“अशी फजिती झाली…”
पुण्याच्या माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये ; म्हणजेच १९८६ ते १९८९ मधील ही घटना आहे. या काळात मी कोरेगाव पार्कच्या पॉप्युलर हाईटमध्ये टू बेडरूमचा फ्लॅट घेतला. त्यासाठी दिल्लीला जाऊन हाऊसिंग लोन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच माझ्यावर कोर्टमार्शल होण्याची वेळ कशी आली हे आपण आधीच वाचलेले आहे. असो.
मी घराचा ताबा घेऊन एक छोटासा घरगुती स्वरूपाचे गेट-टुगेदर करायचे ठरवले. सगळी तयारी झाली. मी जाऊन फ्लॅट सजवला आणि संध्याकाळी सगळ्यांना तिथे येऊन चहा पाणी करायला यायचे निमंत्रण दिले. मी साधारण पाच वाजता आधी पोहोचून फ्लॅटमधे बाकीची तयारी करण्यासाठी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर तो दरवाजा उघडेचना. माझ्या हातात दोन नव्या कोऱ्या चाव्या असताना दरवाजा खूप प्रयत्न करून उघडेना. आसपासच्या लोकांना बोलावले, त्यांनीही प्रयत्न केला. परंतु ज्या किल्ल्यांनी सकाळी माझ्या हातून दरवाजा उघडला तो आता मात्र उघडेना. हळूहळू माझे मित्र, नातलग जमले परंतु आम्हाला फ्लॅटच्या बाहेरच आणि तेही तिसऱ्या मजल्यावर थांबायला लागल्यामुळे सर्व नाराज झाले. माझाही चेहरा गोरामोरा झाला. अशी फजिती विशेष करून सगळ्या नातेवाईकांच्या समोर तर मुळीच नको होती. परंतु व्हायचे ते झाले. शेवटी मी सर्वांना हवाई दलातील आमच्या बंगल्यामध्ये नेले आणि ती वेळ साजरी केली. आश्चर्य हे की दुसऱ्या दिवशी किल्ली बनवणाऱ्याने तीच किल्ली वापरून लीलया दार उघडले की जणू आदल्या दिवशी काही झालेच नव्हते.
हे सर्व आठवायचे कारण असे की, कालच मी मेट्रोने रामवाडी ते पीएमसी असा प्रवास करत असताना कोरेगाव पार्कच्या त्या भागातील इमारत दिसली आणि फ्लॅटची आठवण झाली.
याच सुमारास मला नंतर एक व्यक्तिगत हानी सहन करावी लागली. बहीण लता उर्फ जयश्री रानडेचा पती म्हणजेच माझा जवळचा मित्र अविनाश रानडे याचे कार अपघातात निधन झाल्यामुळे तो एक मोठा धक्का होता. १९८९ मध्ये मला ऍडव्हान्स अकाउंट्स कोर्सला जावे लागले आणि तेथेच मला असे कळले की माझे पोस्टिंग सुलूर म्हणजेच कोईमतुर पासून २५-३० किलोमीटर दूर झाले आहे. रुजू झालो परंतु क्वार्टर न मिळाल्यामुळे मला कोईमतुर शहरात घर घेऊन राहण्याची परवानगी मिळाली. त्याप्रमाणे एका मित्राच्या ओळखीने मेनन यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर राहायला लागलो. अशा तऱ्हेने माझे पुण्यातील वास्तव्य संपले.
ठाण्याच्या पोस्टिंग मध्ये मला शब्दकोडी बनवायचा नाद लागला होता .त्याचा पुढचा प्रवास म्हणजे महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझी २५ कोडी सलग दर शनिवारी प्रसिद्ध व्हायला लागली. साप्ताहिक सह्याद्रीमध्ये जवळजवळ दीड वर्ष, कोल्हापूरच्या दैनिक पुढारी मधेही शब्दकोडी प्रसिद्ध झाली. फार कमी वेळा असे होते की आपले शब्दकोडे कोणीतरी तिऱ्हाईत आपल्यासमोर बसून सोडवताना दिसतो. तो आनंद मला एकदा रेल्वेच्या प्रवासात मिळाला. कोडे सोडवणाऱ्याने मला जेव्हा म्हटले की मी आवर्जून दर प्रकाशित आपले कोडे सोडवतो. कोडी बनवण्याकरता मी महाराष्ट्र शब्दकोश विकत घेतला, विश्वकोशाचे सगळे खंड मिळवले. यातून मला मराठी, हिंदी आणि इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवून शब्द साधना करण्याची संधी मिळाली.
कोईमतुरमधील वास्तव्यात गौरीशंकर, हॉटेल अन्नपूर्णा अशा नावाजलेल्या दक्षिणात्य हॉटेलातील तीन, चार फूट अशा लांबलचक डोशांचाही आस्वाद घेता आला. इडली, सांबार, डोसे तर घरी बनू लागले. आमचे एक कौटुंबिक मित्र आम्हाला वालपारे नावाच्या थंड हवेच्या ठिकाणी घेऊन गेले. इथल्या चहाच्या मळ्यात राहून रात्रीची जंगल सफारी केली. तिथेच मी माझी पहिली कार विकत घेतली घेतली. सौ अलकाने कार शिकल्यामुळे तिला नंतरच्या काळात खूप सोयीचे झाले.
मुले मोठी होत होती आणि मे १९९१ मध्ये कोईमतुर होऊन फरीदाबाद या ठिकाणी फिफ्टी सिक्स या पोस्टिंगवर पोहोचलो. तिथे माझ्यासाठी काय वाढून ठेवले होते ते पुढे आपण पाहू.
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800