी आणून माझी काळजी घेतो आणि एका बायकोला काय पाहिजे !!!
— लेखन : आश्लेषा गान. सातारा.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ताई, छान लिहिलंय,
मजा आली वाचून . . .
☺️☺️☺️
वाह वाह..आश्लेषा.. मस्तच..अग मी पण गेले होते त्या शाही विवाह सोहळ्याला.. अशीच तुझा सारखी च.. आपली भेट तिकडे होता होता राहीली..
गम्मत ह.. पण लेख खूपच मस्त झालाय.. प्रत्यक्ष अंबानी लग्नात फिरुन आले म्हण ना.. अशीच छान छान लिहत रहा..आणि हो एक चहा वाढव ह.. मी पोचते तोवर.. n सोबत तुझा हातचे मस्त पोहे पण कर..अशा वातावरणात मज्जा येईल..muaaa😘 असच छान छान वाचायची संधी आम्हाला कायम मिळू दे..हीच शुभेच्छा 💐💐💐
मस्त… एका क्षणाला खरच वाटलं.. 😁
छान लिहिलयस ताई…👌
Ashu khup Chan lihilas khup varshanantr tujh likhan vchayla milal
😀😀थोड्यावेळ का होईना मी सुद्धा त्या लग्नसोहळा अनुभवत असल्याचा आनंद मला मिळाला. स्वप्नात का होईना मनातली ईच्छा पूर्ण झाल्याचा आनंद दिवसभर मन प्रसन्न ठेवतो.👌 छान लिहिलंय.
मला पण लग्नसोहळा अनुभवल्या सारख वाटलं ☺️