Thursday, November 13, 2025
Homeसाहित्यहलके फुलके

हलके फुलके

“लोणचं आणि चिमणराव”

एकदा चिमणराव जोगांची फॅमिली गुंड्याभाऊ दांडेकरांबरोबर पार्टी करण्याच्या निमित्ताने बाहेर हॉटेल मध्ये जेवावयास गेली. चिमण-काऊचा (चिमणराव व कावेरीचा) मोरू नुकताच बालवाडीत जायला लागला होता त्यामुळे त्याला त्या हॉटेलच्या जेवणाचं भारी अप्रूप वाटत होतं. हॉटेलमध्ये जेवण वाढत असताना नवीन आलेल्या वाढप्याने चुकून कैरीचं लोणचं पानाच्या वरच्या बाजूस मध्यभागी वाढले. ते पाहून त्याच्यावर खसकन ओरडत गुंड्याभाऊ पटकन त्या वाढप्याला म्हणाले …”अरे, लोणचं, चटणी, कोशिंबीरी हे नाजूक पदार्थ, नेहमी पानाच्या डाव्या बाजूला वाढायचे असतात. एवढंही तुला समजत नाही. दे ती लोणच्याची बरणी दे माझ्याकडे मीच वाढून घेतो.”

काय रे गुंड्या, ‘आपण हॉटेल मध्ये जेवायला आलो आहोत आणि या सर्व पदार्थांत तुझं विशेष प्रेम दिसतंय या लोणच्यावर’ असं म्हणत चिमण खुदकन मोठ्यांदा हसला तसा सगळीकडे एकच हशा पिकला. त्यावर गुंड्याभाऊ थोडे ओशाळले.

त्यावर चि. मोरू आप्पांना मोठ्या उत्सुकतेने लडिवाळ स्वरात म्हणाला…”आप्पा, लोणच्याची बरणी म्हणजे काय ?

त्याच्या त्या उत्सुकतेने विचारलेल्या प्रश्नांनी चिमणरावांनी गालातल्यागालात एक गोड स्मितहास्य केलं आणि चि. मोरू कडे बघून ते म्हणाले…हे बघ ‘मोरू’, ‘मैने’ तू पण ऐक गं. ‘लोणचं’ म्हणजे आपली ‘फॅमिली’ आणि ‘बरणी’ म्हणजे आपलं ‘एकत्र कुटुंब’.

चिमण आता पुढे काय सांगतोय हे पाहून चिमणरावांच्या सौ. काऊ अर्थात कावेरीबाई आणि गं.भा.मातोश्रीआईंनी आपले तोंड पदरात लपवून गालातल्या गालात हसून घेतले आणि गुंड्याभाऊ चिमण काय सांगतोय त्याकडे कान टवकारून नीट लक्ष देऊन ऐकू लागले.

चिमण मैनाताईला म्हणाला…”मैनाताई, लोणचं कसं घालतात हे माहिती आहे का तुला”?

यावर मैनाताई उतावळ्या स्वरांत मोरूकडे पाहून त्याला चिडवत म्हणाली …हो, ‘आप्पा’.

कैरी, मेथी, थोडा गूळ, लाल तिखट, लोणच्याचा मसाला… तेल आणि पुढे आठवत ती म्हणाली फेसवलेली मोहरी आणि हिंग, एकादमात मैनेने लोणच्याला लागणारी सगळी सामग्री सांगून टाकली.

वाss. छान !!! गुंड्याभाऊ उत्तरले.

आता चिमणराव चेहऱ्यावर गंभीर भावमुद्रा करत चि. मोरूसाठी कैरीच्या लोणच्याची पाककृती सांगू लागले…आणि ते म्हणाले….

आंबट कैरी, गुळाचं माधुर्य, मेथीचा कडवटपणा, मिरची-लोणच्याचा मसाल्याचा तिखटपणा, मिठाची लवणता, मोहरीचा तजेलदारपणा, हिंगाचा उग्रपणा आणि हळदीचा रंग, तेलाची तरलता या सगळयांचे स्वभाव वेगळे, गुणधर्म वेगेळे परंतु एका बरणीत एकत्र आल्यावर सगळे कसे मिळून छान चविष्ट होतात ना अगदी तसेच असते माणसाचं आयुष्य. अगदी या कैरीच्या लोणच्या सारखं मुरलेलं. एका बरोबर सोबत राहिले की एकमेकांचे गुण ग्रहण करता येतात. कळलं का ‘मोरू’.

उदा. हे बघ हं. प्रत्येक पदार्थाचा स्वभाव वेगळा, स्वाद वेगळा असला आणि त्यातील एक जरी पदार्थ आपला गुण सोडायला तयार नसला तर चांगल होईल का लोणचं. नाही ना चांगल होणार. तसंच असतं एकत्र कुटुंबात. एक दुसऱ्याच्या साथीने एकत्र राहिलो तर कुढल्याही संकटाचा सामना सहजपणे करता येऊ शकतो. ज्यावेळी लोणचं एकत्रपणे नीट मुरतं त्यावेळी ते अधिक चविष्ट लागतं, तसंच असतं आपलं माणसांचं. आपण चांगलं व्यवस्थितपणे एकत्र राहिलो की आयुष्यही अधिक मुरून चविष्ट व्हायला लागतं. असं म्हणत त्यांनी काऊ कडे बघून डोळे मिचकावून पाहिले.

मग ते आई कडे पाहात म्हणाले… बरोबर आहे ना आई.

गं.भा.मातोश्रींनी मानेनेच नुसतं हो म्हणत नुसती मान हलवली.

फेसवलेली मोहरी जेंव्हा नाकाच्या ब्रह्मरंध्रांमधून मस्तिष्कात जाते त्यावेळी जी समाधी लागते ना ती समाधी अवर्णनीय असते. कळलं का ‘काऊ’. जशी समाधी तुला मोबाईल सर्फिंग करताना लागते ना अगदी तसंच असतं हे. त्यावेळी समजायचं लोणचं छान फेसवलं गेलंय.

चांगला स्वभाव हा नेहमी गणितातील शुन्या सारखा असतो. ज्याच्या बरोबर तो असतो त्याची किमंत तो वाढवतो. याच एकरूपतेच्या ओढीने प्रत्येक पदार्थांची चव, वैशिष्ट्ये त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असूनही एका बरणीत आल्यावर कसे ते सगळे एकत्र एकजीव होतात आणि तेथे गुण्यागोविंदाने नांदतात तसेच असते आपले ‘एकत्र कुटुंब’.

दरवर्षी बरणी तीच असते पण लोणचं मात्र नवीन असतं. बरणी म्हणजे आपलं घर आणि लोणचं म्हणजे आपण त्यात असलेले सगळे जिन्नस. जसं आपलं घर दरवर्षी तेच असतं पण एकत्र गुण्यागोविंदाने नांदण्यात जो आनंद असतो ना तोच आनंद दरवर्षी नवीनपणाने आपल्याला अनुभवता येतो. तो मिळालेला आनंद टाकाऊ नसतो तर टिकाऊ असतो.

‘अगदी बरोबर आहे’ असं म्हणत गुंड्याभाऊंनी री ओढली आणि आपला हातातील सोट्या जरा जास्तच जोरात जमिनीवर दामटवला.

चिमणराव पुढे सांगू लागले. ..

कच्या कैऱ्या म्हणजे मैने तुझ्या सारख्या हं. अगदी आंबट-गोड, परिपकव न झालेल्या. लोणच्यासाठी काढलेल्या कैऱ्या कशा अगदी करकरीत असतात.

हॅ हॅ sss काऊ अगदी तुझ्या सारख्या सुद्धा. नंतर कुरकुरत का होईना मग त्या हळूहळू मुरतात. ‘काऊ’ तू कशी जेंव्हा या घरात आलीस त्यावेळी तुझी आणि आईची थोडी कुरकुर होती नंतर जस जशी तू संसारात मुरलीस अगदी तशाच.

मातोश्रींच्या हळूच डोळे मोठे करून चिमण कडे पाहिले. तसा चिमण गालातल्या गालात हसत पुढे म्हणाला…

लग्नापूर्वी कशी हळद लावून नवरी नटून थटून बोहल्यावर चढते आणि नंतर आपला रंग हळूहळू संसारांत मिसळते अगदी तसंच असतं हे. एकमेकांच्या साथीने कोरड्या केलेल्या कैरीला मीठ लावून वाळवून घेतल्यावर प्रेमाची हळद चांगली चोळून लावायची म्हणजे लोणच्याला चांगला रंग येतो आणि विकारांच्या बुरशीपासून त्याच संरक्षण होतं. म्हणून चांगले विचार, चांगले आचार, चांगली संगत धरावी. समजलं काय रे ‘मोरू’… मोरू कडे पाहात चिमण म्हणाला.

लोणच्यातील मेथी म्हणजे आपल्या मनातील कडवट भावना. त्यांचा असणारा कडवटपणा शब्दांतून व्यक्त होण्यापूर्वीच त्यांना आवरायचं. सौ. कावेरी चक्क पदर ओठांत दाबून इश्य म्हणून लाजल्या. तसा अजूनच काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन माहिती सांगण्याचा चेव चिमणरावांना आला.

बरं कारे गुंड्या नुसत्या मेथीचा कडवटपणा नाही तर जिभेचा तिखटपणा ही जरा सांभाळला तर सगळं कसं सुरळीत होतं. यावर गुंड्याभाऊंनी नुसतीच मान उडवली.

मातोश्रींकडे बारीक किलकिले डोळे करत चिमण म्हणाला… बरं का मैने, ” ‘मी’ पणाची मोहरी जरा जास्त झाली ना तर लोणच्याचा खार हा कोरडा होतो आणि तयार झालेला आपुलकीचा रस्सा (खार) उगाचच बिचारा शोषला जातो.”

नंतर ‘काऊ’ कडे प्रेमळ नजरेने पाहात म्हणाला…समृद्धीचं तेल बरोबर पडलं की मग लोणचं बिघडण्याची काळजीच नसते. त्या तेलाच्या तवंगात सगळं लोणचं कसं अगदी छान मुरून येतं. फक्त त्यात उग्र हिंग जरा कमीच वापरायचा हं.

हो पण हे सगळं व्यवस्थित होण्यासाठी मात्र सहनशक्तीचं मीठ मात्र बरोबर पडायला हवं ना. सौ. काऊ पटकन म्हणाल्या. ‘हे मात्र बरोबर बोललात वाहिनी’ असं म्हणून त्यावर गुंड्याभाऊनी आपली री ओढली. तसा परत एकदा सर्वत्र हशा पिकला.

एका बरणीत एकत्र राहण्याचं लोणच्याचं आणि सुखी कुटुंबाचं रहस्य चिमणने सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.

एकत्र कुटुंबात राहून दुसऱ्यांच्या चुका नजरअंदाज करत एकमेकांप्रती आपुलकीची, प्रेमाची भावना, एकमेकांचा आदर आणि एकमेकांशी प्रेमळ संवाद साधला की आयुष्य सुंदर झालंच म्हणून समजा हा मेसेज चिमणने दिला होता.

मोरू, कावेरी, मैना, आई आणि गुंड्याभाऊंना आज चिमणरावांचा सार्थ अभिमान वाटत होता.

तरी काहीतरी बोलायचं म्हणून गुंड्याभाऊ म्हणाला…. थोडक्यात म्हणजे “United we stand & divided we fall.” बरोबर आहे ना रे चिमण.

चिमण हो म्हणणार तोच पुढे गुंड्याभाऊ म्हणाले… अरे एवढ्या चांगल्या लोणच्याला हे इंग्रज लोकं ‘pickle’ का बरं म्हणत असतील.

यावर काही उत्तर न देता सरळ हॉटेलचे बिल भरून चिमणराव आपल्या गाडीकडे वळले.

विनय पारखी

— लेखन : विनय पारखी. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सौ.मृदुला राजे on कॅन्सर म्हणजे “कॉमा” !