“उरदिवाळी”
हुश्श ! झाली बाई दिवाळी.
भाऊबीज झाल्यानंतर प्रत्येक स्त्री जबाबदारी हलकी झाल्यासारखे ‘हुश्श !’ करत असते. नंतर एकदोन दिवस विश्रांतीचे सरले की आणखी काही यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभे राहतात. दिवाळीच्या आधी एक दोन दिवस राबराबुन केलेला किंवा हलवायाकडुन आणलेला फराळ संपवणे, गर्दीत धामधुमीत, चार दुकाने किंवा ऑनलाईन मागवलेले कपडे जे दिवाळीत वापरलेले असतात .निदान चार पाच तासांकरता का असेना, त्यांचे ड्राय क्लिनिंग करणे, साड्यांसाठी कपाटात जागा करणे किंवा पतीराजांच्या आवडत्या (?) साड्या त्यांच्याच कपड्यांवर कपाटात कोंबणे. टिकल्या किंवा चमकीच्या साड्या, कपड्यांमधुन घरभर पसरलेली लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया साफ करणे. शेरवानी, झब्बे, पायजमे, अनारकली इत्यादी अनेक वस्त्रप्रकार ड्रायक्लिन करणे. निदान इस्त्री, रोलप्रेस करणे वगैरे, जराशा जुन्या झालेल्या साड्या, ड्रेस कामवालीसाठी बाहेर काढणे, तिचा राग आला किंवा जीव न झाल्यास परत कपाटात ढकलणे, लहान बाळ गोपाळांच्या फटाक्यांच्या पिशवीतुन फटाके, काडीपेटी, मेणबत्ती, अगरबत्ती, रॉकेटसाठीची काचेची मॅगीची बाटली तोंडापाशी न फुटल्यास, आणि फुटल्यास तिच्यासकट इतर कचरा वेगवेगळा करणे.
दिवाळसणासाठी लावलेला सुरेखसा आकाशकंदिल काढुन पुसुन स्वच्छ करून माळ्यावर ठेवणे, सौंदर्यदृष्टीने बनवलेल्या झेंडुमाळा, आणि त्याच दृष्टीने यु ट्युबवर बघुन काढलेली रांगोळी पुसतांना जीवावर येते पण पुसणे. देवासमोर ठेवलेले पैसे आणि लक्ष्मी हक्काने स्वतःच्या बंद कुलुपात ठेवणे.
फराळाचे जिन्नस टेस्टी झाले असल्यास माहेरासाठी पॅकिंग करणे, थोडेफार टेस्टी असल्यास सासरसाठी पॅकिंग आणि चव सोडून जिन्नसांमध्ये सर्व काही असल्यास भरपूर पॅकिंग करून घरात नौकरगड्यांपासून ते ज्यांचा वचपा काढायचा असेल अशा सगळ्यांच्या माथी म्हणजे तोंडाच्या आत मारणे. आणि आलेल्या फराळाच्या पिशव्यांचे वाटप डावीकडून उजवीकडे शिताफिने करणे, थोडेसे जिन्नस इकडे तिकडे करून घरातले न खपणारे त्यात टाकून आणि चविष्ट स्वतःसाठी काढून त्याचे आकर्षक पॅकिंग करणे. यात उत्तम सुशिक्षित आधुनिक गृहिणींचे कौशल्य असते. (आम्ही अडाणी वर्गात मोडतो ना !)
आमच्या ओळखीच्या एका हुश्शार मावशी हलवायाकडून चिंचेची आणि हिरवी चटणी (ढोकळ्यांसोबतची बरं का !) आणून ठेवतात. आले गेलेले किंवा घरातल्याच घाण्यात तळलेले आणि जळलेले, त्यांच्या भाषेत खरपूस म्हणजेच जळालेले शंकरपाळे विशेषतः कडक अगदी बिगर टोपीच्या दातांनाही अवघड असे बरणीत भरून (आणि दडवून) ठेवतात. पाहुणे आल्यास प्लेटमध्ये शंकरपाळे (हवे तर मिक्सरमध्ये किंचित फिरवून) त्यावर दोन्ही चटण्या, कांदा, शेव, हलवायाकडील फरसाण, दही आणि कोथिंबीर भुरभुरून टाकतात. घरात दिवाळीचे खाऊन वैतागलेल्यांच्या जीवांना या खरपूस शंकरपाळीचाट मुळे उत्तम दिलासा मिळतो. आणि काकूंना वाहव्वा !, उत्तम सुगरणीचा किताब. महिला मंडळात अगदी भाव खाऊन आहेत त्या! सध्या पेटंटची वाट बघत आहेत खाऊगल्लीकडुन.
हल्ली एक फ्याड निघाले आहे बरं का ! दिवाळी किंवा भाऊबीज झाली की आउटींगला जायचे दोन-तीन दिवस. मग काय नको असलेला फराळ सोबत न्यायचा. खाल्ला गेल्यास ठीक, नाहीतर हॉटेलमधल्या रूम सर्विस किंवा रस्त्यात एखाद्या भुकेलेल्याला देऊन टाकायचा. दानधर्मही होतो, उर् दिवाळी हलकी होते.
माझ्या एक मावस सासूबाई एकदा दिवाळीनंतर आमच्याकडे आल्या. दिवाळीनंतर फक्त लाडू आणि बर्फी उरली होती. शेजार पाजार, नातलग यांना वाटूनही संपेना आणि आम्हालाही खावीशी वाटेना. मावशींनी चक्क मिक्सरमध्ये त्याचा भुगा केला आणि थोडी कणिक टाकून एके दिवशी गोड दशम्या, दुसऱ्या दिवशी तिखट मीठ टाकून नमकीन दशम्या, तर तिसऱ्या दिवशी तिखट मिठासोबत चाट मसाला आणि उकडलेले बटाटे टाकून छान गोड आंबट दशम्या बनवल्या. मावशींकडून शिकण्यासारखे खूप होते. त्या हयात नाहीत पण खाणे पिणे जगण्याच्या छान टिप्स त्या देऊन गेल्या. आठवणींनी डोळे पाणावतात.
शेव, चिवडा, गाठी, चकली चावण्यालायक असल्यास ओल्या भेळीचा प्रोग्राम दोन-तीन वेळेला होतो. शेव किंवा चकलीचे सूत दातांशी, जिभेशी न जुळल्यास परत मावशींचा फॉर्मुला लागू करता येतो.
शेवेसाठी यु ट्युबलाही धन्यवाद. शेवकढी, शेवची भाजी, दयाबेन फेम शेव टमाटर नु साग, शेव कांदा मिरची लसुन ठेचा
(काही नाही हो ठेच्यात थोडी शेव टाकायची आचारी कृपेने मऊ झाल्यास खायची पोळी किंवा भाकरीबरोबर वाटल्यास लिंबु पिळुन).
करंजी सांजोरीचेही तसेच. मिक्सरला धन्यवाद, मावशींना शतशत प्रणाम ! सगळ्या रेसिपीज ट्राय केल्यावरच सांगा, आम्ही सध्या डाएट फॉलो करतोय !
उर् दिवाळीतला आणखी मोठ्ठा यक्षप्रश्न म्हणजे उरलेल्या फटाक्यांचा. आधीच पोरट्यांनी फटाक्याच्या दारूने बरबटलेले हात धुतांना दिवाळीत तारांबळ उडते. नंतर घर अंगण परत भाऊबीजेनंतर घाण होऊ नये म्हणून फटाके लपवताना गृहिणींची परत तारांबळ उडते.
दिवाळीच्या सीजनमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच असेल तर हा खोका हळूच खाली काढला जातो. भारत जिंकल्यास पूर्ण खोक्याला काडी ! हुश्श वाटते. पण क्रिकेट मॅच क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल या टप्प्यात असेल तर खोकाही निगुतीने टप्प्याटप्प्यात रिकामा होतो. तरीही फायनल ला फासे उलटे पडल्यास फटाके तुळशीच्या लग्नालाही वाजवता येतात. तरीही काही विघातक प्रवृत्ती आपण मॅच हरल्यावर फटाके वाजवताना दिवसात. आग लागो अशा प्रवृत्तीना. असो.
हल्ली इलेक्शनचा फॉर्म भरून आले तरी फटाके वाजवतात म्हणे. गडी कोणी का असेना आम्हाला फटाके वाजवल्याशी आणि संपल्याशी मतलब. मॅच चालु असतांना दिवाळी उरफराळाचीही बऱ्यापैकी विल्हेवाट लावता येते. थोडी चहापाण्यासाठी कसरत होते तेवढेच आणि मॅच संपल्यावर यल्लो खिचडीवर काम भागते किती छान !
आणखी एक मोठा प्रश्न विविध दिवाळी अंक आणल्यास मिस्टरांचा डोळा चुकवुन (आणि पोरट्यांचाही, चुगली करतात हो !) कोणकोणत्या महिन्यात रद्दीत दडवायचे आणि विचारल्यास कोणत्या शेजारणीचे (रिस्क जरा कमीच घेते) किंवा नात्यातल्या काकु मावशी आत्याचे नाव सांगायचे.
उर दिवाळीतला आणखी एक भावनिकी यक्षप्रश्न म्हणजे दिवाळीच्या चारही दिवसांच्या वेगवेगळ्या शुभेच्छांमध्ये कोणी नातेवाईक किंवा मित्र परिवारात कुणीतरी राहून जाणारच. चिंता (?) नसावी, अस्मादिक कविता पण छान करतात. संपर्क आणि समोरच्या व्यक्तीच्या नात्यातील जवळीक कळवा. राग जाईल इतक्या चांगल्या ओळी निश्चित बनवून देईल. समोरच्या नातेवाईकाचा हृदय वितळण बिंदू बराच उच्चतम असल्यास कवितांचा दोष नाही. त्यासाठी एक छोटी टीप साक्षात साष्टांग दंडवत आणि अस्मादिकांना क्षमस्व !

— लेखन : सौ. सुजाता येवले. नाशिकरोड.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
