Friday, March 14, 2025
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

“मिsयाव ,मिssयाव !

“मिsयाव, मिssयाव ! 😺की, मी येऊ?”

स्नेहल, नावासारखीच मृदु नि प्रसन्न वदना. माझी खास मैत्रिण, खरंतर ‘सख्खीच’ ! ☺️

तिच्या धाकट्या लेकाचं -निमिषचं परदेशगमन अगदी २ दिवसांवर आलंय. त्यालाच भेटायला म्हणून मी निघाले. स्नेहलचा हा धाकटा निमिष अन् सून नेहा म्हणजे अगदी गोड नि अनुरूप जोडी.

सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडले. हल्ली, जीवाच्या आकांताने कराव्या लागणारया कृतीत 😛 अर्थात् रिक्शाच्या शोधात अस्मादिक गर्क असतांनाच…
प्रचंड जोरजोराच्या ‘भुंकारा’ ने (कर्रेक्ट ! विरोधी पक्ष सूराच्या धर्तीवर😄) दचकायला झालं .
आणि….
रिक्शावाल्याकडून ‘होकार’ मिळवायच्या कामात चालत चालत आपण घराजवळच्या ‘PETS खाद्य’ दुकानापर्यंत पोचल्याची जाणीव झाली.

हल्ली, ही दुकानंही, (भुळुभुळु चालणाऱ्या ‘टू-व्हिलर’ गत) पटकन् केव्हाही लागायला लागलेयत. 🤨

‘मोठ्ठं घरै त्यांचं नि त्यांच्याकडे कुत्रा नि मनीमाऊ दोन्ही आहे बर्र का’!
माझ्या लहानपणी हे असं वाक्य म्हणजेऽऽ, आमचा ‘अॅाऽऽ’ 😲 होऊन जाई.
पाठच्या-पुढच्या कॅामन गॅलरयांची रेलचेल 🤓 असली तरी चाळीतल्या हॅाल कम बेडरूम नि छोट्ट्याशा कीचनवाल्या घरातलं साधं पण समाधानी असं बालपण आमचं !

‘बरोबर कुत्रा /मांजर घेऊन रहाता येईल असं मोठ्ठं घर, तेही मुंबैत😳’, असं ऐकलं की नवल वाटणारच नं !

चाळीतही एखाद् दुसरा माऊ किंवा भुभू प्रेमी असे पण…
‘Cat-food’, ‘Dog-food’ असल्या संकल्पना ऐकिवात नव्हत्या.

हल्ली, पहावं तर पाठीवरचं ओझं (संगणकीय हो🤓) सांभाळून कडेवर एकेक श्वान-मार्जार पिल्लू सांभाळणारी,
‘वेडिंग-बध्द’ झालेली आणि स्वतःचा ‘बेबी’ करायला टाईम नसलेली (😏) किंवा ‘लिव्हिंग रिलेशनात असणारी’
कपल्स ह्या शॅाप पाशी आढळतात.

‘हल्ली’ फार वेळा झालं नं ? पण ह्या ‘बदलांची संख्या, पोत आणि वेग‘ तिन्ही गोष्टी खरंच अंगावर येतात ‘हल्ली’ !🙂

विचारंच्या एवढ्या गदारोळातही, एकीकडे, पूर्वीच्या काळच्या उपवर कन्या जसा अनेकांकडून अपमानास्पद नकार पचवित असत तद्वत् ‘रिक्शा-नकार’ पचवत 🤓 जारी ठेवलेल्या माझ्या ‘शोधाला’ अखेरीस यश आलं👍 नि मी रिक्शात स्थानपन्न झाले.

‘अग्गं, काय सांगू गं ! 😔 तुला माहितीचै की त्यांच्या सब्जेक्टस् ना भारतात काही स्कोप नाही ह्या कारणास्तव मोठ्या लेकानं नि सूनेनं ‘परदेशातच वास्तव्याच्या निर्णयावर’ शिक्कामोर्तब केलं. माझ्या मनाला समजावत त्या निर्णयाचा मी आनंदाने स्विकार केला. काही दिवसांनंतर दोन्दोन पोस्ट ग्रॅड्युएशन डिग्र्या मिळवलेल्या महत्त्वाकांक्षी नेहालाही आणखी पुढच्या शिक्षणासाठी परदेशात ॲडमिशन मिळून गेली.’ मध्ये एकदा स्नेहलने मनमोकळेपणाने ह्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या.

‘अगं, आता नविनच घडामोड झालीये. निमिषच्याही जोरदार प्रयत्नांना यश येऊन, नेहाच्याच सिटीमध्ये त्याचा जॅाब फायनल झालाय. अर्थातच स्वारी खूष आहे. पण…. प्रवासासाठी करायला लागणारया सगळ्या फॅारमॅलिटीजमध्ये त्याची खूप धावपळ होतेय नि जोडीला माझीही ! नेहमीच्या वेळापत्रकाची तर एैशी की तैशी होऊन गेलेय. 😀 ह्या सगळ्यात तुला फोन करायचं राहून गेलं बघ.’

मी रिक्शात बसल्यावर, काल झालेल्या आम्हा दोघींच्या ह्या संवादाची मनातल्या मनात उजळणी झाली.

आईवडिलांच्या अकाली निधनानंतर मामा-मामीकडे स्नेहल लहानाची मोठी झाली. समजूतदारपणा बहुतेक स्नेहलच्या DNA मध्ये असावा नि परिस्थितीनुसार जुळवून घेणं अंगवळणीच पडून गेलं. शिवाय अव्याहतपणे सुहास्य-मुद्रा ☺️राखण्याचं कसबही मिळवलंय पठ्ठीनं ! 👍
मुलं-सूना ह्याबाबत स्नेहलने मनात रंगवलेल्या चित्रापेक्षा सगळं वेगळंच घडत होतं परंतु फोनवर बोलतांना तिचा स्वर बऱ्यापैकी शांत नि स्थिर होता. स्नेहलबद्दलच्या कौतुकभरल्या विचारात असतानाच इच्छित स्थळी मी पोचले देखिल.

“अर्रेऽऽ , काकू ये ये ! मस्त सरप्राईज दिलंस !
आई, बेडरूममध्ये आहे आज्जीच्या. आज्जीला औषध देतेय. येईलच बाहेर“

“मिऽयाव! मिऽऽयाव !”

“अरेच्चा ! माझ्यासाठीचा स्वागतपर आवाज 😀 येतोय पण मनीमाऊ दिसत तर नाहिये कुठे ? निमिष, खूप्पच धावपळ चाललेय नं सध्या तुझी ? नि जोरदार खरेदी झालेली दिसतेय. सहाजिकचै म्हणा. नि हे काssय ? हा पिंजरा का ठेवलाय इथे ?” “अगं , मनीमाऊला देखिल घेऊन चाललाय तो. नेहाची स्पेशल मागणी आहे” बेडरूममधून बाहेर येता येता स्नेहलनंच उत्तर दिलं.

“ॲाss माऊ पण येतेय बरोबर ?😲” ही बातमी म्हणजे माझ्यासाठी अंमळ धक्काच होता.

“तेच तर नं काकू ! मूळात मांजर नेता येईल का, त्याबाबतचे नियम, माऊचाही व्हिसा -त्याचे चार्जेस ..etc सगळ्याची माहिती मिळवणं नि ते सगळं नियमानुसार करणं ह्यात खूपच वेळ मोडला“

‘विशेष काही शैक्षणिक परिश्रम न घेताच 😉, माऊ ऐटीत परदेशी निघालंय म्हणजेss परदेशगमन योग काय जोरदार असेल नं ह्या प्राण्याच्या पत्रिकेत ? ज्याचं त्याचं आपापलं भाग्य असतं म्हणतात ते उगाच नै’☺️ अशा विचारात मी क्षणभर व्यग्र असतानाच, “मियाssव, मियाssव“ करत माऊने सोफ्यामागून बाहेर येऊन ‘कॅट वॅाक’ 😺 करत मोठी झोकात 😎 एण्ट्री घेतली.

“ह्या पिंजरयाचं देखिल ‘माप’ एअरलाईन्सच्या नियमाप्रमाणेच असायला हवं. शिवाय ‘मोशन -सिकनेस’ आणि अन्य औषधांची देखिल माहिती हवी. हे सगळं समजून घेण्यातही नाही म्हटलं तरी निमिषचा खूप वेळ गेला“ स्नेहलनं आणखी तपशील पुरवले.

“काकू, थांबतेयस नं तू थोडा वेळ ? आत्ता माऊला घेऊन दवाखान्यात जातोय. वॅक्सिन्स देण्यासाठीची आत्ताची अपॅाईंटमेंट मिळालेय. ती सर्टिफिकेट्स देखिल जवळ असावी लागतात“

“थांबते की ! तुझ्या आवडीचे होममेड तहान लाडू-भूक लाडू आणलेयत. ‘वजन-मर्यादेची’ कल्पना आहे मला. तरीही जमतील तेवढे नक्की ने हं बरोबर ! ह्या माऊच्या प्रयाणाबद्दल मात्र आत्ताच कळलं. नाहीतर ‘माऊ’लाही आणला असता खाऊ 😀”

“No way, काकू ! फक्त कॅट फूड च allowed आहे. चल, मी जाऊन येतो”

“मिऽयाव ! मिऽऽयाव !!” माऊचं आपलं ‘मला बघा , मला बघा’ चालूच ! 🙂

मी सहज गंमतीत म्हणून दिलेली माऊच्या खाऊची ॲाफर एकदम सिरियसली 🤓निकालात काढून, पायात घोटाळणारया माऊला घेऊन निमिष घराबाहेर पडला.

“ मी कॅाफी करते पटकन् ! सकाळपासूनच्या पहिल्या कामानंतर छानसा वाफाळलेला ब्रेकही होईल. ☺️ तोवर हवं तर तू सासूबाईंना हाक मारून ये, ठीकै ?” असं म्हणत स्नेहल कीचनकडे नि मी बेडरूमकडे वळले.

“आहाऽऽ, स्नेहल ! मस्त झालेय कॅाफी !!! माफक गोड नि परफेक्ट स्ट्रॅान्ग ! मागच्या वेळेपेक्षा थोडा थकवा वाटला सासूबाईंच्या चेहऱ्यावर पण स्वर अजून तरतरीत आहे गं !“

“हुंऽ ! देवकृपेने त्यांना मधुमेह, बीपी असा काही त्रास नाही. नव्वदीच्या जवळ आल्यायत म्हणजे वयानुसार येणारा थकवा जाणवतो चेहऱ्यावर हे मात्र खरंय ! आणि ‘स्वर’ म्हणशील तर शिक्षकी पेशातून निवृत्त होईपर्यंत केलेल्या कामामुळे मिळवलेला खास ‘टीचर-स्वर’ आहे तो 😀”

“सासूबाईंनी नोकरी सोडणार नाही म्हटल्यावर घरीच रहाण्याचं मान्य करून इतकं सगळं निगुतीनं करणारी तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजेऽऽ स्नेहल, खरंच लकी आहेत त्या ! आता निमिष-नेहा चे काय प्लॅन्स आहेत ? नेहाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत भारतात येणार की कसं ??”

“तू म्हणतेयस ते ऐकायला छान वाटतंय. ☺️पण…..
‘सूनेचं कर्तव्यच आहे ते’ अशी मानसिकता असलेल्या पिढीतल्या सासूबाईंच्याकडून हे ‘मौक्तिक बोल’ मला लाभणं विरळाच गं ! आणि …
पुढच्या प्रश्नांबद्दल म्हणशील तर… ह्या पुढच्या पिढीच्या अनेक खासियती आहेत !!
भविष्यातल्या ‘बेतांबद्दल’ बोलणं अगदीच ‘बेतशीर’ ही त्यातली ठळक खासियत. घरात केव्हा असणारेत हे घरातल्यांनाच माहिती नसणं हे तसं कॅामनच 😀! हां , पण …..
आता देशांतराचं ठरल्यानंतर मात्र अगदी पूर्ण माहिती मिळाली बर्रका ! पुनरागमनाबद्दल मात्र ‘काय माहित ?😲’ ह्या स्टेज मध्येच आहे मी. तंत्रज्ञान शिकून घेण्याचं आव्हान आहेचै पण ही मागल्या नि पुढल्या पिढीची सगळी तंत्रं सांभाळण्याचंही तंत्र मला बघता बघता अवगत झालंय. 👍 आता वयाच्या ह्या टप्प्यापर्यंत आल्यावर ‘ मनासारखं होईलच असं नाही’ हे माझ्या आयुष्याचं ‘तंत्र’ देखिल चांगलंच समजून चुकलंय.
‘निमिष- नेहा’ एकत्र असणारेत ही नक्कीच खुशीची बाब आहे. कोणत्याही पिढीतल्या आईला अजून काय हवंय, नाही का ? हां, पण ‘माऊ’ मात्र नक्कीच ‘लकी’ आहे हं ! त्यानिमित्ताने ‘मार्जार परदेश प्रवासाबद्दलचे नियम व अटी आपोआप घरबसल्या कळल्यामुळे मी देखिल ‘लकी’ आहे असं म्हणायला हरकत नाही.”😃

बोलता बोलता कॅाफी-मग्ज् ठेवायला म्हणून स्नेहल कीचनकडे वळली. माझं लक्ष घड्याळाकडे गेलं.

“स्नेहल, बरेच वाजले गं ! निमिषचं काम व्हायला वेळ मोडतोय बहुतेक ! ‘थांबते‘ असं म्हटलं खरं निमिषला, पण आता निघायला हवं. निमिष निघायच्या दिवशी ‘शुभेच्छा’ द्यायला फोन करीनच. तू ये आता नंतर निवांत एकदा माझ्याकडे, काऽऽय ?”

“सासूबाईंना एकटं सोडून माझं निवांतपणे येणं तसं अवघड आहे. तूच नंतर एकदा सावकाशीनं ये. निमिषला उशीर झालाय खरा. आताशा पेटस् डॅाक्टरांकडेही गर्दी असते अशी माहिती निमिषकडूनच कळलेय मला. तिथेही स्पेशालिस्टस् असतात अशी देखिल माहिती मिळालेय. हल्ली अनेक बाबतीत सगळंच ‘स्पेशल’ होऊन गेलंय न् काय ! ‘बाळा’ चा चान्स घ्यायचा म्हटला तर ‘अशक्य’ म्हणणारी कपल्स दोन् दोन पेटस् सांभाळतानाही आढळतात. ‘हे स्पेशलच नव्हे का ? काय बोलावं गं !😷”

स्नेहलचा शांत वावर, स्वतःच्या नवरयाच्या पश्चात् सासूबाईंना निगुतीनं सांभाळणं नि ते आपल्यालाच करायचंय हे समजूतदारपणे स्वीकारणं, सूनांच्या रूपात मुलींचा उत्साही वावर घरात होईल-नवपिढीच्या सहवासात रहाता येईल ह्या नॅचरल कल्पनांचा भंग साहवणं, ….सगळ्याच गोष्टींनी अंतर्मुख केलं मला.

‘मिऽऽयाव’ माऊच्या भाग्याचा हेवा न करता, स्वतःच्या डोळ्यातलं ‘मी येऊ’ लपवत, हसतमुखाने ‘मी देखिल लकी आहेच की’ म्हणणारया स्नेहलला मी मनोमन दंडवत घातला. 👏

तिच्या घरून बाहेर पडतांना ह्या सगळ्या विचारांचा ‘हल्लीच्या बदलां’ मध्ये तात्पुरता समावेश (नाईलाजाने) केला नि परतीच्या प्रवासासाठी रिक्षाचा शोध सुरू केला.

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित