निसर्गाचं खरं वरदान आपल्या भारत देशाला लाभले आहे. त्यातल्या त्यात आपले महाराष्ट्र राज्य अधिक सुपीक आहे. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा अगदी प्रमाणात. असे असले तरी गेल्या काही वर्षापासून जागतिक हवामानाच चक्र बिघडल्याचं आपण सर्वत्र पाहत आहोत.
नेहमी जून मध्ये येणाऱ्या पावसाची सुरुवात यावर्षी मे महिन्यातच झाली आणि आज ऑक्टोबर संपत आला तरीही त्याच्या सरी सुरूच आहेत.
हवामानातील सातत्याने होणारा बदल हा गेल्या काही वर्षात आलेला अनुभव आहे. ठराविक कालावधीनंतर चक्रीवादळाचा धोका जाणवत आहे परंतु आपल्या सुदैवाने प्रत्येक वेळेस येणारे वादळ दूर निघून जाते.

जागतिक हवामानाचा प्रामुख्याने विचार केला तर सर्वसाधारणतः प्रमुख कारणांमध्ये तापमानात झालेली वाढ, विशेषतः समुद्राच्या तापमानात वाढ झाल्यामुळे हवा मंडळातील ओलाव्याचे प्रमाण वाढते व त्यामुळे पावसाचे चक्र लांबते. यावर्षी बंगालच्या उपसागरात सलग याच कारणामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले व त्यामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात सातत्याने पावसाच्या प्रणाली तयार झाल्या.
एल निनो अथवा ला नीना चा प्रभाव हा भारतीय मान्सून वर विशेषतः महाराष्ट्रातील पावसावर थेट परिणाम करणारा जागतिक हवामान घटक ठरला आहे. हे दोन्ही शब्द हवामान शास्त्रात पॅसिफिक महासागरातील असामान्य उष्णतेच्या अवस्थेसाठी वापरले जातात. थोडक्यात एल निनो म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या तापमानात नेहमीपेक्षा जास्त झालेली वाढ तसेच ला नीना म्हणजे पाण्याच्या तापमानात झालेली घट. या घटना चक्रामध्ये बिघाड झाल्यास दुष्काळ किंवा अति पर्जन्यवृष्टी निर्माण होते.

या वर्षीचा पाऊस नुसता लांबलाच नाही तर अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कोकण, विदर्भ, मराठवाडा विभागातील लाखो एकर पिकांचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त रस्ते, विभूषित पाणी घरात शिरल्यामुळे झालेले नुकसान जनावरांचे वाहून जाणे व अनेकदा दैनंदिन जीवन ठप्प होणे अशा अनेक समस्या अतिवृष्टीमुळे निर्माण झाल्या.
आता सुरू असलेले मोन्था चक्रीवादळ हा त्याचाच परिणाम आहे. महाराष्ट्रावर जरी हलकासा त्याचा परिणाम झाला असला तरी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच ह्या चक्री वादळाचे परिणाम पश्चिम बंगाल व पुढे नेपाळ पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे.
हवामानातील बदल व नैसर्गिक आपत्ती ह्याचे परिणाम सतत जाणवू लागलेले आहेत. मानव जातीने हा बदल ओळखून व त्याचे पुढील परिणाम रोखण्यासाठी निसर्ग संवर्धनासाठी जे जे शक्य आहे ते करणे गरजेचे आहे.

— लेखन : सुधीर थोरवे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.
