“कुलकर्णी आणि कुलकर्णी”
सारखी नावे, सारखी आडनावे असली की, अनेकदा खूप गंमतीशीर किस्से घडत असतात. असाच एक किस्सा इथे सांगावसा वाटतो.
नागपूरला असताना माझ्या ऑफिसमध्ये “कुलकर्णी” नावाचे गृहस्थ होते. ते वयाने आणि अनुभवाने सगळ्यात सीनियर असल्याने सगळेच त्यांना सर म्हणत. एक दिवस, कुलकर्णी सर आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन ऑफिसला आले आणि सगळ्यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. प्रत्येक विभागाला त्यांनी एक – एक पत्रिका दिली होती. आम्ही सगळ्यांनी लग्नाला जायचे ठरवले. गिफ्ट आणण्याची जबाबदारी वरिष्ठांची असल्याने आम्ही ज्युनिअर्सनी फक्त पैश्यांची कॉन्ट्री केली. मी व माझी मैत्रीण आसावरी आम्ही दोघीनी एकाच गाडीवर जायचं ठरवलं.
लग्नाच्या दिवशी फक्त मंगलकार्यालयाचे नाव व मुहूर्त वेळ पाहून आम्ही दोघी एक पुष्पगुच्छ घेऊन पुढे निघालो. ऑफिसमधली बाकी मंडळी आपापल्या सोयीने येणार होती. आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलो. बाजूच्याही मंगल कार्यालयात अजून एक लग्न असल्याने खूप गर्दी होती. कसेबसे गाडी पार्क करून आम्ही कार्यालयात शिरलो. मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर “कुलकर्णी परिवार, आपले सहर्ष स्वागत करीत आहेत !” असा फलक पाहून बरोबर लग्नात आल्याची खातरजमा आम्ही केली. आम्हांला उशीर झाल्याने सुलग्न लागून गेले होते. कार्यालयात खूप गर्दी होती . कुलकर्णी सरांच्या परिवाराशी आमची तोंड ओळख देखील नव्हती. त्याच्या मुलांची नावे देखील आम्हांला माहित नव्हती. म्हणून आम्ही बाजूला उभे राहून सगळ्या अपरिचित चेहऱ्यांमध्ये परिचित चेहरे शोधत होतो.
मी जरा गोंधळलेल्या स्वरात आसावरीला विचारलं, “अगं, आपण चुकीच्या लग्नात तर आलो नाही ना ?” कोणीच कसं काय ओळखीचे दिसत नाहीय ? कुलकर्णी सर पण दिसत नाहीयेत ? यावर आसावरी म्हणाली, “अगं, सर वधुपिता असल्याने कामात असतील आणि ऑफिसचे लोक असतील कुठेतरी, नाहीतर येतील मागून !” तिच्या या उत्तराने मला जरा हायसं वाटलं. स्टेजवरील नववधूचे कपडे, दागिने, नवदांपत्यांचे एकमेकांकडे चोरून पाहणे, स्टेजवरच मित्र-मैत्रिणींची चाललेली चेष्टा, मस्करी हे सगळे पाहून “अपना नंबर कब आएगा ? असा विचार मनात आला. कारण तेव्हा आम्हीही इच्छुक उमेदवार होतो.
तेवढ्यात आमच्या पोटातल्या उंदीरानीं भूक लागल्याचे संकेत दिले. सुलग्न लावण्यासाठी खूप मोठी रांग होती आणि आम्हाला ऑफिसलाही जायचे होते. वेळेचे नियोजन म्हणून आम्ही आमचा मोर्चा “डायनींग हॉल” कडे वळवला. तश्या आम्ही दोघीही चटोऱ्या असल्याने सगळ्यात पहिले चाट सेंटरवर ताव मारला. मग “मेन कोर्स”, स्वीट डिश”असे यथोचित भोजन केले. “पेट भरा पर नियत नहीं” अशी काहीशी आमची अवस्था होती. पण यामध्येही आमच्या नजरा मात्र परिचितांना शोधत होत्या. कदाचित आम्हांला यायला उशीर झाल्याने, सगळे निघून गेले असेल, असे आता आम्हांला वाटू लागले. त्यावेळी आमच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आम्ही कोणाशी संपर्क साधू शकत नव्हतो.
शेवटी ऑफिसला खूप उशीर होत असल्याने आम्ही नवदांपत्याची भेट घेतली. पुष्पगुच्छ देऊन दोघांचेही अभिनंदन केले. आणि कुलकर्णी सरांची चौकशी केली असता “कदाचित, बाबा कामात असतील,” असे समाधानकारक उत्तर नववधुने दिले. नवदांपत्यांचा निरोप घेत आम्ही स्टेजवरून खाली उतरलो. निघताना पण आम्ही कुलकर्णी सरांनाच शोधत होतो.
बाहेर आल्यावर आम्ही जरा बाजूला उभे राहून चर्चाच करत होतो, तोच आमची नजर बाजूच्या मंगल कार्यालयावर पडली. त्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलकर्णी सर “स्वागतोत्सुक” म्हणून उभे होते. तिथेही “कुलकर्णी, परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे !” असा फलक लावला होता आणि ऑफिसची बरीच मंडळी कार्यालयाच्या बाहेर उभी होती. आपण चुकीच्या लग्नात गेलो होतो, हे समजण्यास आम्हाला अर्धा सेकंदही लागला नाही. तेवढ्यात ऑफिसच्या एका सरांनी आम्हाला हाक दिली आणि एवढ्या वेळ कुठे होता ? सगळे तुमची किती वाट पाहतायत ? अशा नाना प्रश्नांचा भडीमार आमच्यावर सुरू झाला. कुलकर्णी सरांनीही आम्हाला त्यांच्या सौ. ची ओळख करून देत आत जाण्याची विनंती केली. आम्हाला काय बोलावे, हे कळत नव्हते. आम्ही निव्वळ एकमेकींच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. आत गेल्यावर वरिष्ठांकडून उशिरा आल्याबद्दल मिळालेली तंबीसुद्धा मेंदूपर्यंत पोहोचत नव्हती. सगळेजण आमचीच वाट पाहत होते. पुन्हा सुलग्न लावताना आमच्या दोघींचेही चेहरे पांढरे झाले होते. परत एकदा जेवणाची इच्छा तर सोडाच पण अर्ध्या तासापूर्वी “त्या” लग्नात आम्ही काय जेवलो हेही आम्हांला आठवत नव्हतं. “त्या कुलकर्णींच्या ” लग्नात जर आम्हाला कोणी ओळखले असते तर काय झाले असते ? याचा विचार करून घाम फुटायला लागला. हसावे की रडावे हेच समजत नव्हते. झालेल्या प्रकाराची कुठेही वाचा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
पुढे बरेच दिवस आम्ही या प्रसंगाची आठवण करीत कधी हसायचो तर कधी भीतीने अंगावर शहारे यायचें. तेव्हापासून आता मात्र कुठल्याही लग्नात जाताना पत्रिका सोबत घेऊन जाण्याची खबरदारी घेतो आणि आत जाऊस्तोवर नेमके हव्या त्याच लग्नाच्या ठिकाणी पोहोचलोय ना ? याची शहानिशा करीत बिचकत बिचकतच जातो !!!
— लेखन : सौ. आश्लेषा गान. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
माझ्या ओळखीच्या अनेक कुलकर्णी ना हा लेख पाठवला..हसून हसून पुरेवाट झाली..मस्त लिहिलं आहेस आश्लेषा.. दिवसेंदिवस उत्सुकता वाढतेय..आणि पुढच्या लेखाची वाट पाहते..💐💐
सुंदर वर्णन
Chan ahe
वाचून मजा आली, हा हा हा
😁😁”बेगानी शादी मे अब्दुला दीवाना” असे काही से झाले. तुमच्या बाबतीत फारच मजेशीर किस्सा 👌👌👌
हो ना