“डोळे हे जुलमी गडे”
माझ्या डोळ्यांवर मी कोणता बरं असा अत्याचार केला ? कळेना अजूनी माझे मला. या डोळ्यांची दोन पाखरे फिरती माझ्या भवती अन उगाचच भिर भिर फडफड का करतात बरं ? असा प्रश्न पडावा.
“नयनों मे बदरा छाये” बिजली सी यु चमकाये असं का बरं व्हायला लागलंय? होय थोडं धूसर धूसर दिसायला लागलंय हे मात्र खरं. कुणी म्हणतात, ‘नयन तुझे जादूगार’ काय जादू करत असावेत बरं हे डोळे ? चष्म्याचा नंबर सुद्धा डोळे तपासायच्या त्या यंत्रावर येऊ नये इतकी जादू माझ्या डोळ्यांनी करावी ? जी कधी नामवंत रघुवीर जादूगाराला सुद्धा करायला जमली नसेल ? ते गाणं आहे ना, ‘जरी आंधळी मी तुला पाहते’ तसंच काहीसं झालंय. आंधळा जरी झालो नसलो तरी का कुणास ठाऊक, हळू हळू आंधळेपण जाणवेल की काय ही शंका मनात उद्भवली आहेच हो. मग माझ्या रोज लिहिल्या जाणाऱ्या साहित्यिक लिखाणाचं काय होईल ? या प्रश्नाच उत्तर शोधायलाच हवं.
डोळ्या डोळ्यांची सुद्धा एक मूक भाषा असते, सांगितल्याविण ओळख तू रे. केवळ नजरेच्या इशाऱ्याचा धाक असतो, त्याच नजरेच्या कटाक्षाने कुणा ललनेला वशही करता येते ते म्हणजे केवळ डोळे. मूक भावना व्यक्त करताना डोळ्यातून झिमझिम धारा अगदी रेशीम सरींसारख्या झरत असतात हे माहित होते पण आजकाल तसे कोणतेही कारण नसताना का बरं डोळे झरताहेत अन एव्हरफ्रेश टीयर्सचे दोन दोन थेंब डोळ्यात टाकले की डोळे जरा सुखावतात, का बरं असं होत असावं ? ‘आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा’ असं म्हणायची सुद्धा भीतीच वाटते हो ! काय सांगावं उगा संसर्गजन्य काही असलंच तर त्याची लागण तिला व्हायला नको ना ? हे मनांत आलं की, ‘नैना बरसे रिमझिम रिमझिम’ हे आठवतं आणि नैन मिले चैन कहा दिल है वही तू है जहां’ असं डावा डोळा उजव्या डोळ्याला का बरं सांगत असावा ?
‘रूप पाहता लोचनी सूख झाले हो साजणी’ इथे तर प्रत्यक्षात डोळे एकवटून रूप पहायची वेळ आलेय, कसं व्यक्त करावं हे दुःख ? ‘अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग’ याला पारखा व्हायची वेळ आलेय जणूं. ‘ सौख्य पाहता भिजू दे माझ्या डोळ्यांच्या या कडा ‘ त्या कडा तर सततच ओघळत आहेत, काय करावं बरं याला ? माझ्या तरुणपणात माझी चाल तुरुतुरू होती आता वयोमानापरत्वे थोडी मंद झाली आहे असं जाणवतंय अन ‘ डाव्या डोळ्यावर बट ढळली ‘ जुल्फेच कधी ठेवली नाहीत तर बट कशाला ढळेल बर ? हा विचार मनांत आला अन चक्क अस्मादिक ‘ उगाच भुवई ताणून ‘ गाली खुदकन हसलो ना ! ‘ मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली ‘ अशा कितीतरी रात्री आजकाल हरवून गेल्याचा भास मला होतोय हो. ‘दीप लोचनी सदैव तू रे संध्यातारक होशील का ? ‘ असा एखादा महाभाग तारक होऊन कुणी माझ्या डोळ्यांच्या दुःखावर, जवळी मजला घेईल का ?
‘व्याकुळ नयनात नीर, मीलनाची आस खुळी, पाहिजेस तू जवळी ‘ माझी सहचारिणी आज माझ्या साथ संगतीला नाही ही खंत माझ्या मनात अन दोन्ही डोळ्यांत जाणवते आहे जिला प्रेमाने माझ्या डोळ्यांची ही व्यथा सांगेन. ‘ डोळ्यास पापण्यांचा का सांग भार व्हावा ‘ या डोळ्यांचा त्रास सहन करताना अजून तरी पापण्यांचा भार होत नाही, पापण्या मिटताच पौर्णिमेचा प्रफुल्लीत चंद्र समोर दिसतो हे त्यातल्या त्यात लाभलेले सुख निश्चितच आहे. थंडीचा सरता मौसम सुरू झालाय त्याची जाणिव ‘ धुंद आज डोळे हवा धुंद झाली ‘ भले धुरके असलेली पनवेलमधील सकाळ संध्याकाळ माझ्या डोळ्यांना नाईलाजाने धुंद करते हेच अप्रुप आहे ना.
‘ पापण्यांची तोरणं बांधून डोळ्यांवरती ‘ मी कसाबसा बाहेरचा सुंदर निसर्ग पहातो आहे जरी त्यातला हिरवाकंच ओलेपणा, ताजेपणा कमी दिसत असला तरी त्या हिरवाईतून आनंद शोधतो आहे. ‘ मी पाहतो मला का डोळे भरून आज, लागेल दृष्ट माझी पदरी लवेल लाज ‘ काय झालंय बरं माझ्या या डोळ्यांना? खरंच कुणाची दृष्ट लागली की आणखी काही घडलंय, बिघडलंय? याचा शोध लावायला पनवेलच्या ‘ लक्ष्मी आय क्लिनिक ‘ मधे डोळे तपासायला गेलो अन …………. होय, होय ………. माझ्या दोन्ही डोळ्यांना मोती बिंदू झालाय अन ऑपरेशन करायलाच हवंय हा लेखी रिपोर्ट माझ्या हातात पडला. ‘ उघडा डोळे पहा नीट ‘ असं नीट पहायचं असेल तर खिशातल्या लक्ष्मीला मुक्तपणे उधळल्या शिवाय चालणार नाही हे वास्तव कळताच आपसुकच माझ्या दोन्ही डोळ्यातून अश्रु ओघळलेच. रुमालानी टिपून मी मला कसंबसं सावरलं.
माझ्या मित्रांना मला हा कॅटरॅक्टचा त्रास होत आहे अन ऑपरेशन करून लेन्स लावणं अगदी गरजेचं आहे हे सांगितलं. मित्रच ते थोडी चेष्टा, थोडी टवाळकी करणारच ना? ‘ तुझ्या डोळ्यात संतापाचा अंगार फुलायचा ना, आता मोती बिंदू फुलतोय, काळजी घे स्वतःची अन लवकर ऑपरेट कर ‘ इति सुनिल देशपांडे. अहो त्या लाखा लाखांच्या लेन्स लाऊ नका बरं का, साध्या लेन्सही छान काम करतात. दोन लाख रुपये खर्च करून लेन्स लावणाऱ्यांना समोरून कपडे परिधान करून जाणारी माणसे काय उघडी नागडी दिसतात का? उगा अति खर्चाच्या भानगडीत पडू नका इति पुण्याचे संजू बाबा. आमचे पुण्याचे माजी प्राचार्य अप्पा वैद्य म्हणाले ‘अहो आता वय वाढले बऱ्याच जणांना मोती बिंदू होत असतो लवकर ऑपरेशन करा अन तुमच्या दृष्टीला बळ द्या ‘ काळजी करू नका सर्व काही ठिक होईल.
चला तर काय मोती बिंदू माझ्या डोळ्यांना छळतोय अन डोळे पुन्हा तंदुरुस्त करायला ऑपरेशन करायलाच हवे. माझ्या सूनबाईनी हा ऑपरेशन प्रोजेक्ट तिच्या हाती घेतला आहे अन लवकरच ऑपरेशन होईलही. आता प्रतीक्षा फक्त डोळ्यांच्या ऑपरेशनची आहे म्हणून म्हणावसं वाटतं की ‘ डोळे हे जुलमी गडे, वा नयन तुझे जादूगार’. आयुष्यात वेळोवेळी कॅरटस् खावूनही कॅटरॅक्ट कसा झाला ? हा प्रश्न मनांत रूंजी घालतो आहेच. असो…
कुणास ठाऊक या डोळ्यांच्या ऑपरेशन मुळे कदाचित मला जीवनाकडे पाहण्याची “नवी दृष्टी” मिळेल !

— लेखन : सुनिल चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800