“न पचलेली बाकरवडी…”😃
त्या बाकरवाडीला सुरुवातीपासूनच नाट लागला होता.
मार्केटमध्ये बाकरवाडी खरेदीला जायचं म्हणून बायकोनं एकदम छान आवरलं.
माझं नशीब फुटकं म्हणावं की त्या टू व्हीलरच नशीब चांगल म्हणावं,
आम्ही गाडीवर बसून सोसायटीतून निघणार तेवढ्यात गाडीतलं पेट्रोलच संपलं, नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न, तसं बाकरवडीच्या खरेदीला बारा विघ्न अशी सुरुवात झाली.
एखाद्या सिंहासनावरून खाली पाय उतार झाल्यासारखे नाराजीचे भाव बायकोच्या चेहऱ्यावर गाडीवरून खाली उतरतांना दिसले. एक वेळ मी गाडीवरून पडलो असतो तर चाललं असतं, पण हे पेट्रोल संपायला नको होतं हा विचार माझ्या मनात एक्सीडेंटली आला. तिला नाईलाजाने गाडीवरून खाली उतरावं लागलं . यात माझ्या भाषेत माझी काही चुक नव्हती, पण बायकोच्या भाषेत माझी चूक होती. रागाचा बंब आता पेटणार होता.
सोसायटीतल्या लोकांच तर विचारू नका, बाहेर कट्ट्यावर बसलेल्या एका वयस्थ गृहस्थाने हातात घेतलेली तंबाखू मळता मळता थांबवली आणि आमच्या सगळ्या प्रकाराकडे तो बघत होता. सगळ्या लोकांसमोरून पेट्रोल पंपापर्यंत मला गाडी ढकलत नेण्याच्या त्रासाच इतकं दुःख वाटलं नाही, इतकं दुःख मला बायकोच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
सगळे लोक आमच्याकडे अशा नजरेने बघत होते, जसे काय आम्ही कुणाची गाडीच चोरून घेऊन चाललोय. त्यातील काही जण तर चक्क आमच्याकडे संशयित नजरेने बघत होती. गाडी हातात घेऊन चाललेला माणूस लोकांना एकदम जगावेगळा का वाटतो हेच कळत नाही.?
गाडीवर चाललेल्या माणसापेक्षा गाडी हातात घेऊन चाललेल्या माणसाकडे सगळे लोक बघतात त्याचं काय कारण असावं ? हे त्या सगळ्या बघणाऱ्यांना विचारावं अस वाटलं.
प्रत्येक ठिकाणी फुकटचे प्रश्न विचारणारे भरपूर लोक असतात.
त्यातल्या एकाने मला विचारलेच,
“काय गाडी बंद पडली का”?
“छे हो, पेट्रोल संपलंय.” ओळख ना पाळख त्याने मला प्रश्न विचारला.
“मला वाटलं का बंद पडली.” समोरच रस्त्याच्या बाजूला गॅरेज आहे, आपल्याच साडूच आहे. त्या गृहस्थाने दोन मिनिटात त्याच्या साडूच्या गॅरेज ची जाहिरात करून टाकली. दुसऱ्याच्या संकटात कशी साडूच्या व्यवसायाची संधी शोधायची हे त्या संधीसाधू काकांना चांगलं ठाऊक होतं.
“तुम्हाला आधी बघता नाही आलं का”? हा ज्योतिषी प्रश्न तिने मला गाडीवरून खाली उतरताच विचारला.
“मला आधी समजलं असतं तर ती गाडीच बंद पडली नसती आणि कित्येक गोष्टी मी टाळल्या असत्या.” असं मी मनातल्या मनात बोललो.
एक तर गाडीचा पेट्रोल लेवल दाखवणारा काटा कित्येक दिवसापासून झोपला होता म्हणजे सरळ आडवाच झाला होता.
पुढे पंपावर पेट्रोल भरून आम्ही कसंतरी शहरात पोहोचलो.
अगदी पुण्यात गेल्यानंतर चितळेंची बाकरवडी घ्यायची की पितळेची याच्यावरूनच माझ्यात आणि बायकोत वाद झाला.
शेवटी नेहमीप्रमाणे मी माघार घेतली आणि आम्ही चितळेच्या दुकानाजवळ पोहोचलो.
नेमक तेव्हा सुद्धा घड्याळाने एक वाजून पाच मिनिटे वेळ दाखवली आणि आमच्या वादाचा पुन्हा अलार्म वाजवला.
दुकानाच्या बाहेरच आम्हाला सेक्युरिटी ने थांबवले.
“अहो, अहो, कुठे चाललात”?
खुर्चीवर अगदी पाय ताणून तो अर्धा झोपला होता.
“अहो, बाकरवडी घ्यायचीय.”
“नाही, नाही, आता शक्य नाही.” तोंडातला पान मसाला खालीवर करत त्याने मला बोर्ड दाखवला.
“1 ते 4 बंद……”
“या वेळात काहीही मागू नये, ही आमची झोपण्याची वेळ आहे, आता ह्या वेळेत आम्ही का झोपतो हा प्रश्न विचारू नये.”
अशी भलीमोठी पाटी त्या एक ते चार बंदच्या बोर्ड खाली लटकवलेली होती. पुण्यात हे मात्र भारी आहे, तिथं एका पाटीसाठी दुसरी पाटी तयार असते.
मला एक कळत नाही, ही लोकं आराम करायच्या वेळात सगळ्या बाकरवड्या जवळ घेऊन झोपतात की काय ? एखादा माणूस गल्ल्यावर ठेवायला काय हरकत आहे ? बहुदा हे सगळे एकाच वेळी झोपत असावीत. झोपाळू कुठले ? मला खूप राग आला. हे सगळं तुमच्यामुळे झालं. बायकोने संधी मिळताच पुन्हा ते खापर माझ्या डोक्यात फोडलं.
“बाहेर भांडणामध्ये दहा मिनिटे घातले नसते तर आता आपल्याला बाकरवडी मिळाली नसती का”? असा लॉजिकल प्रश्न तिने मला इलॉजिकलपणे विचारला.
खर तर तिने मला तो दहा मिनिटांचा हिशोब सांगितला होता.
मला अजून पर्यंत एक गोष्ट कळली नाही की काहीही झालं तरी शेवटी चूक माझीच का असते ?
परवा मी दुधाच्या दोन बॅग घेऊन आलो, ती दूध तापवायला गेली आणि ते नासलं, ते दूध तुमच्यामुळेच नासलं. तुम्हाला चांगल्या बॅग बघून आणता आल्या नाही का ? असा प्रश्न तिने मला विचारला.
आता दुधाची बॅग आणायला गेल्यानंतर मी अगदी अगोदर बायकोच्या भीतीने तारीख वगैरे बघून घेतो, इतकी काळजी घेऊन सुद्धा पुन्हा माझीच चूक दाखवल्याने माझ डोकंच काम करेनास झालं.
तुम्हाला सांगतो ही जी परिस्थिती असते ना ही खूप भयानक असते.
तुम्ही जे काही करणार, ते आधीच सगळं चुकीचं असतं.
मात्र तिच्याकडून काही चुका झाल्या तर मात्र तीच स्पष्टीकरण तयार असतं.
कालचीच गोष्ट, रात्री तिच्याकडून दोन चपात्या जळाल्या आणि त्या नेमक्या माझ्या ताटात आल्या.
मी विचारावं की नाही यावर खूप विचार केला.
कारण अशावेळी तुम्ही काही विचारण हा सुद्धा गुन्हा असतो.
“अरे,या पोळ्या जळाल्या वाटतं “? मी आपलं अगदी अचानक बघितल्या सारखं दाखवलं.
तिचं मात्र उत्तर भन्नाट होतं,
“त्या जळाल्या नाही, तो पोळ्यांचा तवा बदलावा लागेल. तवा खराब झालाय.”
असाच मी जॉब वर असतांना मी केलेली चपाती कित्येक दिवसांनी टम्म फुगली होती, मी तिचा फोटो काढला आणि टाकला तिला,
खाली विचारलं “कशी झाली चपाती.”?
तिचा रिप्लाय आला,
ठीक आहे, पण तवा किती काळा केलाय…?
म्हणजे काहीही झालं तरी सगळे निर्णय ह्यांच्याकडे राखीव असतात.
“तुमच्यामुळे आता तीन तास थांबावं लागेल.” बायको आता नाराज झाली होती. असेही त्यांना नाराज व्हायला काही लागत नाही.
“घरातून निघतांना कोणाचा तोंड पाहिलं काय माहिती”? तिचा हा डायलॉग माझ्यासाठीच होता. मी मात्र माझं तोंड घेऊन तिच्याकडे बघत होतो.
“आता तूच आठव, कुणाचं तोंड बघितल ?”. मी रागात म्हणालो.
‘अहो दुसरं कोणाचे बघणार? तुमचच बघितलं होतं.” तीने सरळ मला हे तोंडावरच सांगितलं. हे ऐकून मात्र माझ तोंड पडलं. माझा झालेला अपमान आजूबाजूला कोणी ऐकतंय का हे मी नजर फिरवून बघितलं, आमच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. बाजूच्या खुर्चीवर त्या सिक्युरिटी गार्डला डुलकी लागली होती.
शेवटी ते तीन तास असेच मार्केटमध्ये भटक्या श्वान नावाच्या प्राण्यासारखे फिरवून आम्ही चार वाजता बाकरवडी घ्यायला परत आलो.
मला बाकरवडी मोरोक्कोला न्यायची होती. मोरोककोला मी पहिल्यांदा चाललो होतो. हा माझा आयुष्यातील पहिला विमान प्रवास होता.
बाकरवडी खूप आवडते म्हणून बायकोने आठ दहा पाकीट घेतले.
मी तिला म्हणालो, “अग इतकी पाकीट नको घेऊ.”
तिने मला सांगितलं, “राहू द्या बाकरवडी संपली की मग तुम्हाला खूप आठवण येते आणि मग रोज फोनवर ऐकावं लागेल.” आम्ही बाकरवडी घेऊन घरी आलो. बाकरवडीचा दुकानापासून घरापर्यंत एक प्रवास संपला होता.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी भरलेल्या बॅगा गाडीच्या डिक्कीत टाकून आम्ही सोसायटीच्या बाहेर निघालो. तेवढ्यात बायकोने ड्रायव्हरला हात करत सांगितले, “अहो, थांबा…थांबा… थांबा…”
मी म्हटलं, “आता काय राहिलं.”?
सर्व बॅग तर भरल्या होत्या.
नेमकी बाकरवडीची पाकीट घरातच राहिली होती. बॅगा भरताना सगळं सामान भरलं आणि हे बाकरवडीचे पाकीट टाकायचेच राहिले. ते तसेच फ्रिज वर राहिले होते.
ही बाकरवडी अजून काय काय कारनामे करणार होती हेच कळत नव्हतं.
पुन्हा आम्ही गाडी मागे फिरवली, पुन्हा वरती जाऊन दरवाजा उघडला, एवढ्यात समोरच्या काकू बाहेर आल्या…
त्यांनी एकदम आश्चर्यचकित होऊन विचारलं, “अहो, तुम्ही निघाला होता ना ? मग परत आलात”.?
हे परत येणं सुद्धा काकूंना प्रश्न विचारायला पुरेस होतं.
मी पाकीट घेऊन पुन्हा खाली आलो आणि आमची गाडी शेवटी मुंबईला निघाली.
एअरपोर्टला पोहोचल्यानंतर तिथली भयानक गर्दी पाहून मी तर घाबरून गेलो. तसा हा माझा पहिलाच विमान प्रवास होता.
पहिला प्रवास म्हणजे डोळे असून आंधळ्यासारख..!!
विमानाच्या प्रवासाची कोणतीच गोष्ट माहित नव्हती, आणि सगळ्या गोष्टी आपल्यासमोर पहिल्यांदा घडत असतात.
एअरपोर्ट मधून आत मध्ये एन्ट्री केली आणि पुढचा प्रश्न पडला आता काय करायचं…?
मग कसतरी आजूबाजूला जो भेटेल त्याला विचारून एकदाच मी आमच्या एअरलाइनच्या काउंटरवर पोहोचलो. बॅगा देऊन आणि हॅडबॅग घेऊन सेक्युरिटी चेक साठी निघालो. अर्थातच ती बाकरवडीचे सगळे पाकीट माझ्यासोबतच होती.
हॅन्ड बॅग चेकिंग ला टाकून मी माझं स्वतःचं सेक्युरिटी चेक केलं.
तेवढ्यात बॅगा चेक करणाऱ्या त्या सिक्युरिटी ऑफिसरला माझ्या बॅगमध्ये काहीतरी दिसलं. तो खुर्चीवरून उठला आणि माझी बॅग हातामध्ये घेऊन म्हणाला”, ये किसकी बॅग है”?
ती नेमकी माझी बॅग होती.
मी मनात म्हटलं आता बाकरवडीने काही गोंधळ घालू नये म्हणजे झालं.
पण ती माझा काही पिच्छा सोडणार नव्हती.
“यह मेरी बॅग है.” मी प्रामाणिकपणाने सांगितलं.
“खोलो इसको.”
“क्या है बॅग के अंदर ? बहुत पाकीट रखे है”.
मला अंदाज आला होता, ‘बाकरवडी कांड ‘ झालं बहुतेक.
मी बॅग उघडली, सिक्युरिटी वाल्याने पाकीट हातात घेऊन मला विचारलं.
“यह क्या है.”?
मी म्हणालो”, यह बाकरवडी है.”
बाजूला एक साउथ इंडियन सेक्युरिटी गार्ड उभा होता.
दुसऱ्या सिक्युरिटी वाल्याच्या तोंडाकडे बघत फिल्मी अंदाजात म्हणाला,
“यह बाकरवडी क्या है यह
बाकरवडी”?
मला सौदागर सिनेमांतल्या “यह इलू इलू क्या है, यह इलू इलू” या गाण्याची आठवण आली. पण त्यांच्यासमोर विनोद करून उपयोग नव्हता. मी पुन्हा गंभीर झालो.
“यह खाने का बाकरवडी है.” मी म्हणालो.
“अरे खाने का बाकरवडी है ये तो हमको भी मालूम है, लेकिन पुरे प्लेन मे लोगो को खिलाने वाला है क्या.”?
मी काहीच बोललो नाही.
“कितना पाकीट लेके जा रहा है”?
“मै भूल गया था, इसलिये हॅन्ड बॅग मे रखा” मी त्याला कसं तरी सांगितलं.
“चलो ठीक है. ले लो, ले लो.”
शेवटी त्यांनी मला सोडून दिल.
कसंतरी मी आणि बाकरवडी सेक्युरिटीच्या तावडीतून सुटलो होतो.
मात्र बाकरवडीने चांगलाच नाका तोंडात दम आणला होता.
मुंबई वरून निघालो आणि दुबईला पोहोचलो. दुबईला उतरल्यानंतर खूप भूक लागली होती. जवळ असलेल्या बाकरवडीची आठवण आली. एक पाकीट फोडून मी बाकरवडी खायला सुरुवात केली आणि मनसोक्त भाकरवड्या खाल्ल्या, नंतर माझ पोट “बाकरवडीमय” झालं होतं. याच मनसोक्त खाल्लेल्या बाकरवड्या पुढे जाऊन मला “अभी तुमको दिखाते है” असंच काहीतरी बोलल्या असतील.
प्रवासामध्ये एक तर माझी झोप झाली नव्हती, त्यातल्या त्यात ह्या बाकरवड्या खाऊन माझी ऍसिडिटी प्रचंड वाढली.
मोरोक्को मध्ये उतरल्यानंतर माझ्या ऍसिडिटी चे प्रमाण आणखी वाढलं होतं.
घरी आलो आणि मी आजारी पडलो. बाकरवडीने माझ्यावर जादूटोणाच केल्यासारखं झालं. तीच रुद्र रूप आता मला दिसायला लागलं होतं. ऍसिडिटी वाढल्यामुळे मला ओमेटिंग झालं आणि डोकं खूप दुखायला लागलं.
आमच्या सोबत फ्रेंच भाषा बोलणारे आमचे भारतीय मित्र होते. माझी बिघडलेली परिस्थिती बघून शेवटी त्यांनी मला हॉस्पिटलला ऍडमिट करण्याच ठरवलं.
बाकरवडीमुळे मला आल्या आल्या या देशाचं हॉस्पिटल बघायला मिळालं. आम्ही हॉस्पिटलला आलो.
थोडा वेळ वाट बघितल्यानंतर डॉक्टर आले.
कॅबिन मध्ये गेल्यानंतर डॉक्टरने मला टेबलवर तपासायला घेतले.
अतिशय धिप्पाड असा डॉक्टर बघून मला सुरुवातीला भीतीच वाटली. माणूस इतका सुद्धा मोठा असू शकतो हे मी या देशात आल्यानंतर पहिल्यांदा अनुभवलं.
तो माझ्या सोबत काय बोलत होता मला काहीच कळत नव्हतं. आमच्या सोबत असलेला मित्र त्याला फ्रेंच भाषेमध्ये हातवारे करून समजावून सांगत होता. त्यांच्या हातवाऱ्याच्या एकूण खाणाखुणावरून आणि तोंडातून निघणाऱ्या हवेतून माझा पोटाचा घेर वाढला आहे आणि पोटात गॅस झाला आहे एवढे मात्र मला समजलं.
डॉक्टरने मला टेबलवर झोपायला सांगितलं. माझ्या पोटावर चारही बाजूने ढोल वाजवावा तस डम डम वाजवलं.
त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर हावभाव बघून मलाही थोडी भीती वाटायला लागली. माझी जीभ आणि डोळे त्याने तपासले.
बाकरवडीमुळे की काय परंतु माझे डोळे पिवळे झाले होते. आता त्यावेळी माझे डोळे पिवळे कसे झाले हे सुद्धा एक रहस्यच होतं.
डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि त्यांना माझं निदान करण्याची इतकी घाई झाली होती की त्यांनी लगेच सांगून टाकलं की बहुतेक याला कावीळ झाली असावी.
आमच्याबरोबर असलेले आमचे भारतीय मित्र यांच्यात आणि डॉक्टर मध्ये फ्रेंच भाषेत संवाद चालू होता.
तो संवाद मला न्यायला आलेल्या ड्रायव्हरने ऐकला आणि ही बातमी वाऱ्यासारखी आमच्या कंपनीत पसरली.
कंपनीत नवीन आलेल्या एका व्यक्तीला कावीळ झालेली आहे. त्यामुळे सगळेजण घाबरले. त्या दिवशी मला हॉस्पिटलला ॲडमिट करून घेतलं. माझ्यामध्ये कोणतही काविळीचे लक्षण दिसत नव्हतं.
नवीन देशात आल्या आल्या हा माझ्याबरोबर हा काय प्रकार चालू आहे हे मलाच कळत नव्हतं.
ओमेटिंग आणि ऍसिडिटी मुळे मला थकवा आला होता. मला बळजबरीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि वरतून सलाईन पण लावलं.
तुझ्या काविळीच्या सर्व टेस्ट कराव्या लागतील, त्यांना असं वाटतंय की तुला कावीळ झाली आहे.” आमच्या मित्राने मला येऊन सांगितलं.
दुसऱ्या दिवशी मात्र माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले.
मग मात्र डॉक्टरांनी पवित्रा बदलला.
तुम्हाला कावीळ जरी झालेली नसली तरी तुमचे डोळे अजून पिवळे का आहेत हे आम्हाला कळत नाही. या विषयावरून आमच्या मित्राची आणि डॉक्टरांची गाडी मी रात्री काय खाल्लं याच्यावर घसरली आणि ते प्रकरण पुन्हा बाकरवडीवर येऊन थांबलं.
“मी काल बाकरवडी खाल्ली होती.” मी सांगून टाकलं.
बहुतेक त्यामुळेच तुला हा त्रास होतोय आणि तिच्यातच काहीतरी दोष असू शकतो असं आम्हाला वाटतंय”. सगळ्यांचा संशय बाकरवडीवर होता.
दुसरा दिवस उजाडला. सकाळी आमचे मित्र हॉस्पिटलला आले.
मला वाटलं बाकरवडीचा विषय आता संपला असेल.
त्यांनी मला सांगितलं, तू आणलेली बाकरवडी आता रबात ह्या शहरात तपासणीसाठी पाठवली आहे.
कारण जोपर्यंत तिच्या तपासणीचा रिपोर्ट नॉर्मल येत नाही तोपर्यंत हे प्रकरण संपणार नाही. मी तिथेच डोक्याला हात लावला. मी ओरडून सांगत होतो, मला फक्त ऍसिडीटी झालेली आहे, पण तरीही कुणी मला समजून घेत नव्हतं. मात्र त्या दिवशी दुपारी बाकरवडी पुढील तपासणीसाठी दुसऱ्या शहरात पाठवली.
त्या दिवशी संध्याकाळी माझी ऍसिडिटी कमी झाल्यामुळे मला बरं वाटायला लागलं आणि मला घरी सोडलं. मात्र तपासणीसाठी पाठवलेल्या बाकरवडीच्या पाकिटावर तिथल्या लोकांनी ताव मारला असेल असं मला नक्की वाटतं कारण शेवटी,
बाकरवडी, टेस्ट ऑफ इंडिया…..😃

— लेखन : प्रकाश फासाटे. मोरोक्को
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800