दाढी दिवस
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जागतिक दाढी दिवस साजरा केला जातो.
पुरुषांना दाढीचे महत्व व जगाला दाढीवाल्यांचे महत्व कळावे ह्या साठी कदाचित दाढी दिवस साजरा केला जात असेल. ह्या दिवशी दाढी करणे वर्ज्य असते किंबहुना अपमानास्पद मानले जाते. आपल्या कडे म्हणजे भारतात श्रावण महिना हा दाढी महिना असतो. तसं दाढी हे पुरुषत्वाची निशाणी मानली जाते.
डोंसबर्ग ह्या स्विडनच्या गावात दाढी काढली की व्यक्तीला एक दिवस जंगलात काढावा लागतो.
सध्या दाढीवाल्यांचे पर्यायाने दाढीला अनण्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. दाढी युक्त मोदी आज जगात अन्य अदाढी नेत्यांना मागे टाकून प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहेत हे त्यांचे विरोधक ही मानायला तयार झाले आहेत.
मागच्या वर्षी घनदाट दाढी वाल्या शिंदेंनी दाढी नसलेल्या उ ठा यांना उठवून मुख्यमंत्री पद पटकावले. अगदी फडणविसांनाही अलगदपणे दाढीवर हात फिरवत फिरवले.
असं म्हणतात अब्राहम लिंकन यांना ही एका महिलेने सुचवले की आपण दाढी वाढवली तर अमेरिकेचे प्रेसिडेंट व्हाल. आणि खरोखरच दाढीच्या चमत्कारिक प्रभावाने ते प्रेसिडेंट झाले.
मागच्या वर्षी दिलेला माझा दाढी संदेश राहुल गांधी पर्यंत कुणीतरी पोहोचवला आणि त्यांना दाढी प्रेम झाले. भारत जोडो यात्रा करत राहुल गांधींनी भरगच्च दाढी चेहऱ्यावर जोडली आणि दाढी बरोबर आपली प्रतिमा वाढवली. विरोधी लोकांनी तयार केलेली पप्पुता ची प्रतिमा ही हळूहळू पुसायला लागली. संसदेत बोलताना अडाणी पणा न करता अडानी युक्त भाषण केले.
अनुष्का शर्मा विराट कोहलीच्या क्रिकेट पेक्षा त्याचा दाढी वर जास्त भाळली असावी. स्त्री वळणदार आणि पुरुष दाढीदार असले तर अधिक आकर्षण निर्माण करतात.
दाढीस्वी पुरुष तेजस्वी तर वाटतो पण एक त्याचं दाढीत्व तत्ववेत्ता असल्याची जाणीव करून देतो.
तर अशा ह्या दाढी दिवसाच्या सर्व दाढी बहादुरांना हार्दिक शुभेच्छा. बघुया २०२४ मध्ये कोणता दाढी युक्त चेहरा यशस्वी होतो.

— लेखन : ओमप्रकाश शर्मा. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800