आयुष्यात अनेक वळणे येतात.कधी इतकी वेडीवाकडी असतात की डोळ्यापुढे अंधार दाटून येतो.सोबत कोणी नसते. मागेपुढे अंधारच अंगावर येतो. काही सुचत नाही, काय करावं म्हणुन ?
अशावेळेस जीव कोणाचा तरी आधार, सोबत शोधत रहातो. कोणीतरी धीर द्यावा. मार्ग दाखवावा . कोणीतरी या क्षणी आपलं असं वाटेल असं कोणीतरी बरोबर असावे असं वाटतं. फक्त दीपस्तंभ होऊन मार्गच दाखवावा. स्वत: प्रकाश व्हावे.द्यावा धीराचा शब्द.नको पोकळ आश्वासन. नको आपेक्षा ठेऊन सोबत. नको ऊपकाराची परतफेड. नको सहजच भासावा पण सजग निलाजरा स्पर्श.इतक्या स्वच्छ मनाचा ‘जणू देवदूतच वाटावा,’…असा कोणीतरी यावा आणि पाठीवर विश्वासाने हात ठेवावा. “कसा रे अगदी ऐनवेळी देवासारखाच भेटलास ?” हेच शब्द मुखी यावेत.
असा हवाहवासा एक कृष्णसखा प्रत्येक द्रौपदीला भेटायला हवा. प्रथम मन व नंतर भावना जुळली तरच अशी मैत्री सहज शक्य असते.
त्या जीव घेण्यासमयी हवाहवासा कृष्णसखा भेटलाच तर?आशेचा किरण स्पष्ट होत जातो. मनातले काळजीचे कारंजे थबकते. डोक्यातील विचारांची रातकिड्यांसारखी बोचणारी किरकिर थांबते. तो विश्वासाचा महामेरू वाटतो. त्याच्या निरपेक्ष भावना त्याच्या डोळ्यात ऊतरतात. विशुद्ध स्वप्नांची आरासच मांडलेली दिसते. निरागस नजर… चांदण्यांचे शब्द… श्रद्धेची किनार सारे सारे जगावेगळे दिसते. आणि अशा मैत्रीची रेशीम गांठ घट्ट बसते. एका द्रौपदीला कृष्णसखा मिळतो.
मैत्री म्हणजे मुळातच देवाघरचे नक्षत्रांचे देणे आहे जे फक्त भाग्यवंतांना मिळते. देवाघरचेच देणे म्हणुन त्याला सुवर्णाचे कोंदण आहे. आनंदाची सजलेली कमान आहे.जिव्हाळ्याची आरास आहे.आपुलकीची शान आहे. जबाबदारीची जाण आहे. माणुसकीची नक्षी आहे. टिपूर चांदण्यातली ही मैत्रपुनव आहे.

सर्वच स्त्री पुरूषांना ही हवीहवीशी नवीनवीशी अनोखी मैत्री असावी आणि ती कोणत्याही वयात ?असावी असं वाटलं तर अवाजवी असं काय आहे त्यात? अशी निरपेक्ष, निरागस, शुद्ध अन् स्वच्छ बावनकशी मैत्रीची सोन्याची खाण प्रत्येकाला हवीच.
अजुनही स्त्री जुन्या रूढी, परंपरा ,चालीरिती, घर संसार, घराची प्रतिष्ठा या ओझ्याखाली दबलेलीच आहे. बंधने फक्त तिलाच आहेत. पण आता ती शिकत असल्याने,विचार करायला लागली असल्यामुळे समानता, स्वातंत्र्याची जाणीव
तिला होऊ लागली आहे. पण यामूळे कोंडमारा होऊन चक्रात सापडल्या सारखी तिची अवस्था झाली आहे. यामुळे तिची कुचंबणा होते. म्हणुन तर स्त्रीला बंधूसखा असावाच,ज्याच्यासमोर ती आपल्या मनातील दंद्व मोकळेपणे मांडेल. विचार विनिमय करेल. चुक बरोबर समजुन घेईल. त्याच्याबरोबर हंसणं रडणं, बोलणं हे वेगळ्या ऊंचीवरचं असेल. ती सज्ज होईल तेव्हा मन मोकळी, निर्णय घेऊन व समाधान झाले म्हणुनच ऊभी राहिल. ही शक्ती तिला तो बंधूसखाच देऊ शकेल.
मात्र मैत्री म्हणजे स्वैराचार नव्हे. क्षणभराची गंमत नव्हे. हे मनाला अंतरातुन पटलेले असायला हवे.त्या मैत्रीत संस्काराचे क्षितिज लक्ष्मण रेषाच होते.ही मैत्री बोगनवेली सारखी हवी. बोगनवेल काटेरी तर असतेच शिवाय घराबाहेर कुंपणावरच बहरते. छान सोबत, शोभा आणि आनंद देते.घरात शिरून कटकट होत नाही
अशी ही मैत्री एका मर्यादेवरच फुलावी. तिचे फुलोरे रंगीबेरंगी शोभा देणारे, आनंद देणारे असावेत.कधी बाळकृष्णासारखी खट्याळ, कधी रागीट, आपल्याला चूका दाखवून खडसावणारी, आपली काळजी करणारी, हंसवणारी, रडवणारी, आभाळभर मायेची सावली धरणारी आणि काचेसारखी पारदर्शक असावी. लपाछपी फसवाफसवीला त्यात तीळभर जागा नसावी.
राधा कृष्ण, श्रीरंग द्रौपदी, चंद्र रोहिणी, चांदोबा तारका नक्षत्रे जनाई कान्होपात्रा यांची विठ्ठलाशी श्रद्धा विश्वास व आदर याने माखलेली मैत्री होती. ह्या मैत्रीला मान मर्यादा घातलेल्या आहेत. ऊगाच नाही मार खाल्ला जनाईने वळ ऊठले देवाच्या पाठीवर.
मीरेचे वीष स्वत:पिऊन श्रीरंग सावळा झाला. साई बाबांनी छोटीसाठी पाण्याचे दिवे पेटवले. ही सगळी भक्तीपूर्ण अशाच मैत्रीची भावपूर्ण ऊदाहरणे आहेत.
पण समाजाच्या पचनी अशी मैत्री पडत नाही. समाजमन विकृत जास्त असते. त्याला यातली भक्ती, विश्वास, श्रद्धा समजतच नाही. तेवढी त्याच्या विचारांची कुवत नसते. आता शिक्षणामुळे विवेक जागृत आहे. स्वैराचार, मर्यादाभंग हे शब्द काढुनच मैत्रीकडे बघायला हवे.कोणत्याही वयात अशी खट्याळ, व्रात्य, नटखट ,पण पावित्र्य व मांगल्याचे दर्शन घडवणारी अविकारी मैत्री सोबत असावी. ती दिलासा देईल. दिवसा चांदणे सांडेल, काळजापर्यंत सोबत करेल .
आज जग राधा कृष्णाला स्वैराचारी, व्याभीचारी, संस्कारांची चौकट मोडणारी मानतात का? ऊलट जखम दिसताच त्या जगजेठीला भरजरी वस्त्र फाडुन क्षणात चिंधी बांधते याचेच कौतुक करते. धनूर्धर पांच पराक्रमी पांडव पती असतानाही द्रौपदीला कृष्णसखाच मदतीला यावा यासाठी धावा करावासा वाटला, आणि श्रीकृष्णाला धाऊन जावेसे वाटले.अक्षयपात्र म्हणुन द्रौपदीला द्रौपदीची थाळी द्यावीशी वाटली.
भेटेल का असा कृष्ण सखा ?

— लेखन : अनुराधा जोशी. मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800
