Thursday, September 4, 2025
Homeलेखहलकं फुलकं

हलकं फुलकं

कबुतर, जा जा जा…

नाना रंग नाना ढंग, कबुतरांचा आगळाच तरंग. मोर, कावळा, चिमणी या पक्षांना जन्म देतांनाच परमेश्वरानी कबुतरांनाही जन्म दिला. वेगळी रचना, वेगळी ठेवण, वेगळी ढब, आवाजाचा गुटुरगुम्म दिला.परंतु चिमुकल्या बालकांच्या विश्वात जसं मोर, कावळा, चिमणी यांना त्यांच्या आवडीच्या हक्काचं आपापलं स्थान मिळालं, त्यापासून मात्र कबुतर वंचितच राहिलं.

परमेश्वरानी कबुतराला अगदीच काही वंचित ठेवले नाही. ‘पारधी आणि मुंगी’ या कथेत कबुतरानी मुंगीला मदत करून पाण्यातून वाचवलं अन कबुतराची शिकार करणाऱ्या पारध्याला कडकडून चावा घेऊन कबुतराला मुंगीने वाचवलं ही कथा आहे. एक घास चिऊचा एक घास काऊचा असा तो घास मात्र कबुतरांच्या नशिबात नव्हता हे त्या कबुतरांचे दुर्दैव्य ! कभी कभी ऐसा भी होता है।

कावळा, चिमणी स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी अगदी रोज नाही तरी आंघोळ करतात, पण कबुतराला आंघोळ करायचा जन्मतःच कंटाळा. आळस इतका की तो कधीच आंघोळ करत नाही.

असं म्हटलं जातं की प्रत्येक वनस्पती प्राणी पक्षी यांचा आयुर्वेदिक काही ना काही उपयोग असतो ते भाग्य कबुतराच्या भाग्यात आले पण कसे ? एका आयुर्वेदाचार्याने दोन तीन वर्ष अंगावर ठाण मांडून बसलेला, मुरलेला अर्धांग वाताचा रोग शुभ्र पांढऱ्या रंगाच्या दोन जोडया (नर व मादी) आणून त्यांची मुंडकी कापून रक्ताची धार त्या रोग्याच्या मस्तकावर थापटली अन अर्धांगवायूचा तो रोगी पंधरा दिवसात चक्क बरा झाला. हे मी कुठेतरी वाचल्याचे आठवतंय.

कपोल म्हणजे कबुतर. त्यावरून का बरं कपोलकल्पित गोष्टी असा शब्द आला असेल ? हा प्रश्न मला पडतो. काय बरं साम्य असावं ? कबुतराला ‘पाखरू’ असंही म्हटलं जातं, माणसांमधेही पाखरू हेरायचा, गटवायचा, पटवायचा, काबिज करायचा, उपभोगायचा हे गुण आहेतच की ! तसेच नर कबुतर अनेक माद्या पटकावतो. गिर्रेबाज हरकती, चमचमणारा गळा फुगवून गुटुर्रघुम्म गुटुर्रघुम्म आवाज करत नर प्रणयलीला करत असतो त्या अगम्य लीलाच वाटतात. तो नजारा अतिसुंदर नजारा असतो जणूं असा की आपणच मुरक्या माराव्यात. त्यांचे वादविवाद, संवाद परिसंवाद, साद प्रतिसाद, जाणिवा नेणिवा, अगदी माणसाच्या विवाहित जोडप्यासारखेच असतात, तसूभरही फरक शोधून सापडायचा नाही. फक्त त्यांचं घुम्म होणं आणि माणसांचं घुमणं यातच काय तो फरक असतो. तो ही एक जीव आहे आपणही एक जीव आहोत प्रेम लगट करण्याची उचंबळता स्पर्शाची लाडीगोडी फक्त वेगळी आहे.

असंख्य संख्येनी असणारे जिकडे तिकडे, चौकाचौकात उभे असलेले पुतळे (खरं तर आता पुतळे उभारायला जागाच शिल्लक नाही) पाहिले तर कबुतरांनी शिटून पांढरे फटक पडलेले असतात. इतके विद्रुप होतात की महात्मा गांधींचा पुतळा कोणता ? अन् विवेकानंदांचा पुतळा कोणता ? हे ओळखणं कठीणच व्हावं.

पस्तीस असो वा पन्नास मजल्यांचा टॉवर असो, कबुतरांना उंचीचे मुळीच वावगे नाही. त्यामुळे पन्नासाव्या मजल्यावरच्या बालकनीतही ते सुखनैव संसार थाटू शकतात. त्यांचं कौतुक करावं, की ते इतकी घाण करून ठेवतात म्हणून तिरस्कार ?

कबुतरांच्या अंगातून बारीक मळ हवेत उडत असतो. त्यांची विष्ठा इमारतीमधे साचून कुजत रहाते. त्यातून ज्या ज्या जंतूंची निर्मिती होते ते ती मनुष्य प्राण्याला फारच घातक आहे. ब्रँकॉयटिस, धाप लागणे, अस्थम्याचा विकार नव्याने सुरू होणे हे विकार तर उदभवतातच परंतु त्यांच्या अंगावरील मळाच्या कणांचा मानवी शरिराशी संपर्क झाला की कातडीचे कित्येक रोग माणसांना होतात. मुंबईतील चुनाभट्टी ही त्या जीवंत ज्वलंत अशा रोगराईंची भट्टीच आहे.

पुर्वीच्या काळात काही हजारांची संख्या असणारी कबुतरे काही कोटींच्या घरात जाऊन पोचली आहेत. (नीरव मोदींसारखा कोटींचा माल हडपून परदेशी पलायन करायचे या कबुतरांना जेंव्हा सुचेल तो भारतीयांसाठी सुदिन ठरेल !)

या कबुतरांपासून रोगराईचा प्रचंड मोठा धोका निर्माण झालाय. आज या कबुतरांना जगवावे की मारावे हा मदनबाणाएवढा ज्वलंत धगधगता प्रश्न आपल्या समोर उभा आहे. केवळ कबुतरखाने बंद करून वा त्यांचा अन्न पुरवठा बंद करून ही अवाढव्य समस्या सुटणार नाहीये. आपल्या आसपास असणाऱ्या इतर देशांमधे अशा अति उपद्रवी प्राणी, पक्षांचे काय करतात ? ते पाहिले पाहिजे. प्राणिप्रेमींचे प्रेम अति उतू न जाता पर्यावरण समतोलतेचा अभ्यास करूनच त्यावर मतमांडणी करायला हवी. कोणाचाही बळी घ्यायचा हे सुसंकृतपणाचे लक्षण मुळीच नाही परंतु असंस्कृतपणे या कबुतरांपासून होणारे अति खर्चिक रोगही दूर ठेवलेच पाहिजेत ना ?

आज भारताची लोकसंख्या दिडशे कोटी आहे. कबुतरे ज्या संख्येने रोज पैदास करत आहेत त्याने एक दिवस असा येईल की त्यांची संख्या तीनशे कोटी होईल आपण योग्य वेळीच उपाययोजना केली नाही तर ‘भीक नको पण कबुतर आवर’ याहीपेक्षा वाईट अवस्था होऊन आपणा सर्वांना प्रचंड पश्चाताप होईल.

शांती भंग करणारा हा मदनाचा पारवा (जरी अंगाला झोंबतो गारवा) कपोल, गिर्रेबाज, कबुतरे, अनेक रोगांच्या खाईत लोटणारी ही ‘रोगरंगी, मरणरंगी कबुतरे’ झाली आहेत. भले ते शांतीदूत म्हणून जरी प्रसिद्धि पावलेले असले तरी तरी आज आपल्याच अस्तित्वाच्या शांतीची शांतीच भंग पावलेली आहे. ‘वेळीच घातलेला एक टाका नऊ टाके वाचवतो’ त्याप्रमाणे आजच एक टाका असा घालून कायमचा बंदोबस्त कसा होईल हे जरूर पाहिले पाहिजे. गुटुर्रघुम्म गुटुर्रघुम्म अन त्यांची ही फडफड वेळीच आटोक्यात आणली पाहिजे. माणसांचा जीव महत्वाचा की कबुतरांचा ? यावर नवकीच सखोल विचार करायलाच हवा.

सुनील चिटणीस

— लेखन : सुनील चिटणीस.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on मिलेनियम टॉवर्स सह्याद्री गणपती : युवकांचा पुढाकार
Nitin Manohar Pradhan on हलकं फुलकं
जयश्री चौधरी on श्री गणेश : ४
श्री सुहास नारायण चांदोरकर, माणगाव रायगड on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !