“कित्ता”
खरं तर मला प्रश्न पडायचा की कुठल्या यत्तेपासून आपण कित्ता गिरवला पाहिजे ? कळण्याचे तसे वय नव्हते तेंव्हा बालवाडीत अडकित्ते बाई शिकवायला होत्या. परंतु त्यांचा कित्ता गिरवणे हे त्या बाल मनाला रुचले नाही. कारणे काहीही असोत!
पण …………. कॉलेजमध्ये असताना वृत्तपत्र वाचायची आवड निर्माण झाली. त्यामुळे कित्ता गिरवावी अशी अनेक व्यक्तिमत्वे रोजच भेटू लागली.
पण मनांत संभ्रमावस्था निर्माण झाली ! मग अशा मंडळींचा तक्ताच बनवला. त्यातही खूप खस्ता खाल्या. काही महाभाग, महानग तर असे भेटले की “भीक नको पण कुत्ता आवर” अशी परिस्थिती निर्माण झाली.
व्यवसायात जेंव्हा उभा रहायचं ठरवलं तेंव्हा सत्ता, मालमत्ता कशी वाढवता येईल ? असा कोण की ज्याचा कित्ता मला गिरवता येईल, त्यांचाही शोध घेणे सुरू केले. प्रवास खर्चाचा भत्ता अधिक अधिक कसा पदरात पाडून घेता येईल म्हणून धनदांडगे राजकारणी यांचा सहवासही जोडला. तिथेही धास्तावून त्यांचा कित्ता गिरवायचा नाही, हे भ्रष्टाचारी संस्कार मुळीच नकोत, हे ठाम पक्का ठरवून टाकलं. पोतंभर साखर नकोच मिळालेला एक बत्तासाच पुरेसा आहे, त्यावरच समाधान मानलं.
आत्ता आत्ता त्र्याहात्तर वर्षांचा झाल्यावर आत्मा दत्ता असे काही राम सहवासात आले जणूं त्यांनीच मक्ता घेतलाय असे ते वागू लागले. काय करावं बरं ? पुन्हां प्रश्न पडला. कुणाच्या पावलांवर पाऊल टाकून वाटचाल करावी की आपणच आपल्या पावलांचा ठसा इतरांसाठी उमटवून ठेवावा ? तशी आपल्या चौखुर ग्रुपमधे कित्ता गिरवावी अशी बरीच नामांकित मंडळी हजर आहेत. मनांत विचार आहे जसे तीन तीन महिने ॲडमिन पद स्विकारतो तसेच त्यातल्या काहींचा तीन तीन महिने कित्ता गिरवावा आणि सफल समृद्ध व्हावे असं म्हंतो मी. एकच विनंती आहे माझा पत्ता मात्र कट्ट करू नका, हो कित्ता गिरवायची संधी हुकायला नको.
अगदी मनापासून खरं सांगायचं तर माझे आजोबा कै. भिकाजी चिटणीस हे निष्णात वैद्य होते तसेच उत्तम साहित्यिक होते. ते दत्तगुरुंचे परम भक्त होते. पंचावन्न साठ वर्षांपूर्वी त्यांनी अनेक सुंदर अभंगांची निर्मिती केली होती. सध्या मी कविता, लेख लिहून साहित्य निर्मिती करीत आहे. हा त्यांचा साहित्यिक कित्ता गिरवण्याचे सुंदर काम करीत आहे, त्यातच मी खूप समाधानी आहे. तसेच माझे वडील कै. शरद तथा बाप्पासाहेब चिटणीस यांनी रुजविलेला संस्कार व दिलेला गुरुमंत्र म्हणजे ‘ तुझ्यामुळे इतरांचं एक रुपयाचंही नुकसान होता कामा नये भले तुझे दोन रुपये गेले तरी चालतील आणि दुसरं म्हणजे तू तुझ्या आयुष्यात असा वाग की सगळीकडे मान ताठ उंच करून बिनदिक्कत चालता आलं पाहिजे. हे संस्कार आणि हा आदर्श याचा कित्ता गिरवणं सुरू आहे अन् अखेरच्या श्वासापर्यंत हाच कित्ता नक्कीच गिरवत रहाणार आहे. त्यातच आनंदीआनंद सामावलेला आहे.!

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कुणाचा कित्ता गिरवावा हे ठरवण्यात उभ आयुष्य निघून जातं आणि शेवटी फक्त गोंधळ उरतो. पण आपला हीरो कसा शोधावा हे आपण अत्यंत सोप्या आणि अत्यंत रंजकतेने सांगितल आहे.
मनःपूर्वक अभिनंदन