दातावर “दात” धरू नका !
छान दात असणे हा सौंदर्याचा एक मापदंड मानला जातो. ‘मोत्यासारखे शुभ्र’ दात, ‘सुंदर दंतपंक्ती’ असेही शब्दप्रयोग आपल्याला परिचित असतील.
दात छान दिसण्यासाठी ते मापात असलेच पाहिजे असेही काही नाही. मौशुमी चॅटर्जीचे वाकडेतिकडे दातही छान दिसत. दात हा अवयव केवळ चावण्याच्याच कामी येत नाही. मराठी साहित्यात तर या दाताने मोठीच भुमिका बजावली आहे. एखाद्यावर ‘दात धरणे’ म्हणजे त्याच्याबद्दल आकस, राग मनात धरणे असा अर्थ होतो. “हसतील त्याचे दात दिसतील”, “त्याचे दात त्याच्याच घशात घातले”,
अशा एक ना अनेक म्हणी रूढ आहेत.
तीन वर्षांपूर्वीच्या बकरी ईदची घटना असेल. माझ्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम परिवाराने बकरी ईद निमित्त बोकडाचे (न शिजवलेले!) मटण भेटी दाखल दिले होते. तो बोकड जिवंत असताना चांगला धष्टपुष्ट असावा, असे त्या मटणावरुन स्पष्ट होत होते. घरी मटण खाणारा मी एकटाच ! पत्नी व मुलाला ते चालत नाही. पत्नीने ते छानपैकी शिजवून मला वाढले. मटणाच्या नळीचा आस्वाद घेणे ही माझी जुनी सवय! ती नळी तोडताना घात झाला. त्या बोकडाने माझा जणू ‘मरणोत्तर’ वचपा काढला. दाढेखाली धरुन त्या नळीचा तुकडा पाडताना त्या नळीनेच माझ्या दाढेचा कपचा उडवला आणि त्या दाढेला खाच स्पष्ट दिसू लागली. त्यावेळी थोडेसे दुखले. मी दुर्लक्ष केले. ते मला नंतर महागात पडले.
आता तीन वर्षांनंतर पाणी पिताना, जेवताना, काही खाताना ती दाढ भयंकर दुखु लागली. त्या खाचेत काही ना काही अडकू लागले व त्याचा त्रास होऊ लागला. लवंग दाढेखाली धरणे व तत्सम उपायांना ती दाढ काही दाद देईना. मग डॉक्टरची वाट धरली. माझ्या मुलाच्या वयाच्या दंतवैद्यक असणाऱ्या त्या डॉक्टर मुलीने माझा जबडा उघडून तपासले. एक्सरे काढले व सांगितले की ‘रुट कॅनॉल करावे लागेल, सिमेंट भरावे लागेल, कॅप लावावी लागेल, तीन चार सिटींग्ज होतील व एवढा एवढा खर्च होईल.’ मी म्हटले, ‘बाई, खर्चाचा विचार करु नको. मला आधी वेदनामुक्त कर.’ मग तिने माझ्या गालात, हिरडीत एकूण चार इंजेवशने दिली. दाढ खरवडून काढली. त्यात कापूस, सिमेंट भरले. वेदनाशामक व अन्य गोळ्या दिल्या व ‘पुढच्या वेळी बाकीची ट्रीटमेन्ट करु’ म्हणून रजा दिली.
यामुळे वेदना थांबल्या खऱ्या; पण काही दिवस एकाच बाजूने जेवायची, एकाच बाजूचे दात घासायची वेळ आली. अक्षरशः ‘खायचे वांधे’ झाले. एका बाजूने घास चावताना जबडा दुखू लागे. माझ्यासारख्या खादाड माणसासाठी हे सगळं म्हणजे गायकाने गायचे नाही, फलंदाजाने बॅट हाती धरायची नाही, नटीने नटायचे नाही, शिवसेना उध्दव ठाकरे गटाने शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणायचे नाही अशातला प्रकार होता!
तर ते असो. दात हा प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पण होते काय, त्या दाताला जोवर काही (अपाय) होत नाही, तोवर त्याचे महत्वच लक्षात येत नाही. प्रत्येकाचे दुधाचे असे नाजूक दात दहा बारा वर्षांपर्यंत पडतात आणि त्यानंतर मग ‘दाखवायचे व खायचे खरे’ दात येतात. माझ्या लहानपणी दुधाचे काही दात असे हलायला लागले, कमजोर झाले की त्यांना पुडीला गुंडाळायचा दोरा लावून ते पाडायचा ‘पराक्रम’ही मी त्या बालवयात केल्याचे मला अस्पष्टसे स्मरते. असे दात पडले की म्हणे गरोदर बाई रहात असलेल्या घराच्या कौलावर ते फेकायचे असतात. तेही मी केले आहे. त्यावेळी मी खेडेगावात रहात असल्याने व सारीच घरे कौलारु असल्याने ते जमूनही गेले. आता महानगरात जिकडे तिकडे टॉवर्स नि बहुमजली इमारती. मग एखाद्या पंधरा मजली टॉवरात तिसऱ्या माळ्यावरच्या फ्लॅटात एखादी गरोदर बाई रहात असेल तर तिच्या घरावर हा दात कसा बरे फेकायचा ? असा प्रश्न मला पडतो.
दात हा अवयव केवळ चावण्याच्याच कामी येत नाही. म्हणजे कधी कधी परिस्थितीच अशी निर्माण होते की त्या आनंदाचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत. ‘तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे’ असे कवी विंदा करंदीकर यांनी लिहुन ठेवले आहे. इथे दात म्हणजे शोषकाचे, जुल्मी प्रस्थापितांचे प्रतिक होत. ‘खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’ असे आपण नेहमी म्हणतो. जरा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे नीट पहा म्हणजे ते तोंडावर जसे बोलतात व पाठीमागे काय बोलतात याचा अदमास घेतला की त्यांच्या ‘खायच्या दातांबद्दल’ लगेच लक्षात येईल. ‘दाती तृण धरुन शरण आले’, असे पूर्वीच्या काळी शरणार्थींबद्दल बोलले जाई. आता गेले सहा महिन्यांहुन अधिक काळ रशिया-युक्रेन युध्द सुरु आहे. पण आकाराने व शक्तीने छोटा देश असूनही यु्क्रेन ‘दाती तृण’ धरायला काही तयार नाही. ‘दंतोजीचे ठाणे उठले’ असे इंग्रजपूर्व काळात तत्कालिन साहित्यिक लिहीत असत.
सगळे दात पडले याला समांतर ती शब्दरचना होती. ‘दातांचे बोळके झाले’ याचाही अर्थ तोच. ‘दात विचकणे’ म्हणजे छद्मी स्वरुपाचे हसणे. अलिकडचे दातांचे डॉक्टर हे दात काढून टाकण्यापेक्षा दात वाचवण्यावर भर देतात, हेही पाहता येईल. दातांमुळे चेहऱ्याची शोभा वाढली पाहिजे; ‘शोभा’ होऊ नये. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात प्रियदर्शिनी इंदुलकर नावाची एक अभिनेत्री आहे. तिलाही सुंदर दातांचे वरदान लाभले आहे. मला आठवते.. विको वज्रदंती टुथपेस्ट आणि टुथ पावडरीच्या जाहिरातीत एकेकाळी सुंदर दंतपंक्ति लाभलेली मृणाल देव (नंतर ती कुलकर्णी झाली) झळकत असे. मग एक साठीपुढचे आजोबा दाढेखाली आक्रोड कसा लिलया फोडत हेही दाखवले जाई.
दात कसे सुरक्षित ठेवावेत हा प्रश्न खासगी असला तरी दात घासायच्या पध्दतींबाबत सार्वजनिकरित्याच खूप काही सांगितले जात असते. पूर्वीच्या काळी म्हणे राखाडी, तूस तसेच कडुलिंबाच्या-आंब्याच्या काड्या दात साफ करण्यासाठी (दातवण म्हणून) वापरल्या जात असत. पुढे मार्केटींग, प्रमोशन, जाहिरातींचे युग अवतरले व माकड छाप काळी टुथ पावडर, पतंजलीच्या दंतकांती पासून विठोबा दंतमंजनही छोट्या-मोठ्या पडद्यावर दिसू लागले व अतुल परचुरे ते मनोज वाजपेयी ही मंडळी जाहिरातींत झळकू लागली.
डेंटीस्ट्री अर्थात दंत वैद्यक शास्त्र ही शाखा अलिकडच्या काळात चांगले नाव मिळवून आहे. आपले शरीर, आरोग्य, दिसणे, वावरणे याबाबत अधिक जागरुकता आल्याने दातांच्या दिसण्यावरही अनेकजण अधिक लक्ष देतात. ज्येष्ठ अभिनेते काशिनाथ घाणेकर हे पेशाने दातांचे डॉवटर होते. एक जमाना होता. दातांचे डॉक्टर म्हणून तेंव्हा चिनी नावांच्याच पाट्या जिकडे तिकडे दिसत असत. आता माझे अनेक मित्र, मित्रांच्या मुली, मुले, सुना, जावई हे दातांचे डॉक्टर आहेत. दातांच्या दवाखान्याचे विशेष लक्षण म्हणजे ती आलिशान खुर्ची. ज्यात दिव्यापासून-पाणी फवारण्यापासून, पेशंटला बसता ठेवण्यापासून ते पार १६० अंशात जवळपास आडवाच करणे, वीजपुरवठा, वायरी, एक्सरे मशिन जोडणीपर्यंतच्या साऱ्या सोयी मौजूद असतात.
करोना असो, नसो दाताचा डॉक्टर हा केंव्हाही तुम्हाला तपासताना मास्क लावूनच तपासणार. दातांच्या दुखण्यातून वाचकांपैकी कोण कोण गेले आहे, मला माहित नाही. पण मी मात्र दोनदा गेलो असून तोंडात धातूच्या दोन दोन टोप्या (म्हणजे आपली कॅप हो!) धारण केल्या आहेत. दातांचे रुट कॅनॉल, दात काढून टाकणे व तत्सम उपचार म्हणजे बाळंतीणीला होणाऱ्या वेदनांशीच त्यांची बरोबरी होऊ शकते या अनुभवांच्या बोलांचाही मी एहसास घेतला आहे. तशा प्रकारचे दारुण दुखणे कुणाला सहन करायची वेळ येऊ नये हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना🙏

– लेखन : राजेंद्र घरत. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800