“ज्येष्ठ संवाद“
काल, २१ ॲागस्टच्या ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने हा “ज्येष्ठ संवाद “😃
– संपादक
“बॅंकेत गेलंच पाहिजे आज. रात्रीच सांगितलं होतं मी ? अन् नाश्ता तरी वेळेवर मिळणारे का ? काही वेगळं आहे की तेच ते काॅर्नफ्लेक्स घालायचेयत घशात ? ते इंग्रजी नाव असलं तरी शेवटी ‘पोहे’च की !”
प्रमोदरावांच्या चढ्या सूरावरून, ‘रात्री बहुधा झोप लागलेली नसावी नीट‘ अशा निष्कर्षाचा ‘स्वर्ग’ गाठलाच लीनाने !
“अहोsss, हे पहा, पोचलेच की पोहे टेबलवर ! इंग्रजी नाही हं, ‘कांदे-पोहे’ आहेत 😃 उगा आपलं चिडचिडायचं”
लीनाने शेवटचं वाक्य हळ्ळुच म्हटलं तरी पडलंच ते रावांच्या कानावर !!
“आर्थिक बाबी सगळ्या ढकलायच्या माझ्यावर! बाहेर जाऊन करशील तर कळेल नं उशीर झाला की काय प्रॅाब्लेम होतो” रावांचं खाणं सुरू, पण चिडचिड कायम !😠
(‘सगळ्या 😳 ढकलायच्या ? ’सग्गळ्या कामात तेवढंच तर होतंय कसंबसं !) मनातल्या मनात लीना !
सत्तरीच्या जवळ पोचलेल्या प्रमोदरावांची आताशा जास्तच चिडचिड होऊ लागलीये. समजून घ्यायला हवं अशी हीच तर वेळ आहे, हे ही मनातच 😊
“हुं ! ‘ही’ थैली तयार आहे. चेकबुक्स, पेन सगळं आत घालून तयार ठेवलीय”
“नशीब माझं !”
“जवळच जायचंय वगैरे सबबी सांगू नका हं, ‘ती’ कॅालर लावून जा“
“लावतोय गं बाई, तुझी भुणभुण ऐकण्यापेक्षा लावलेली बरी “
“अहो, मान दुखते म्हणून मग खांदे वर करून चालता नि नंतर तेही ‘दुखण्या’त सामिल होतात. मग पुन्हा ‘ती’ गरम पाण्याची पिशवी बसतेच मानेवर, म्हणून म्हणतेय”
“ही लावली कॅालर ! ‘ही’ काठी पण घेतलीय ! निघतोय मी !”
“माझी भुणभुण म्हणताय, पण बघा ! एवढी समोर काढून ठेवलेली ‘ही’ टोपी विसरत होतात. ऊन कीतीय बाहेर”
“झालं तुझं समाधान ? जाऊ मी ?”
जामानिमा करून बाहेर पडलेल्या पाठमोऱ्या प्रमोदरावांकडे बघतांना लीनाला हळूच हसू आलं. 😊
सक्काळपासून कामात व्यग्र असलेली लीना क्षणभर तिथेच कोचावर टेकली, जरा छोटासा ब्रेक घ्यायला.
लीनाच्या मनात आलं, ‘पस्तावलेला नवरा’ किंवा ‘बायकोचा जाच’ यावर निरंतर विनोद (so called) फिरत असतात ते कसं काय एन्जॅाय करतात हे ‘नवरे’ खरं तर ? 🤔
आयुष्याच्या तिसरया टप्प्यावर, ‘कॅालर’, ‘काठी’, ‘टोपी’, ‘शेकायची पिशवी’, इत्यादी सगळ्या ‘तीं’ वरच मदार ठेवावी लागत
असून सुध्दा ? नि ‘ती आठवण’ करून देणारीही तीच की ! देवाब्रह्मणांच्या साक्षीने बनलेली, ‘अर्धांगिनी‘! 😃
— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अनुजा बर्वे यांनी लिहिलेले एका कुटुंबाचे चित्र ज्येष्ठ नागरिक जीवनावर प्रकाश टाकणारे आहे.