“दाद”
टाळ्यांच्या मोबदल्यात कविता सादर करणारे अनेक कवी आहेत. टाळ्यांनी दिलेली ही दाद त्यांना प्रोत्साहित करत असते, बस्स टाळ्या मिळाल्या की त्यात आनंद असतो अन तो आनंद भरपूर सुख समाधान देऊन जातो. दाद देणे, दाद घेणे, दाद मिळवणे हे खरंच कसब आहे.
दांडगा अनुभव व कसून सराव केला तर दाद देण्याचा छानसा अनुभव गाठीशी जमा करता येतो. दांडगाईने सुद्धा दाद देण्याचा प्रकार गुंडशाही करणाऱ्या गुंडाच्यात प्रामुख्याने आढळतो. दात चावत चावत दाद देणारे, गुटखा खाऊन मळकट झालेले दात दाखवत, दात ओठ सुद्धा खाताना दिसतात. काही जण तर दात दाखवून वा दात विचकून दाद देतात, त्यांचा तो प्रतिसाद अगदी बघण्यासारखा असतो.
दानधर्म, दान दिल्यावर मिळणारी दाद ही पवित्र असते. कधी कधी दान द्यायला छदाम सुद्धा मोजावा लागत नाही. खिसा रिकामा असला तरी दोन्ही खिसे भरभरून दाद देता येते अन् ती खरंच कौतुकास्पदच म्हटली पाहिजे. असा दानशूरपणा मुळी स्वभावातच असायला हवा त्यालाच अशी दाद देता येते, हे ही तितकंच खरं. दावणीला बांधलंय म्हणून दिली दाद असा दावा करणारे तुरळक का होईना असतातच की !
दाहक दाद देणारे काही दाक्षिणात्य असतात त्यांच्या उड्या मारण्यातून जो दाह उत्पन्न होतो ती त्यांच्यामते उत्कृष्ठ दाद असते. असतात एकेकांच्या दाद देण्याच्या वेगवेगळ्या प्रथा ! नुसती दिखावु दाद देऊन दाद दिल्याचा दिखावा करण्यासाठी अंगी दिग्गज अभिनय गुण असावेच लागतात, हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे.
दिनमान पाहून दाद देणारे असतात काही जण. पौर्णिमा असेल तर प्रफूल्लीत चेहऱ्याने छान चंद्रासारखी दाद देतात. तर, अमावास्या असली तर आधिच थोडा काळा असणारा त्याचे तोंड काळे करून कशीबशी दाद देतो, हे त्या त्या दिवसावर अवलंबून असते.
दिलदारपणा ज्याच्या ठायी भरलेला आहे तो दिलखुलास, दिलखेचक दाद आपसुकच देत असतो. मग दिवस असो वा रात्र तो काळ वेळ पहात नाही. ‘दिवास्वप्नं पहाणारे रात्री स्वप्नांत दाद छान देतात’ असं कुठंतरी वाचल्याचं आठवतंय.
दिवाळखोर झालेले खोऱ्यांनी दाद देतात त्यांचं आता जायचं काही शिल्लकच राहिलेलं नसतं ना !
दिशाहीन माणूस दाद देताना दाही दिशांना टाळ्या वाजवून दाद देतो तेव्हाच त्याचं समाधान होतं. एका टाळीवर त्याचं भागत नाही ,दहा टाळ्या वाजवतो.
दाद फिर्याद हे दोन शब्द एकत्र जोडून जेंव्हा येतात ना, तेंव्हा उगाचच चुकचुकल्यासारखे का वाटते समजत नाही. ‘शहाण्या माणसाने न्यायालयाची पायरी कधी चढू नये’ या उक्तीची उगाचच आठवण होते. दुखवट्याच्या कार्यक्रमातही दाद दिली पाहिजे असा समज असणारे त्याही कार्यक्रमाला वेगळीच दाद देत असतात, असो.
माझे पुण्याचे कवीवर्य मित्र अप्पासाहेब वैद्य पुर्वी गणपती उत्सवामधे मनोरंजन कार्यक्रमात कविता सादर करायचे. अशाच एका कार्यक्रमामधे कार्यक्रम संपल्यावर एका आजीने त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. पुढील कार्यक्रमाला जाण्याच्या घाईत असलेल्या अप्पांनी त्यांना भेटायचे ठरवले आणि ते तिच्यासमोर जाऊन उभे राहिले तरी त्या आजी काही बोलेनात. आजी, तुमच्या समोर ते कवी उभे आहेत असे सांगितल्यावर त्या म्हणाला मला कुठे दिसतंय रे मी आंधळी आहे असं म्हणून त्या आजींनी अप्पांचा हात हातात घेतला व दुसरा हात डोईवर फिरवत फिरवत त्या म्हणाल्या, ‘छान कविता सादर केलीस हं, यशवंत हो’ हा आशिर्वाद दिला, ही खरी दाद.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पंडित भीमसेन जोशींचा कार्यक्रम सुरू होता. ते मालकंस राग आळवित होते. श्रोते तल्लीन होऊन गायनाचा रसस्वाद घेत होते. इतक्यात श्रोत्यांमधे बसलेले आबासाहेब मुजुमदार स्टेजवर गेले व गायनात दंग असलेल्या पंडीतजीना आबासाहेबांनी त्यांच्या बोटात असलेली सोन्याची अंगठी काढून पंडीतजींना बहाल केली………. ही खरी दाद.
“शायरी ऐकून माझी
नाही म्हणालीस ‘वाहवा’
पाहून श्रोता मी म्हणालो
“वाहवा रे वाहवा”

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800